*मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून पहिली मोदी एक्सप्रेस सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना!*
*मंत्री नितेश राणे यांनी दादर रेल्वे स्थानकावर दाखवला झेंडा*
*चाकरमानी गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
मुंबई : गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासीय चाकरमान्यांसाठी सोडण्यात आलेली दादर ते सावंतवाडी मोदी एक्सप्रेस आज दुपारी १२ वाजता दादर रेल्वे स्थानकावरून सिंधुदुर्गच्या दिशेने रवाना झाली.
गणेशभक्तांच्या उत्साहात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात मोदी एक्सप्रेसने कोकणाकडे प्रस्थान केले. यावेळी मंत्री नितेश राणे यांनी दादर रेल्वे स्थानकावर मोदी एक्सप्रेसला झेंडा दाखवला.
गणेशोत्सवाच्या काळात रेल्वेचे आरक्षण मिळणे कठीण होते. त्यातच खासगी वाहनांचे वाढलेले प्रवासभाडे यामुळे चाकरमान्यांसमोर मोठे आव्हान निर्माण होते. अशा परिस्थितीत मोदी एक्सप्रेसच्या माध्यमातून गणेशभक्तांना मोफत आणि सुखकर प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
चाकरमान्यांचा प्रवास सुरक्षित, आरामदायी आणि सुलभ व्हावा, या उद्देशाने मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून हा उपक्रम गेली १४ वर्षे सातत्याने राबविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, गणेशभक्तांसाठी ही मोफत प्रवासाची सुविधा मंत्री नितेश राणे यांनी स्वखर्चाने उपलब्ध करून दिली आहे.
दरम्यान, दुसरी मोदी एक्सप्रेस रविवार, १३ सप्टेंबर रोजी कोकणाच्या दिशेने रवाना होणार आहे.
गेली अनेक वर्षे गणेशोत्सवाच्या काळात चाकरमान्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाबद्दल गणेशभक्तांनी समाधान व्यक्त केले असून, मंत्री नितेश राणे यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.




















