Home मुंबई *‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेत नवकल्पनांना उत्स्फूर्त प्रतिसाद; सहभागींची संख्या ६५ हजारांपार*

*‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेत नवकल्पनांना उत्स्फूर्त प्रतिसाद; सहभागींची संख्या ६५ हजारांपार*

7
0

*‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ स्पर्धेत नवकल्पनांना उत्स्फूर्त प्रतिसाद; सहभागींची संख्या ६५ हजारांपार*
• ३० ऑक्टोबरपर्यंत अर्जाची संधी; विद्यार्थ्यांपासून स्टार्टअप्स, संशोधक आणि सामाजिक संस्थांनाही सहभाग घेता येणार
• राष्ट्रीय सुरक्षा, शहरी स्थलांतर, कामगारांचे उष्णतेपासून संरक्षण अशा विविध क्षेत्रांतील नवकल्पनांना स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

प्रतिनिधी,

मुंबई – केंद्रीय कौशल्य विकास विभागामार्फत आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ या बहुराज्यीय नवोपक्रम स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, महाराष्ट्र झोनमधून स्पर्धेत सहभागी झालेल्यांची संख्या ६५ हजारांहून अधिक झाली आहे. वाढता प्रतिसाद लक्षात घेता या स्पर्धेसाठी ३० ऑक्टोबर २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. विविध सामाजिक आणि सार्वजनिक समस्यांवर नावीन्यपूर्ण व व्यवहार्य उपाय शोधणे, हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे. राष्ट्रीय सुरक्षा, शहरी स्थलांतर, कामगारांचे उष्णतेपासून संरक्षण अशा विविध क्षेत्रांतील नवकल्पनांना स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’ या स्पर्धेमध्ये राष्ट्रीय सुरक्षेसमोरील संभाव्य धोके (उदा. सोशल मीडियाचा गैरवापर, बेकायदेशीर परदेशी निधीपुरवठा), शहरी लोकसंख्येतील बदल व स्थलांतर आणि लोकसंख्येच्या स्थलांतरित प्रवाहांवर लक्ष ठेवणे , कष्टकरी कामगारांचे उष्णतेपासून संरक्षण तसेच संबंधित क्षेत्रांत कार्यरत व्यक्ती, व्यावसायिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांना एका छत्राखाली आणणे आणि इतर अशा विषयांवरही नावीन्यपूर्ण संकल्पना मांडता येणार आहेत. तसेच पाच या क्षेत्राला स्पर्धकांकडून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

आतापर्यंत महाराष्ट्र, गोवा, छत्तीसगड आणि दादरा व नगर हवेली आणि दीव-दमण या केंद्रशासित प्रदेशातून म्हणजेच महाराष्ट्र झोनमधून ६५ हजारांहून अधिक नोंदणी झाली असून, यामध्ये ४८,६८० संघांचा सहभाग झाला आहे. तसेच, ३,७८७ महिलांनी आणि १८ वर्षांखालील २,०४४ स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. याशिवाय, १२,६०४ नोंदणी सामान्य प्रवर्गातून झाली असून, एकूण ७,९५२ कल्पना सादर करण्यात आल्या आहेत.

कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’साठी २१ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. नवोन्मेषक, विद्यार्थी, विद्यार्थी गट, संशोधक, प्राध्यापक, स्टार्टअप्स, सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई), कंपन्या, सामाजिक संस्था तसेच शैक्षणिक व संशोधन संस्थांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. समाजासमोरील प्रश्नांची ओळख करून त्यावर तंत्रज्ञानाधारित आणि प्रत्यक्षात उपयोगी पडणारे उपाय विकसित करण्यासाठी ही स्पर्धा महत्त्वाची संधी आहे. सध्या महाराष्ट्र झोनमधून स्पर्धेत सहभागी झालेल्यांची संख्या ६५ हजारांहून अधिक झाली आहे. तरी ३० ऑक्टोबरपर्यंत हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

शेती, पाणी, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, पर्यावरण आणि वाहतूक यांसारख्या दैनंदिन जीवनाशी निगडित समस्यांवर विद्यार्थ्यांनी व्यवहार्य उपाय सुचवावेत, असे आवाहनही करण्यात आले आहे. स्वयंसेवी संस्थांनी विद्यार्थ्यांना स्थानिक समस्या ओळखण्यापासून ते उपाय विकसित करून स्पर्धेसाठी अर्ज सादर करण्यापर्यंत मार्गदर्शन करावे. तसेच आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांची संख्या, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट, माहिती देण्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या आणि सादर होणाऱ्या दर्जेदार अर्जांची संख्या याबाबत स्पष्ट कृती आराखडा तयार करावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

चौकट

*कुठे अर्ज करणार?*

तळागाळातील विद्यार्थ्यांच्या कल्पनांना व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शासन, शाळा आणि स्वयंसेवी संस्थांनी समन्वयाने काम करणे आवश्यक असल्याचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी नमूद केले. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी https://sevainnovationchallenge.in/ या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करावा.
……………………..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here