ज्येष्ठ पत्रकार प्रताप आसबे यांच्या निधनाने समतावादी विचारांचा तळमळीचा पत्रकार कार्यकर्ता गमावला : डॉ. नीलम गोऱ्हे
सन्माननीय प्रताप आसबे यांचा आणि माझा जवळजवळ पाच दशकांचा परिचय होता. १९७६ च्या सुमारास नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीण येथे युवक क्रांती दलाच्या ‘राशीण कम्यून’मध्ये आम्ही एकत्र काम केले. रोजगार हमी योजनेच्या कामांना भेटी देणे, गरिबांना सावकारीच्या पाशातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे, महिला व पुरुष शेतमजुरांना समान वेतन मिळावे यासाठी लढा देणे आणि जातीयतेविरोधात आवाज उठवणे, अशा विविध कामांमध्ये आम्ही सहभागी होतो.
१९८४ नंतर संघटनेत विविध राजकीय प्रवाह निर्माण झाले. त्यानंतरच्या काळात त्यांच्याशी प्रामुख्याने पत्रकार म्हणून संवाद राहिला. अनेक पत्रकार परिषदा, राजकीय आणि सामाजिक कार्यक्रमांच्या निमित्ताने आमचा संपर्क कायम होता. त्यांच्या लेखनाकडे आणि समीक्षेकडे माझे सातत्याने लक्ष असे.
प्रताप आजबे यांच्या लेखनावर त्यांच्या वैचारिक भूमिकेचा ठसा होता. सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन जातीयतेला विरोध करणारा, समतावादी आणि समताधिष्ठित होता. पत्रकारितेत कार्यरत असतानाही सामाजिक प्रश्नांशी असलेली त्यांची बांधिलकी कायम राहिली. त्यामुळे त्यांचे वर्णन मी ‘पत्रकार कार्यकर्ता’ असे करीन.
अतिशय तळमळीने काम करणारा एक मित्र आपण गमावला आहे. त्यांच्या निधनामुळे झालेल्या दुःखाचे शब्दांत वर्णन करणे कठीण आहे.
शिवसेनेची नेता, स्त्री आधार केंद्राची अध्यक्ष, विधान परिषदेची सदस्य आणि युवक क्रांती दलाची माजी कार्यकर्ती या नात्याने मी आसबे यांच्या कुटुंबीयांच्या आणि सर्व मित्रमैत्रिणींच्या दुःखात सहभागी आहे.
प्रताप आसबे यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
डॉ. नीलम गोऱ्हे
सदस्य, महाराष्ट्र विधान परिषद
नेता, शिवसेना
अध्यक्ष, स्त्री आधार केंद्र
























