*अंबुजा व एसीसी सिमेंटच्या कंत्राटी कामगारांच्या वेतनात मोठी वाढ,दिवाळीपूर्वी थकबाकी व बोनस मिळणार!*
*काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने कामगारांना मोठा दिलासा*
चंद्रपूर, दि. २५ –
अंबुजा सिमेंट्स लिमिटेड आणि एसीसी सिमेंट्स लिमिटेडमधील कंत्राटी कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. या कामगारांच्या रोजंदारीत कौशल्यानुसार मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, १ एप्रिल २०२६ पासूनची वेतनवाढीची थकबाकी आणि वार्षिक बोनस दिवाळीपूर्वी कामगारांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे कामगारांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या वेतनवाढीच्या प्रश्नाला मार्ग मिळाला आहे.
अंबुजा सिमेंट्स लिमिटेड व एसीसी सिमेंट्स लिमिटेडचे व्यवस्थापन आणि विजयक्रांती कंत्राटी कामगार युनियन यांच्यात झालेल्या दीर्घ चर्चेनंतर कंत्राटी कामगारांच्या रोजंदारीत वाढ करण्यावर सहमती झाली आहे. या निर्णयामुळे हजारो कंत्राटी कामगारांना आर्थिक दिलासा मिळणार असून, दिवाळीचा सण अधिक आनंदात साजरा करता येणार आहे.
चर्चेअंती मंजूर करण्यात आलेली वाढ ही
कुशल कामगार प्रतिदिन १३० रुपये वाढ
अर्धकुशल कामगार प्रतिदिन १२५ रुपये वाढ तर
अकुशल कामगार प्रतिदिन १२० रुपये वाढ
हा सामंजस्य करार १ एप्रिल २०२६ ते ३१ मार्च २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे. कराराला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी उपकामगार आयुक्त, नागपूर यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत त्यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात येणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
तसेच, १ एप्रिल २०२६ पासूनची वेतनवाढीची थकबाकी आणि वार्षिक बोनस दिवाळीपूर्वी कामगारांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणार आहे. औद्योगिक विवाद कायदा, १९४७ मधील तरतुदींनुसार उपकामगार आयुक्त कार्यालयात या कराराच्या अधिकृत नोंदणीची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.
कराराच्या कालावधीत कारखान्यात शिस्त, उत्पादनक्षमता आणि औद्योगिक शांतता कायम राखण्याची ग्वाही कामगार संघटनेने दिली आहे.
दीर्घकाळापासून प्रलंबित असलेला वेतनवाढीचा प्रश्न उपकामगार आयुक्तांच्या मध्यस्थीने आणि कामगार संघटना व व्यवस्थापन यांच्यातील चर्चेतून मार्गी लागल्याने कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. वेतनवाढीचा लाभ, थकबाकी आणि वार्षिक बोनस मिळणार असल्याने कामगारांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे.
या चर्चेला एसीसी-अंबुजा-अदानी सिमेंटचे सीएमओ सत्यानारायण, युनिट हेड राम बुआ, एचआर हेड आनंद कुलकर्णी तसेच अंबुजा-एसीसी सिमेंट ठेकेदारी कामगार युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते.























