Home मुंबई वांद्र्यातील ‘नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदाना’चे आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव रद्द करा, फुटबॉल मैदानाचे...

वांद्र्यातील ‘नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदाना’चे आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव रद्द करा, फुटबॉल मैदानाचे आरक्षण बदलण्यास काँग्रेसचा तीव्र विरोध.

10
0

फुटबॉल मैदान वाचवण्यासाठी काँग्रेस नगरसेवकांचा पुढाकार, बीएमसी आयुक्तांची घेतली भेट.

मुंबई, दि. ६ ऑगस्ट ..

मुंबईतील मोकळ्या जागा व मैदाने उद्योगपतींच्या घशात घालण्याचा सपाटा भाजपा महायुतीने सुरु ठेवला आहे. आता यांची नजर वांद्रे येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल मैदानावर पडली असून, या मैदानाचे आरक्षण बदलण्याचा प्रस्ताव आणला आहे. यामागे बीएमसीतील अधिकारी, बिल्डर लॉबी व उद्योगपती यांची भ्रष्ट युती आहे. तरुणांना खेळण्यासाठी मैदाने नसताना आहे ती मैदाने उद्योगपतींच्या घशात घातली जात आहेत, याला काँग्रेस पक्षाचा विरोध असून फुटबॉल मैदान हटवण्याचा कोणताही प्रस्ताव खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा मुंबई काँग्रेसने दिला आहे.

महानगरपालिकेतील काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवकांनी आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेऊन यासंदर्भात एक निवेदन सादर केले, त्यानंतर पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. यावेळी स्थायी समिती सदस्य व नगरसेविका ट्युलिप मेरिंडा, मुंबई काँग्रेसचे प्रवक्ते आणि माध्यम समन्वयक सुरेशचंद्र राजहंस आदी उपस्थित होते.

“मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे एक सविस्तर निवेदन सादर केले आहे. यात ‘नेव्हिल डिसूझा फुटबॉल मैदान’चे आरक्षण ‘खेळाचे मैदान’ वरून बदलून ते ‘प्रदर्शन/संमेलन केंद्र’ करण्याच्या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला आहे. हे मैदान केवळ जमिनीचा एक तुकडा नाही, तर ती मुंबईच्या फुटबॉल क्षेत्राची मुख्य आधारशिला आहे. येथे सुमारे ४०० युवा क्लब आणि ३०० वरिष्ठ क्लबच्या माध्यमातून दरवर्षी ८,००० ते १०,००० तरुण फुटबॉलपटू सराव करतात. हे मैदान मुंबईचा क्रीडा वारसा आणि हजारो उदयोन्मुख खेळाडूंची स्वप्ने यांचे प्रतीक आहे. बीएमसीने या अमूल्य सार्वजनिक क्रीडा सुविधांचे रक्षण करावे आणि हा प्रस्ताव मागे घ्यावा”.

“भाजपा महायुती सरकार तरुण पिढीच्या (Gen Z आणि Gen Alpha) लोकशाही हक्कांवर गदा आणत आहे वांद्र्यातील जमीन बड्या उद्योगपतींच्या घशात घालण्याचे षडयंत्र आहे. बीएमसी प्रशासन सत्ताधारी पक्षाच्या जवळच्या लोकांना उघडपणे मैदाने, उद्याने आणि रुग्णालये सोपवत आहे. मुंबईच्या भविष्यासाठी हे घातक आहे. या मैदानाचा वापर बदलण्याचा महापालिकेचा अजेंडा मागे घ्या आणि म्हाडाला दुसऱ्या पर्यायी जागेचा शोध घेण्याचे निर्देश द्या, असे बीएमसीतील काँग्रेस गटनेते अश्रफ आजमी यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here