Home नाशिक राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ; संतांच्या पायाशी नतमस्तक होऊन राज्यकारभार चालवणे हाच आमचा संस्कार*...

राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ; संतांच्या पायाशी नतमस्तक होऊन राज्यकारभार चालवणे हाच आमचा संस्कार* *१३ आखाड्यांच्या भोजनाची जबाबदारी शिवसेनेची*

22
0

*राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ; संतांच्या पायाशी नतमस्तक होऊन राज्यकारभार चालवणे हाच आमचा संस्कार*

*१३ आखाड्यांच्या भोजनाची जबाबदारी शिवसेनेची*

*शेतकरी मुलींची लग्ने, बाधितांचे पुनर्वसन आणि पक्क्या घरांची ग्वाही*

*त्र्यंबकेश्वरच्या संत संमेलनातून एकनाथ शिंदेंचा राज्यकारभाराचा ‘धर्मसंस्कार’ स्पष्ट*

नाशिक-त्र्यंबकेश्वर, ता. 26 :

“राजसत्तेपेक्षा धर्मसत्ता श्रेष्ठ आहे. संतांच्या पायाशी नतमस्तक होऊन राज्यकारभार चालवणे हाच आमचा संस्कार आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्र्यंबकेश्वर येथे आयोजित संत संमेलनात ते बोलत होते.
भगवान त्र्यंबकेश्वर व गोदामाईच्या चरणी वंदन करून त्यांनी देशभरातून आलेल्या संत-महंतांना अभिवादन केले.

“साधू-संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आज संतांच्या माध्यमातून खरी दिवाळी साजरी होत आहे. हे केवळ राजकीय किंवा सामाजिक संमेलन नसून आध्यात्मिक ऊर्जेचा उत्सव आहे,” असे शिंदे म्हणाले. बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांनी राजकारण हे समाजकारण, राष्ट्रसेवा आणि राष्ट्ररक्षणासाठी करण्याचा संस्कार दिला. राजसत्ता हातात असली तरी अध्यात्मिक व धर्मसत्ता मोठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि समर्थ रामदास यांच्या संस्कारांनी महाराष्ट्र घडला. संतांनी भक्तीसोबत माणुसकी, समता आणि समाजसेवा शिकवली. “जे का रंजले गांजले…” या संत तुकारामांच्या विचाराचा दाखला देत गरजूंची सेवा हाच खरा धर्म असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार पूर्ण ताकदीने त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत दुष्काळामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी शिवसेना मदत करणार, अशी घोषणा त्यांनी केली. कुंभमेळा हा केवळ श्रद्धेचा सोहळा नसून पर्यटन, व्यापार, रोजगार, पायाभूत सुविधा आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारा महोत्सव असल्याचे त्यांनी सांगितले.
१३ आखाड्यांतील संत-महंत आणि साधूंच्या भोजनाची व्यवस्था शिवसेनेच्या वतीने केली जाणार असल्याचेही शिंदे यांनी जाहीर केले. “संतांची सेवा करणे हे आमचे भाग्य आहे,” असे ते म्हणाले.

कुंभाच्या कामांमुळे बाधित होणाऱ्या कुटुंबांना पक्की घरे देऊन पुनर्वसन केले जाईल; कुणावरही अन्याय होणार नाही. व्यापारी, दुकानदार आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास सरकार मोबदला देईल. साधुग्रामच्या भूसंपादनासंदर्भातील तक्रारीही सोडवल्या जातील. त्र्यंबकेश्वर स्टेडियमसाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू असून निधीचे नियोजन करण्यात आले आहे. नगरपरिषद प्रशासकीय भवनासाठी आवश्यक निधी देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

“माझ्या संपूर्ण राजकीय-सामाजिक जीवनातील हा पहिलाच आणि अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. संत-महंतांचा सन्मान करण्याचे हे सौभाग्य आहे. सीएम म्हणजे कॉमन मॅन; मी कार्यकर्ता म्हणून काम केले आणि पुढेही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार,” असे शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री आणि संपूर्ण मंत्रिमंडळाच्या सहकार्याने सिंहस्थ यशस्वी करण्यासाठी सरकार पूर्ण ताकदीने काम करेल. आखाडे, साधू-महंत, भाविक आणि स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. “संतांच्या आशीर्वादाने हा कुंभ यशस्वी करू; कोणावरही अन्याय होऊ देणार नाही,” असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

संत संमेलनाला परमपूज्य जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराज, महंत महामंडलेश्वर शिवगिरी महाराज, महंत सत्यगिरी महाराज, महंत धनंजयगिरी महाराज, महंत शंकरानंद सरस्वती महाराज, महंत रमेशगिरी महाराज, महंत दुर्गानंद महाराज, महंत रामकिशोरदास शास्त्री, महंत दुर्गादास महाराज, महंत रामनवमीदास महाराज, महंत गोपालदास महाराज, संत देवेंद्रसिंह शास्त्री, धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांच्यासह विविध आखाड्यांचे महामंडलेश्वर, संत-महंत, धर्माचार्य आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी मंत्री दादा भुसे, आमदार सुहास कांदे, गोकुळ गीते, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, विनय करंजे, विजय आमले, प्रवीण आमले आदींसह स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पक्षपदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here