Home Uncategorized *सातत्याने कोसळणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर अविरतपणे आणि...

*सातत्याने कोसळणाऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर अविरतपणे आणि तत्परतेने कार्यरत*

55
0

*रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतूक सुरळीतपणे सुरु*

*पाणी साचण्याची अथवा अन्य कोणतीही दुर्घटना उद्भवली नाही*

*पावसाळी पाणी निचऱ्याच्या कामांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना*

बृहन्मुंबई (मुंबई शहर व उपनगरे) क्षेत्रात मागील दोन दिवसांत सातत्याने पाऊस कोसळत आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेची सर्व यंत्रणा प्रत्यक्ष क्षेत्रावर अविरतपणे आणि तत्परतेने कार्यरत आहे. पर्जन्य जलवाहिन्या, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कामगार – कर्मचा-यांसह महानगरपालिकेचे अधिकारी, अभियंते, पंप ऑपरेटर, आरोग्‍य, कर्मचारी, आपत्कालीन पथके, सर्व कर्मचारी – कामगार प्रत्यक्ष स्‍थळी कार्यरत आहेत. सद्यपरिस्थितीत मुंबईतील जनजीवन सामान्य आहे. रस्ते वाहतुकीसह रेल्वे वाहतूक सुरळीतपणे सुरु आहे. आज दिवसभरात मुंबईतील कोणत्याही भागात पाणी साचल्याचे आढळून आले नाही. तसेच, दरड कोसळणे, घराची पडझड यासारखी कोणतीही दुर्घटना सुदैवाने घडली नाही.

भारतीय हवामान खात्याने शनिवार, दि. २७ सप्टेंबर २०२५ला, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात (मुंबई शहर आणि उपनगरे) मुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला होता. तर,रविवार, दि. २८ सप्टेंबर २०२५, अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला. त्याचप्रमाणे, मुंबईत सातत्याने पाऊस कोसळतो आहे.

सातत्याने सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर, वाहतूक सुरळीत सुरू ठेवणे, नागरी सेवा- सुविधांमध्ये खंड न पडू देणे, आपत्कालीन परिस्थितीमध्ये वेळीच उपाययोजना करणे आदी विविध निर्देश बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी यंत्रणेला दिले आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील आपत्कालीन नियंत्रण कक्षातून पावसाच्या स्थितीचा आणि वेळीच करावयाच्या उपाययोजनांचा आढावादेखील श्री. गगराणी यांनी घेतला आहे.

महानगरपालिकेचे सर्व संबंधित सह आयुक्त, उपआयुक्त , सहायक आयुक्त तसेच विविध विभागांचे, खात्यांचे प्रमुख त्यांच्या संबंधित कार्यक्षेत्रात लक्ष ठेवून आहेत.

पर्जन्‍य जलवाहिनी यंत्रणा, सांडपाणी व्यवस्था, उदंचन केंद्र यांसारख्या महत्त्वाच्या सेवांवर विशेष लक्ष देण्यात येऊन पावसाळी पाणी निचऱ्याच्या कामांमध्ये अडथळा येऊ नये म्हणून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करण्‍यात आल्‍या आहेत.

दोन दिवस सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर, आपत्कालीन परिस्थितीबाबत विविध यंत्रणांशी समन्वय साधण्यासाठी महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षातून तत्परतेने आणि जलदगतीने कार्यवाही करण्यात येत आहे.

*दिनांक २८ सप्टेंबर २०२५ सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेदरम्यान सर्वाधिक पावसाची (मिलिमीटरमध्ये) नोंद झालेली ठिकाणे:*

– कुलाबा अग्निशमन केंद्र- १०३.२०
– दिंडोशी अग्निशमन केंद्र- १०२. ४०
– चिंचोली अग्निशमन केंद्र- १००.८२
– बोरिवली अग्निशमन केंद्र- ९७.२०
– भायखळा अग्निशमन केंद्र- ९५.२४
– मालवणी अग्निशमन केंद्र- ९५.२०
– मागाठाणे बस आगार- ९४.२०
– कुलाबा उदंचन केंद्र- ९१.१९
– फ्रॉसबेरी जलाशय- ८४.००
– एमसीएमसीआर, पवई- ८३.८०
– एफ (उत्तर) विभाग कार्यालय- ८२.४
– पासपोली पवई महानगरपालिका शाळा- ८०.४०
– लालबहादूर शास्त्री (एलबीएस) मार्ग महानगरपालिका शाळा- ८०.२०
– टी विभाग कार्यालय- ७८.२०
– कलेक्टर कॉलनी महानगरपालिका शाळा- ७७.२०

***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here