मुंबई महानगरात दि. १७ सप्टेंबर २०२५ ते दि. २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ऐच्छिक रक्तदान पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. या अंतर्गत आयोजित विविध रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या चार प्रमुख रुग्णालयांनी मिळून आतापर्यंत सुमारे ३ हजार ३५४ रक्त युनिट्सचे संकलन केले आहे. रक्तदान शिबिरांमध्ये अधिकाधिक संख्येने नागरिकांनी सहभाग घेऊन रक्तदान करावे, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.
केंद्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे देशभर राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिवस साजरा करण्यात येतो. त्यानुसार, यंदा देखील केंद्र शासनाच्या निर्देशानुसार दि. १७ सप्टेंबर २०२५ ते दि. २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ऐच्छिक रक्तदान पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. शासनाच्या निर्देशानुसार, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेमार्फत, प्रमुख रुग्णालयांमार्फत या कालावधीत मुंबई महानगरात विविध रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत. युवक वर्गाने अधिकाधिक संख्येने रक्तदान करावे म्हणून महाविद्यालयांमध्ये प्राधान्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात आहे.
याअंतर्गत, महानगरपालिकेच्या राजे एडवर्ड स्मारक (केइएम) रुग्णालयाच्या वतीने आयोजित शिबिरांमधून ८१६ युनिट्स, लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालयाच्या वतीने १,२०० युनिट्स, नायर रुग्णालयाच्या वतीने ३९६ युनिट्स आणि डॉ. कूपर रुग्णालयाच्या वतीने सुमारे ९४२ युनिट्स इतक्या संख्येने आतापर्यंत रक्तसंकलन करण्यात आले आहे.
रक्तदान शिबिरांचे आयोजन यापुढेही करण्यात येत आहे. ठिकठिकाणी आयोजित रक्तदान शिबिरांसाठी, संबंधित प्रमुख रुग्णालयाकडून मनुष्यबळ तसेच संसाधने पुरवली जात आहेत.
दरम्यान, विलेपार्ले स्थित डॉ. रु. न. कूपर रुग्णालयात रक्तपेढी येथे बुधवार दि. १ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिन निमित्ताने शपथ देखील घेतली जाणार आहे.
*ऐच्छिक रक्तदान दिवस विषयी-*
रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी ऐच्छिक रक्तदात्यांचे योगदान अधोरेखित करण्याकरिता दि. १ ऑक्टोबर हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय ऐच्छिक रक्तदान दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतातील ऐच्छिक रक्तदान चळवळीचे प्रणेते तसेच इंडियन सोसायटी ऑफ ब्लड ट्रान्सफ्यूजन अँड इम्युनोहेमॅटोलॉजीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जय गोपाल जॉली यांचा जन्म दिनांक १ ऑक्टोबर १९२६ रोजी झाला होता. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देखील हा दिवस साजरा केला जातो.
*ऐच्छिक रक्तदान संदर्भात जनजागृती-*
दरवर्षी ऐच्छिक रक्तदान दिवसाचे औचित्य साधून सुरक्षित रक्त व रक्तदाते, रुग्णालयांमध्ये पुरेसा रक्त साठा उपलब्ध असणे इत्यादी मुद्यांवर जनजागृती करण्यात येते. त्यासाठी रक्तदान शिबिर, रक्तदानाचे महत्त्व सांगणाऱ्या कार्यशाळा, व्याख्याने यांचे आयोजन केले जाते. युवकांनी रक्तदान मोहिमेत अधिकाधिक सहभागी व्हावे, यासाठी अधिक प्रयत्न केले जातात. त्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांमध्ये अधिकाधिक संख्येने रक्तदान शिबिरांचे आयोजन होते.
*रक्तदानाचे रुग्णांसाठी महत्त्व-*
रक्तदानामुळे थॅलेसेमिया, हिमोफिलिया, सिकलसेल, ल्युकेमिया तसेच अपघात, प्रसुती, अतिदक्षता, रक्तक्षय आणि अतिरक्तस्राव यासह विविध गरजू रुग्णांचे प्राण वाचविणे शक्य होते. एका व्यक्तीने फक्त ३५० मिलिलिटर रक्तदान केल्याने ४ जणांचे प्राण वाचू शकतात.
*रक्तदानाचे दात्याला होणारे फायदे-*
रक्तदानानंतर २४ तास ते ७ दिवसांत रक्ताची झीज नैसर्गिकरित्या भरून निघते. कारण, नवीन रक्तनिर्मिती होते.
बोन मॅरोमध्ये नवीन रक्तपेशी तयार होतात.
शरीरात नवीन लाल रक्तपेशी तयार होण्यास मदत होते.
रक्तदान प्रक्रियेत सुरक्षिततेचे काटेकोर पालन केले जाते, त्यामुळे कोणताही अपाय होत नाही.
रक्तदानापूर्वी आरोग्य तपासणीमुळे गंभीर आजाराची लवकर माहिती मिळते.
यकृत, मोठे आतडे, फुप्फुस व घसा यांच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.
रक्तदात्याच्या हृदयासाठी फायदेशीर ठरते.
रक्तातील कोलेस्टेरॉल कमी होते.
वजन कमी करण्यात मदत होते.
मानसिक समाधान व आनंद मिळतो.
रक्तदान केल्यानंतर, संबंधित व्यक्तीला प्रमाणपत्र आणि कार्ड प्रदान केले जाते. रक्तदान कार्डाचा महत्त्वाचा उपयोग म्हणजे संबंधित व्यक्तीला एका वर्षापर्यंत आवश्यकता भासल्यास रक्त विनामूल्य पुरवले जाते अथवा त्याचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांना गरज भासल्यास त्यांना सवलतीच्या दरात रक्त उपलब्ध करून दिले जाते.
*रक्तदान विषयी आवाहन-*
रक्तदान हे निव्वळ दान नाही, तर दुसऱ्याला नवजीवन देण्याची अद्वितीय सेवा आहे. समाजसेवा आणि राष्ट्रसेवेचा खरा अर्थ रक्तदानातून प्रकट होतो. प्रत्येक जबाबदार नागरिकाने रक्तदान करणे, हे आपले कर्तव्य मानले पाहिजे.
अनेक सेवाभावी संस्था, सामाजिक संस्था आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर पुढाकार घेऊन रक्तदान करावे, ही अपेक्षा आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने पुढाकार घेऊन या राष्ट्रीय सेवा कार्यात सहभागी व्हावे, ही बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाची नम्र विनंती आहे.
***


















