*यावर्षी गणेशोत्सवात महाराष्ट्रीयांना अनुभवायला मिळणार ‘लोककला दर्शन’.*
*गणेशोत्सवनिमित्त ‘लोककला दर्शन’ चा महाराष्ट्र दौरा.*
गणेशोत्सवात संपूर्ण महाराष्ट्रभर सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानीच अनुभवायला मिळते. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमांना मोठी मागणी आहे. यातच मुंबईच्या विश्व लोककला मंच संस्थेच्या ‘लोककला दर्शन’ या महाराष्ट्रातील लोककलांचा सांगीतिक कलाविष्कार असलेल्या कार्यक्रमाचा महाराष्ट्र दौरा होणार आहे. अहिल्यानगर, लातूर, पुणे, मुंबई सारख्या प्रमुख शहरांमध्ये महाराष्ट्रीयांना ‘लोककला दर्शन’ कार्यक्रम अनुभवता येणार आहे.
महाराष्ट्रात मराठी सण फार उत्साहात आणि मनोभावे साजरे केले जातात. त्यात गणेशोत्सव म्हटल्यावर महाराष्ट्रातील जणांसाठी हा सण अधिकच खास आहे. शिवाय गणेशोत्सव सणाला महाराष्ट्र शासनाने राज्य उत्सवचा दर्जा दिला आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवाची तयारी सुरू आहे. गणेशोत्सव काळात उत्तमोत्तम आकर्षक देखावे, उंच आणि आकर्षक गणेशमूर्ती, सजावट, रोषणाई या सगळ्या बरोबरच सांस्कृतिक कार्यक्रमांना देखील मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. दरम्यान महाराष्ट्रभर संगीत, नाटक, नृत्य कलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या काळात कलाकारांना देखील मोठी मागणी असते. त्यामुळे गणेशोत्सव हा फक्त सण राहीला नसून तो आज अनेकांच्या उदरनिर्वाहाचा सुद्धा एक महत्वाचा घटक बनला आहे.
यावर्षी गणेशोत्सव काळात महाराष्ट्रभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू आहे. समाज माध्यमांवर सर्वच गणेश मंडळ त्यांच्या त्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आकर्षक पोस्टर्सद्वारे प्रसिद्धी करीत आहेत. यातच ‘विश्व लोककला मंच’, मुंबई या संस्थेद्वारे सादर केला जाणारा ‘लोककला दर्शन’ कार्यक्रमाला मोठी मागणी आहे. दरम्यान यावर्षी महाराष्ट्रभर ‘लोककला दर्शन’ कार्यक्रमाचा दौराच त्यांनी घोषित केला आहे.
गण, पिंगळा, वासुदेव, ओव्या, पोतराज, मोत्यावरची गीते, पारंपरिक लावणी, भारुड, जागरण, गोंधळ अशा पारंपरिक लोककलांचा सांगीतिक थाट असलेल्या ‘लोककला दर्शन’ कार्यक्रमातून ते रसिकांना महाराष्ट्राच्या लोकपरंपरेचं, लोकसंस्कृतीचं आणि लोककलांचं दर्शन घडवीत मनोरंजनातून समाज प्रबोधन आणि उद्बोधन करतात. सुरज खरटमल लिखित आणि दिग्दर्शित या कार्यक्रमात जगदीश कन्नम, मंगेश शिंदे, प्राची मोहिते, सिद्धार्थ कासारे, वेदांत जाधव, अमृता कसबे, भाग्यश्री म्हात्रे, यश खडे, श्रीधर भंडगे, तन्मय तावडे, अक्षय शिंदे, सक्षम दवणे, मिहिर टेमकर, तुषार गायकवाड, जॉय भांभळ, यश चारकरी, विक्रांत गायकवाड असे महाराष्ट्रातील विविध प्रदेशातील वीस कलाकार सहभागी आहेत.























