*- मंगळवार, दिनांक १ ते शुक्रवार ४ एप्रिल २०२५ दरम्यान महानगरातील क्रीडांगणांमध्ये आणि सोमवार, दिनांक ७ एप्रिलपासून पुढील १५ दिवस शाळांमध्ये राबविणार मोहीम*
*- मुंबई महानगर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचा उपक्रम*
मुंबईतील सार्वजनिक स्वच्छतेला व्यापक व लोकसहभागातून क्रियाशील स्वरुप देण्यासाठी सातत्याने विशेष स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. त्याचा पुढील टप्पा म्हणून मुंबई महानगरात सोमवार, दिनांक १ एप्रिल २०२५ पासून क्रीडांगणे आणि शाळांमध्ये ‘विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये सोमवार, दिनांक १ एप्रिल ते शुक्रवार, दिनांक ४ एप्रिल २०२५ दरम्यान महानगरातील क्रीडांगणांमध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. त्यानंतर शाळांमध्ये सोमवार, दिनांक ७ एप्रिलपासून पुढील १५ दिवस (दर आठवड्याला सोमवार ते शुक्रवार) ही मोहीम राबविली जाणार आहे.
मुंबई महानगर स्वच्छ आणि सुंदर रहावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपाययोजना हाती घेण्यात येत आहेत. त्या अंतर्गतच महानगरपालिकेच्या संपूर्ण २४ प्रशासकीय विभागांमध्ये साततत्यान स्वच्छतेविषयी जनजागृती केली जाते. या मोहिमेत आता शैक्षणिक संस्था आणि क्रीडांगणांवरही लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे, अशी माहिती उप आयुक्त (घन कचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर यांनी दिली.
विशेष स्वच्छता मोहिमेच्या या टप्प्यात सोमवार, दिनांक १ एप्रिल ते शुक्रवार, दिनांक ४ एप्रिल २०२५ दरम्यान आझाद मैदान, क्रॉस मैदान, ओव्हल मैदान, छत्रपती शिवाजी महाराज मैदान, सोमय्या मैदान, अंधेरी क्रीडा संकुल, कोरा केंद्र (बोरिवली), मुलुंड क्रीडा संकूल येथे स्वच्छता करण्यात येणार आहे.
तसेच सोमवार, दिनांक ७ एप्रिल २०२५ पासून पुढील १५ दिवस महानगरपालिका शाळांमध्ये ही मोहीम राबविण्यात येणार आहे. यासह सर्व शासकीय शाळा, शैक्षणिक संस्था, खासगी शाळांमध्येही स्वच्छता मोहीम घेण्यात येणार आहे. क्रीडांगणांमधील स्वच्छता मोहीम संबंधित प्रशासकीय विभागांद्वारे (वॉर्ड) आयोजित केली जाईल. प्रत्येक वॉर्ड या मोहिमेदरम्यान स्वच्छता आवश्यक असलेल्या ठिकाणांना प्राधान्य देणार आहे. यात खेळाचे मैदान, शाळेचा परिसर, वाहनतळ, कचर संकलनाचे ठिकाण आणि पदपथ यांचा समावेश असेल.
शाळा आणि क्रीडांगणांवर दररोज सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत ही मोहीम पार पाडणार आहे. या मोहिमेत महानगरपालिकेचा घनकचरा व्यवस्थापन विभाग, शाळ प्रशासन, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, राष्ट्रीय सेवा योजना, शालेय विद्यार्थी (इयत्ता ८ वी वर्गापुढील), महाविद्यालयीन विद्यार्थी, स्वयंसहायता गट (एसएचजी), गृहनिर्माण संस्था आणि सामाजिकदृष्ट्या सक्रिय नागरि आदींना सहभागी करून घेतले जाणार आहे.
या मोहिमेत मेकॅनिकल पॉवर स्वीपर, कचरा वेचक, मिस्टिंग मशीन, डंपर, जेसीबी, पाण्याचे टँकर आणि फायरएक्स उपकरणांचा वापर केला जाणा आहे.
**



















