*जनतेच्या ठेवींच्या सुरक्षिततेची चिंता, महागाईचा भडका, सरकार मात्र व्यापारी हित जपण्यात व्यस्त काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार*
*चंद्रपुरात वडेट्टीवार यांनी पदवीधर निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिक्षक मतदारांशी साधला संवाद*
चंद्रपूर, दि. १९ :
वाढती महागाई, सर्वसामान्यांच्या बचतीच्या सुरक्षिततेबाबत निर्माण झालेली चिंता आणि जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचे होत असलेले दुर्लक्ष यावरून काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला. तुमच्या ठेवी सुरक्षित नाहीत, महागाई प्रचंड वाढली आहे, मात्र सर्वसामान्यांना दिलासा देण्याऐवजी सरकार व्यापारी हित जोपासण्यात व्यस्त आहे, अशा शब्दांत त्यांनी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली.
महाविकास आघाडीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांच्या प्रचारार्थ चंद्रपूर येथील हिंदी सिटी हायस्कूलमध्ये शिक्षक मतदारांशी संवाद साधण्यात आला. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी शिक्षकांचे प्रश्न, शिक्षण क्षेत्रातील आव्हाने आणि सर्वसामान्यांच्या आर्थिक परिस्थितीवर भाष्य केले.
दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या वाढत्या किमती, वाढता घरखर्च आणि आर्थिक असुरक्षितता यामुळे सामान्य कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे. एकीकडे नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत असताना दुसरीकडे त्यांच्या आर्थिक हिताला प्राधान्य देण्याबाबत सरकार उदासीन असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली.
सर्वसामान्यांच्या बचतीचे काय? वाढत्या महागाईतून जनतेला दिलासा कधी? सरकारच्या आर्थिक धोरणांचा फायदा नेमका कोणाला होतोय? असे सवाल उपस्थित करत त्यांनी भाजप सरकारच्या जनविरोधी धोरणांवर बोट ठेवले. जनतेच्या आर्थिक सुरक्षिततेला आणि मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
शिक्षक आणि पदवीधर हे समाजाच्या शैक्षणिक, बौद्धिक आणि सामाजिक विकासाचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि हक्कांना विधान परिषदेत प्रभावीपणे वाचा फोडणारे प्रतिनिधित्व मिळणे आवश्यक आहे, अस वडेट्टीवार म्हणाले.
शिक्षण क्षेत्रातील अडचणी, शिक्षकांच्या अपेक्षा, रोजगाराचे प्रश्न आणि पदवीधरांसमोरील आव्हाने यावर शिक्षक मतदारांशी थेट संवाद साधण्यात आला. पदवीधर मतदारसंघ हा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून शिक्षण, रोजगार आणि लोकशाहीतील उत्तरदायित्वाच्या प्रश्नांना न्याय मिळवून देणारे महत्त्वाचे व्यासपीठ असल्याचेही या संवादातून अधोरेखित झाले.
महाविकास आघाडीचे उमेदवार ॲड. अभिजित वंजारी यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने झालेल्या या संवादाला शिक्षक व पदवीधर मतदारांचा प्रतिसाद लाभला.
यावेळी शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनायक बांगडे, महिला आघाडीच्या चंद्रपूर शहराध्यक्ष चंदा वैरागडे, रामू तिवारी, प्राचार्य नरेंद्र बोबडे, अनिल शिंदे, राजेश अडूर, रमीज शेख आणि मुख्याध्यापिका मिश्रा उपस्थित होते.




















