Home Uncategorized *भीषण दुष्काळात शेतकऱ्यांना सरकारसोबत शिवसेनेचा दुहेरी आधार* *२४ ट्रक दिवाळीचा शिधा...

*भीषण दुष्काळात शेतकऱ्यांना सरकारसोबत शिवसेनेचा दुहेरी आधार* *२४ ट्रक दिवाळीचा शिधा धाराशिवकडे रवाना*

10
0

*भीषण दुष्काळात शेतकऱ्यांना सरकारसोबत शिवसेनेचा दुहेरी आधार*

*२४ ट्रक दिवाळीचा शिधा धाराशिवकडे रवाना*

*कर्जवसुलीचा तकादा लावणाऱ्या मायक्रो फायनान्स कंपन्यांना उपमुख्यमंत्री शिंदेंचा पुन्हा इशारा*

ठाणे, ता. 29 :

राज्यावर दुष्काळाचे गंभीर संकट ओढावले असून शेतकरी मोठ्या अडचणीत आहे. अशा संकटाच्या काळात सरकारची मदत तर शेतकऱ्यांना मिळेलच, पण सरकारसोबत शिवसेनाही त्याच ताकदीने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. ‘जिथे संकट, तिथे शिवसेना आणि जिथे आपत्ती, तिथे मदत’ या भूमिकेतून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे.

धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीनिमित्त शिधा घेऊन जाणाऱ्या २४ वाहनांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भगवा झेंडा दाखवून हा शिधा धाराशिवकडे रवाना केला त्यावेळी ते बोलत होते.

दसऱ्यापासूनच दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या घरोघरी दिवाळीचा शिधा पोहोचविण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून सुरू आहे. आता २४ ट्रकच्या माध्यमातून हा शिधा धाराशिव जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागात पोहोचविला जाणार आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते घराघरांत जाऊन या साहित्याचे वाटप करणार आहेत.

या शिध्यामध्ये बेसन, साखर, रवा, मैदा, तूप, रांगोळी, पणत्या आणि शिवसेनेने प्रकाशित केलेल्या खास दिनदर्शिकेचाही समावेश असणार आहे. दुष्काळामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी कुटुंबांनाही दिवाळीचा सण आनंदाने साजरा करता यावा आणि त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.

“शिवसेना घरात बसून काम करणारी संघटना नाही; लोकांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या दारात पोहोचून मदत करणारी शिवसेना आहे,” असा संदेश शिंदे यांनी यावेळी दिला. शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून दुष्काळ जाहीर झाल्यानंतर मिळणाऱ्या सर्व सवलती आणि लाभ मिळतीलच, मात्र त्याचबरोबर ५ हजार रुपयांची तातडीची मदतही शासनाकडून देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दुष्काळग्रस्त भागात केवळ अन्नधान्याचीच नव्हे, तर चारा, पाण्याचे टँकर आणि पाण्याच्या टाक्यांचीही गरज लक्षात घेऊन शिवसेनेच्या माध्यमातून मदत सुरू राहणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले. दुष्काळामुळे मुलींची लग्ने अडचणीत आलेल्या कुटुंबांनाही मदतीचा हात देण्याचे काम शिवसेनेकडून करण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, दुष्काळाचा फायदा घेत शेतकऱ्यांवर कर्जवसुलीचा तगादा लावणाऱ्या बँका, मायक्रो फायनान्स कंपन्या आणि सावकारांना शिंदे यांनी स्पष्ट इशारा दिला.

“शेतकरी संकटात असताना त्याला नाडता कामा नये. कर्जवसुलीसाठी त्रास देऊ नका. असा त्रास होत असेल तर सरकार, प्रशासन किंवा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना सांगा. संबंधितांवर कायदेशीर आणि कठोर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी बजावले.

“शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत धीर सोडू नये. हे संकट मोठे आहे. त्यामुळे लाखो हात मदतीसाठी पुढे आले पाहिजेत. शेतकरी आपला बांधव आहे; त्याला या संकटातून बाहेर काढणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे,” असे आवाहनही शिंदे यांनी केले. धाराशिवसह दुष्काळग्रस्त भागातील प्रत्येक शेतकरी कुटुंबापर्यंत ही मदत पोहोचवून “शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा” शिवसेनेचा संकल्प असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार ओमराजे निंबाळकर,
युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, नगरसेवक राकेश शिंदे, युवासेनेचे मराठवाडा समन्वयक बाजीराव चव्हाण आणि शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here