Home मुंबई *वरळी, प्रभादेवी परिसरात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी एकात्मिक यंत्रणा कार्यान्वित करण्याची प्रक्रिया...

*वरळी, प्रभादेवी परिसरात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी एकात्मिक यंत्रणा कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू*

9
0

*• विद्यमान आणि नवीन यंत्रणेत सेवाबदलामुळे घनकचरा सेवा पूर्वपदावर येण्यासाठी ३-४ दिवस लागण्याची शक्यता*

*• सेवा स्थित्यंतरामुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न सुरू, नागरिकांनी सहकार्य करण्याचे प्रशासनाकडून आवाहन*

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ प्रशासकीय विभागात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी प्रभावी आणि एकात्मिक यंत्रणा कार्यान्वित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामुळे, सध्या कार्यरत असलेल्या आणि नवीन यंत्रणेतील सेवा स्थित्यंतरामुळे या विभागातील वरळी, प्रभादेवी आदी भागातील घनकचरा सेवेवर परिणाम होत आहे. नवीन यंत्रणा पूर्णत: कार्यान्वित होण्यासाठी ३ ते ४ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. तथापि, सेवा स्थित्यंतरामुळे काही भागात कचरा संकलनात होत असलेली गैरसोय टाळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांच्या मार्गदर्शनात आणि उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) किरण दिघावकर यांच्या देखरेखीखाली मुंबईतील घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर, कचरा संकलन आणि वाहतूक कामासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व यंत्रणांमध्ये समन्वय साधून नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून नवीन प्रकारचा एकात्मिक प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

मुंबईत रोज सुमारे ७२०० मेट्रिक टन कचरा निर्माण होतो आणि हा कचरा संकलित करुन क्षेपणभूमीपर्यंत वाहून नेला जातो. हा कचरा संकलित व त्याची वाहतूक करण्यासाठी यापूर्वी अस्तित्वात असलेल्या निरनिराळ्या यंत्रणांऐवजी आता सर्वसमावेशक असा नवीन प्रकारचा एकात्मिक प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. या अंतर्गत, संबंधित प्रशासकीय विभागातील (वॉर्ड) कचराविषयक सर्व कामकाजांची जबाबदारी एकाच यंत्रणेकडे असेल. यामध्ये, कचरा संकलन, वाहतूक करणे; कचऱ्याचे १.१ घनमीटर क्षमतेच्या डब्यांची निगा राखणे, त्यांचे परिरक्षण करणे; रस्त्याच्या कडेला असलेल्या लिटर बिन्सची प्रस्थापना करणे, त्यांची निगा राखणे तसेच त्यातील कचरा वेळोवेळी वाहून नेणे; नागरिकांनी वर्गीकरण केलेला सुका कचरा वाहून नेणे आदी बाबींचा प्रामुख्याने समावेश आहे. तथापि, कचऱ्यासंदर्भात नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी स्वतंत्र कक्ष (कॉल सेंटर) असेल. या ठिकाणी निशुल्क क्रमांकावर तक्रार करता येईल. दरम्यान, या संपूर्ण सेवेसाठी प्रचलित वाहनांपेक्षा अधिक वहन क्षमतेची वाहने वापरली जाणार आहेत. त्यामुळे, वाहनांची संख्या कमी होईल तसेच वायू प्रदूषणातही घट होईल. या वाहनांमध्ये कचरा बंदिस्त करुन वाहून नेला जाईल. त्यामुळे, कचरा रस्त्यावर पडणार नाही किंवा इतर वाहनधारकांना दिसणार नाही. ओल्या कचऱ्यांतून निघणारे सांडपाणी वाहनांतच साठविण्याची यंत्रणा वाहनात असेल. त्यामुळे, रस्त्यांवर दुर्गंधी होणार नाही. तथापि, एकूण वाहनांपैकी १०-१५ टक्के वाहने विद्युत (इलेक्ट्रीक) प्रकारची असतील. त्यामुळे, इंधनाची बचत होण्यासदेखील बचत होईल.

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून या संपूर्ण कामकाजासाठी मुंबईत एकूण आठ कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली असून टप्प्याटप्प्याने या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दिनांक ०३ ऑगस्ट २०२६ पासून महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ विभागात या प्रकल्पाची सुरुवात झालेली आहे. यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कंत्राटदाराची पायाभूत यंत्रणा बदलून त्याऐवजी पूर्णत: नवीन यंत्रणा कार्यरत होत असल्यामुळे कचरा संकलन व वाहतूक सेवा एका मोठ्या स्थित्यंतरातून जात आहे. त्यामुळे, ‘जी दक्षिण’ विभाग अंतर्गत येणाऱ्या वरळी, प्रभादेवी आदी ठिकाणी नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी महानगरपालिका प्रशासन आणि नवीन कंत्राटदारांकडून प्रयत्न सुरू आहेत. तथापि, स्थितीबदलाचा हा कालावधी ३ ते ४ दिवसांचा असून त्यानंतर स्थिती पूर्वपदावर येईल. त्यामुळे, नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here