Home आरोग्य / पर्यावरण कोसबी-फुरूस विद्यालयात रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न

कोसबी-फुरूस विद्यालयात रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न

13
0

कोसबी-फुरूस विद्यालयात रानभाजी महोत्सव उत्साहात संपन्न
रानभाज्यांचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून देत पारंपरिक व पौष्टिक आहाराचा संदेश
सह्याद्री शिक्षण संस्था, सावर्डे संचलित शावजीराव लक्ष्मणराव निकम माध्यमिक विद्यालय, कोसबी-फुरूस येथे विद्यार्थ्यांना स्थानिक जैवविविधता, पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि रानभाज्यांचे आरोग्यविषयक महत्त्व समजावे, या उद्देशाने रानभाजी महोत्सवाचे आयोजन उत्साहात करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रानभाज्यांचे महत्त्व स्पष्ट करणाऱ्या भित्तीपत्रकाचे अनावरण सृष्टी ज्ञान संस्था, देवरुखचे अध्यक्ष कुणाल अनेराव यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर रानभाजी महोत्सवाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोज जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी परिसरात सहज उपलब्ध होणाऱ्या विविध रानभाज्यांची माहिती संकलित करून त्यांचे आकर्षक प्रदर्शन मांडले. या प्रदर्शनामध्ये अळू, भारंगी, शेवगा, फोडशी, टाकळा, केळीचा कोका, कडीपत्ता, आळंबी अशा विविध रानभाज्यांचा समावेश होता. प्रत्येक भाजीची ओळख, तिचे स्थानिक महत्त्व तसेच पारंपरिक पद्धतीने तिचा केला जाणारा उपयोग याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती जाणून घेतली.
यावेळी सृष्टी ज्ञान संस्था, देवरुखचे अध्यक्ष कुणाल अनेराव यांनी विद्यार्थ्यांना रानभाज्यांचे महत्त्व समजावून सांगितले. आपल्या परिसरातील अनेक रानभाज्या नैसर्गिकरीत्या उपलब्ध असून त्या आपल्या पारंपरिक आहाराचा महत्त्वाचा भाग आहेत. रानभाज्यांमध्ये विविध पोषक घटक आढळतात. त्यामुळे स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या या नैसर्गिक संपत्तीचे संवर्धन करणे आणि पुढील पिढीपर्यंत तिची माहिती पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
रानभाजी महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ विविध भाज्यांची ओळख झाली नाही, तर निसर्गाशी असलेले आपले नाते, स्थानिक जैवविविधतेचे महत्त्व आणि पारंपरिक खाद्यसंस्कृतीचे जतन याचीही जाणीव झाली. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत विविध रानभाज्या संकलित करून त्यांचे प्रदर्शन मांडल्याने महोत्सवाला विशेष रंगत आली.
विद्यालयाच्या वतीने अशा उपक्रमांचे आयोजन केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षणशक्ती, माहिती संकलन, सादरीकरणाची कला तसेच पर्यावरणाविषयीची जागरूकता वाढण्यास मदत होते. ‘स्थानिक अन्न, पारंपरिक ज्ञान आणि निरोगी जीवनशैली’ हा संदेश या महोत्सवातून देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सोमनाथ भिंगे यांनी केले. शिक्षक, विद्यार्थी आणि उपस्थित मान्यवरांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे रानभाजी महोत्सव आनंददायी आणि ज्ञानवर्धक वातावरणात संपन्न झाला.
रान भाज्या महोत्सव यशस्वी होण्यासाठी विद्यालयातील विठोबा जाधव, शंकर गावडे, विना शिरकर, सचिन पोकळॆ व रणवीर मोरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

प्रतिनिधी :- उमेश मोहिते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here