*गोसेवा करणाऱ्या गोरक्षकांना गरज पडेल तिथे सुरक्षा देणार*
*रामगिरी महाराजांना ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार’ प्रदान*
*छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिवादन*
पुणे (वढू) :- छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले राज्यातील सर्व गडकोट किल्ले कायमचे अतिक्रमणमुक्त करण्याला प्रधान्य देण्यात येईल, तसेच गोसेवा करणाऱ्या गोरक्षकांना गरज लागेल तेव्हा संरक्षण दिले जाईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. छत्रपती संभाजी महाराजांच्या 336 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यासाठी वढू येथे आले असता शिंदे यांनी हे वक्तव्य केले.
‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजां’च्या बलिदान दिनानिमित्त त्यांनी महाराजांच्या समाधीवर फुले अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले. तसेच तुळापूर येथील त्यांचा स्मारकाला आणि कवी कलश यांच्या समाधीचे देखील त्यांनी दर्शन घेऊन त्यांनाही विनम्र अभिवादन केले. यानंतर आयोजित केलेल्या कार्यक्रमात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजां’च्या नावे दिला जाणारा ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुरस्कार’ यंदा परमपूज्य रामगिरी महाराजांना शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच यावेळी इतर पुरस्कारांचे देखील वितरण करण्यात आले.
यावेळी बोलताना, शिंदे यांनी छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माच्या रक्षणासाठी आपले बलिदान दिले म्हणून आज हिंदू धर्म शाबूत आहे. आज त्याच कर्तव्यभावनेतून आपण सारे इथे त्यांना अभिवादन करण्यासाठी जमलो आहोत असे सांगितले. आजच्या शुभदिनी रामगिरी महाराजांना हा पुरस्कार मिळाल्याने हिंदू धर्मासाठी त्यांनी सुरू केलेल्या लढ्याला अधिक बळ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली. मी मुख्यमंत्री असताना मी नाशिक येथील त्यांच्या कार्यक्रमाला गेलो तेव्हा प्रचंड गदारोळ झाला होता. मात्र तेव्हाही राज्यात जोवर महायुती सरकार आहे तोपर्यंत साधू-संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही असे मी सांगितले होते त्याची आठवण शिंदे यांनी करून दिली. देशात गोमातेला ‘राज्य माते’चा दर्जा देणारे पहिले राज्य आपले होते. गोसेवा करण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय देखील महायुती सरकारनेच घेतला होता. यापुढे गोरक्षा करणाऱ्या कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी देखील दूर करून त्यानाही गरज पडेल तेव्हा संरक्षण दिले जाईल असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
मी मुख्यमंत्री असताना वढू आणि तुळापूर येथील स्मारकासाठी 400 कोटी रुपये मंजूर केले होते. इथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य असे स्मारक उभारणे त्यात प्रस्तावित आहे. या प्रकल्पाचा विकास आराखडा तयार असून लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल. त्यासाठी निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही यावेळी बोलताना दिली.
याठिकाणी आज ‘जय श्रीराम’च्या घोषणा देखील दिल्या गेल्या, मात्र देशात राम मंदिर बांधण्याचे स्वप्न आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले. काही जण तेव्हा ‘मंदिर वही बनाएंगे, तारीख नही बताएंगे’ म्हणत त्यांची खिल्ली उडवली मात्र पंतप्रधानांनी तारीख जाहीर करून मंदिर उभारून दाखवले असेही यावेळी शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
ज्या मातीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे रक्त सांडले तिथेच जमलेल्या मावळ्यांनी आज रक्तदानाचा महायज्ञ देखील सुरू केलाय ही समाधानाची बाब आहे. आज इथे जमलेले 5 हजारांहून अधिक तरुण या महायज्ञात सहभागी झाले आहेत. जे इथे आज रक्तदान करतील त्यांच्या शरीरात देशभक्तीचा अंश नक्कीच जाईल असा विश्वास व्यक्त करत असल्याचे सांगितले.
तसेच राज्यातील शिवकालीन गडकोट किल्ल्यांना अतिक्रमणमुक्त करण्याला आमच्या सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून सर्व किल्ले अतिक्रमणमुक्त केले जातील असे देखील यावेळी सांगितले.
यावेळी श्री क्षेत्र तुकाराम महाराज मंदिर समितीचे
माणिकराव महाराज मोरे,
पुरुषोत्तम महाराज मोरे, आमदार माऊली कटके, माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील,धर्मवीर अध्यात्मिक आघाडीचे अक्षय महाराज भोसले, शिवसंग्रामचे मिलिंद एकबोटे,धर्मवीर संभाजी महाराज स्मृती समितीचे सोमनाथ भंडारे,वास्तूतज्ञ आनंद पिंपळकर,संदीप मोहिते पाटील वढू ग्रामपंचायटीचे सन्माननीय सदस्य आणि राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले तमाम शिवशंभू भक्त उपस्थित होते.





















