*कोरोनापेक्षा दुष्काळाची स्थिती भयंकर असं मंत्री म्हणतात म्हणजे सरकारला उशिरा जाग आली,जनतेच्या होणाऱ्या स्थितीला सरकार जबाबदार, वडेट्टीवार यांची टीका*
*ज्ञानेश कुमार यांना एक मिनिटही पदावर राहण्याचा अधिकार नाही ,काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार*
नागपूर, दि.६ : महाराष्ट्रातील दुष्काळ स्थितीवरून काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. कोरोनापेक्षा दुष्काळाची परिस्थिती गंभीर आहे अस सरकारमधील मंत्री म्हणत आहे,तर ही परिस्थिती इतकी गंभीर होईपर्यंत सरकारने काय केले, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.
अल निनोमुळे पावसावर परिणाम होणार आणि पाणीटंचाई निर्माण होऊ शकते, याची सरकारला आधीपासून कल्पना होती. मग पाणी, चारा आणि शेतीच्या प्रश्नांवर आधीच उपाययोजना का करण्यात आल्या नाहीत? तहान लागली की विहीर खोदायची, ही सरकारची कार्यपद्धती आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
राज्यातील परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता सरकारने १६ ऑक्टोबरपासून किमान १० टक्के पाणी कपातीचे आदेश दिले आहेत. दुष्काळामुळे जनतेचे जे हाल होत आहे त्याला सरकारच जबाबदार आहे अस वडेट्टीवार म्हणाले.
जलसंधारणावर ३८ हजार कोटी रुपये खर्च करूनही महाराष्ट्र दुष्काळाच्या संकटात का सापडला? असा सवाल करत वडेट्टीवार यांनी या खर्चाची चौकशी करण्याची मागणी केली. दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याच्या घोषणा करण्यात आल्या होत्या, मग आज राज्यातील जनतेला पाणीटंचाईचा सामना का करावा लागत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
इंडिया आघाडीच्या खासदारांनी आज निवडणूक आयोगाविरोधात काढलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवार यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावरही टीका केली. SIR आणि Form 6 संदर्भातील निर्णयांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने Form 6 मधील बदलांना मान्यता दिलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हे बदल कोणाच्या अधिकाराने करण्यात आले? यामुळे ज्ञानेश कुमार यांना निवडणूक आयुक्तपदी एक मिनिट राहण्याचा अधिकार नाही. मोदी सरकारला जनाची नाही तर मनाची असेल तर त्यांनी ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घेतला पाहिजे अशी टीका काँग्रेस विधिमंडळ नेते वडेट्टीवार यांनी केली.
मतदार यादी आणि मतदान प्रक्रिया ही लोकशाहीची अत्यंत महत्त्वाची व्यवस्था आहे. त्यामध्ये पारदर्शकता आणि निष्पक्षता असली पाहिजे. SIR प्रक्रियेबाबत विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाने स्पष्ट उत्तरे द्यावीत, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.
ज्ञानेश कुमार यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. भाजपने त्यांचा वापर करून बिहार, पश्चिम बंगाल निवडणुका जिंकल्या.
इंडिया आघाडीचा हा लढा एखाद्या व्यक्तीविरोधातील नसून मतदारांच्या अधिकारांचे आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेचे रक्षण करण्यासाठी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आज दिल्लीमध्ये विरोधी पक्षांच्या खासदारांचा मोर्चा निवडणूक आयोगाच्या कार्यालयाकडे काढण्यात आला असून, ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.
MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या कार्यकाळातील गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने राज्यपालांकडे शिफारस केली आहे. आता चौकशी होईल पुन्हा त्यात वेळ जाईल त्यामुळे वेळकाढूपणा न करता अध्यक्षांवर कारवाई झाली पाहिजे अस वडेट्टीवार म्हणाले.
विद्यार्थी अनेक दिवसांपासून रस्त्यावर आहेत. त्यांच्या आंदोलनाकडे राजकीय आकसाने न पाहता त्यांच्या मागण्यांवर तातडीने निर्णय घ्या. MPSC चौकशीला वेळ लागणार असेल तर विद्यार्थ्यांचा विश्वास कसा टिकवणार, याचाही सरकारने विचार केला पाहिजे, असे वडेट्टीवार म्हणाले.























