शिक्षण संवाद २०२६ (विचार मंथन सोहळा)
***************************************
महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री माननीय श्री दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून शिक्षण संवाद 2026 हा कार्यक्रम मुंबईच्या बालभवन येथे २२ जुलै रोजी संपन्न झाला.
यंदाच्या वर्षी पासून नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात बदल संभवत आहे.नवे अभ्यासक्रम राबवताना शाळेने,शिक्षकांनी शिक्षणाच्या नव्या पद्धती, अध्यापनाच्या नव्या वाटा शोधून ,अत्याधुनिक नव्या तंत्राची शिक्षण व्यवस्था अंगिकारावी तसेच मुलांसाठी आवश्यक असणारे नवे विषय नव्या पद्धतीने कसे शिकवता येतील,याबद्दल विचारमंथन व्हावे आणि पुढील कृती कार्यक्रम तयार व्हावा या अनुषंगाने “शिक्षण संवाद” हा चर्चात्मक कार्यक्रम शिक्षण विभाग आणि जवाहर बाल भाव यांच्यातर्फे पार पडला.
“शालेय स्तरावर कला, क्रीडा, अभिनय उपक्रम ”
या विषयावर विचार मांडण्यासाठी बाल भवन तर्फे वक्ता म्हणून मला आमंत्रण मिळाले. मिळालेल्या संधीचा उपयोग करून घेत मी माझे विचार मांडले.शक्य असणाऱ्या उपाययोजना सुचवल्या.
शालेय शिक्षणात कलेचे महत्व जागतिक शिक्षण व्यवस्थेने स्वीकारले आहे. कला शिक्षणाने मुलांचे सर्वागीण व्यक्तिमत्व बहरते.
कला शिक्षण हा विषय २००८ पासून अभ्यासक्रमात समाविष्ट होता. चित्र- शिल्प, गायन वादन, नृत्य आणि नाट्य या सहा कलांचे प्राथमिक ज्ञान मुलांना देणे अनिवार्य होते.परंतु त्या त्या कलांचे शिक्षक शाळा उपलब्ध करून देऊ शकल्या नाही. मुख्य विषयांच्या मार्कांच्या शर्यतीत ‘कला” आणि “क्रीडा” विषयांकडे शाळांनी आणि पालकांनी पार दुर्लक्ष केले.दोन पिढ्या नृत्य, नाट्य, गायन,वादन या कलांचा शिक्षणापासून वंचित राहिल्या. कारण शाळा चालक आणि पालकांची उदासीनता…पण आता तसे घडू नये यासाठी शिक्षण विभागाने तयारी सुरू केली आहे.
चर्चा सत्र सुरू असताना मा. मंत्री साहेबांची उपस्थिती होतीच…सोबत शिक्षण आयुक्त सछिंद्रप्रताप सिंह, बालभवन संचालिका नीता पाटील यांचेसह राज्यातील मान्यवर शिक्षण तज्ञ उपस्थित होते.राज्यातील विविध विषयांचे मान्यवर शिक्षक आवर्जून उपस्थित राहिलेले.
वेगवेगळ्या सहा विषयांवर सहा चर्चा सत्र पार पडली.
“कला शिक्षण “यंदाच्या वर्षीपासून राज्याच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाला आहे. इयत्ता तिसरी,चौथी आणि सहावी करीता पाठ्यक्रम पुस्तके तयार झाली असून ती बाजारात उपलब्ध आहेत.हा विषय उत्तीर्ण करणे आवश्यक असल्याने शाळांना आता ‘कला शिक्षण ‘ऑप्शन ला टाकता येणार नाही.संगीत,नृत्य आणि नाट्य शिक्षकांची गरज या निमित्ताने निर्माण झाली आहे.ही गरज नव्या भरती करून भरून काढण्यासाठी शिक्षण विभाग कटिबद्ध आहे .भविष्यात टप्याटप्याने कला शिक्षकांची राज्यातील शाळेत भरती केली जाणार असल्याचे संकेत मिळाले आहेत.
नाट्य क्षेत्रातून , नाट्य संमेलनातून गेली अनेक वर्ष मागणी होत होती की नाटक हा विषय म्हणून शाळेत शिकवला जावा…रंगकर्मीयांचे हे स्वप्न साकार होणार असून शिक्षण विभाग त्या बाबतीत कृतिशील आहेच पण मुलांनी कला,क्रीडा आणि अभिनय या विषयात मुलांनी पारंगत होऊन त्यात कौशल्य प्राप्त करावे,या मताचे शिक्षण मंत्री राज्याला लाभलेले आहेत….आम्हा बालनाट्य क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी ही आनंदाची बाब आहे.
राजू तुलालवार





















