Home नाटक / चित्रपट / मालिका / समीक्षा *‘काळाघोडा आर्ट अव्हेन्यू’ तून बृहन्मुंबई महानगरपालिकेने जपली ऐतिहासिक वास्तुकला*

*‘काळाघोडा आर्ट अव्हेन्यू’ तून बृहन्मुंबई महानगरपालिकेने जपली ऐतिहासिक वास्तुकला*

26
0

 

*सौंदर्यीकरण व रोशणाई प्रकल्प लोकार्पणप्रसंगी मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन*

*बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकल्पनेतून साकारलेला नयनरम्य परिसर मुंबईकरांसाठी खुला*

*साईबाबा मार्ग, रोप वॉक लेन, डॉ. व्ही. बी. गांधी मार्ग (फोर्ब्स स्ट्रीट), रुदरफोर्ड स्ट्रीट आणि बी. भरुचा मार्ग या पाच रस्त्यांचे सौंदर्यीकरण*

काळाघोडा आर्ट अव्हेन्यू सौंदर्यीकरण व रोशणाई प्रकल्पामुळे मुंबईला नवीन कलात्मक विभाग प्राप्त झाला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने तत्कालीन ऐतिहासिक वास्तुकलेशी समरस कलात्मक विभाग तयार केल्यामुळे काळाघोडा परिसराचे सौंदर्य आणखी खुलले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी काळाघोडा परिसर सौंदर्यीकरण आणि रोशणाई प्रकल्पाचे कौतुक केले.

दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या काळा घोडा परिसरातील आर्ट अव्हेन्यू सौंदर्यीकरण व रोशणाई प्रकल्पाचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (दिनांक १४ जुलै २०२६) लोकार्पण करण्यात आले. काळा घोडा प्लाझा, बी. भरुचा मार्ग, मुंबई येथे हा लोकार्पण सोहळा पार पडला.

उप मुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष तथा स्थानिक आमदार ॲड. राहुल नार्वेकर, माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री ॲड. आशिष शेलार, मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे, सभागृह नेता श्री. गणेश खणकर, विरोधी पक्षनेत्या श्रीमती किशोरी पेडणेकर, शिवसेना गटनेता श्री. अमेय घोले, स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे, सुधार समिती अध्यक्ष श्रीमती संध्या दोशी-सक्रे, बेस्ट समिती अध्यक्ष श्रीमती तृष्णा विश्वासराव, स्थानिक नगरसेवक ॲड. मकरंद नार्वेकर, नगरसेविका श्रीमती हर्षिता नार्वेकर, नगरसेविका डॉ. गौरवी शिवलकर-नार्वेकर, नगरसेवक श्री. कमलाकर दळवी, महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) श्रीमती प्राजक्ता वर्मा-लवंगारे, उप आयुक्त (परिमंडळ १) श्रीमती चंदा जाधव, ए विभागाचे सहायक आयुक्त श्री. गजानन बेल्लाळे आदींसह काळाघोडा परिसरातील रहिवासी, व्यावसायिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, काळाघोडा परिसरात आकर्षक पादचारी मार्ग, सार्वजनिक खुल्या जागा आणि ऐतिहासिक वास्तुकलेशी सुसंगत असे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांसाठी अधिक दर्जेदार आणि सुबक सार्वजनिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. परिसरातील व्यावसायिकांचेही यामध्ये मोठे योगदान आहे. मुंबईत पर्यटकांसाठीदेखील हा परिसर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला काळाघोडा परिसर मुंबईच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि कलात्मक वारशाचे प्रतीक मानला जातो. या परिसरात नागरिक आणि देश-विदेशातील पर्यटकांना अधिक सुरक्षित, आनंददायी आणि जागतिक दर्जाचा पायी फिरण्याचा अनुभव मिळावा, तसेच ‘हेरिटेज वॉक’ ला नवे परिमाण लाभावे, या उद्देशाने बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे परिसरातील विविध रस्त्यांचे व्यापक सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा, पुरातन वास्तू, कला दालने, संग्रहालये आणि सांस्कृतिक वैभव यांमुळे काळा घोडा परिसराची स्वतंत्र ओळख निर्माण झाली आहे. दरवर्षी आयोजित होणारा ‘काळा घोडा कला महोत्सव’ या परिसराच्या जागतिक सांस्कृतिक प्रतिष्ठेत भर घालतो. त्यामुळे देश-विदेशातील पर्यटकांसाठी हा परिसर विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.

*५०० मीटर लांबीच्या परिसरात सुशोभिकरण*

मुंबईकर आणि पर्यटकांना अधिक समृद्ध ‘हेरिटेज वॉक’ चा अनुभव मिळावा, या उद्देशाने साईबाबा मार्ग, रोप वॉक लेन, डॉ. व्ही. बी. गांधी मार्ग (फोर्ब्स स्ट्रीट), रुदरफोर्ड स्ट्रीट आणि बी. भरुचा मार्ग या पाच रस्त्यांचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ३ हजार ४४३ चौरस मीटर क्षेत्रफळावर, म्हणजेच सुमारे ५०० मीटर लांबीच्या परिसराचा कायापालट करण्यात आला आहे.

*खुल्या जागेत टेबल-खुर्च्यांची आकर्षक बैठक व्यवस्था*

नामांकित उपाहारगृहे, कॅफे, रेस्टॉरंट्स, दागिन्यांची दालने, वस्त्रांची आकर्षक शोरूम्स, कला दालने आणि वारसास्थळांनी नटलेला हा परिसर आता युरोपमधील खुल्या सांस्कृतिक रस्त्यांची आठवण करून देणारा अनुभव देणार आहे. युरोपातील अनेक शहरांप्रमाणे रस्त्यालगतच्या कॅफे आणि उपाहारगृहांसमोर खुल्या जागेत टेबल-खुर्च्यांची आकर्षक बैठक व्यवस्था करण्यात आली असून, पर्यटकांना मोकळ्या वातावरणात चहा, कॉफी, नाश्ता किंवा विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत परिसरातील कलात्मक वातावरण अनुभवता येणार आहे. त्यामुळे काळाघोडा परिसर केवळ पाहण्याचे नव्हे, तर निवांत वेळ घालवण्याचे आणि अनुभवण्याचेही एक वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळ बनणार आहे.

*पादचाऱ्यांसाठी सुलभ पायवाटा*

या प्रकल्प अंतर्गत परिसरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार असून, चारही बाजूंना अद्ययावत बॅरिकेड्स उभारण्यात येणार आहेत. बी. भरुचा मार्गावरील चौकात आकर्षक ‘काळा घोडा प्लाझा’ विकसित करण्यात आला आहे. प्लाझासाठी करडा आणि काळा ग्रॅनाईट तसेच बेसॉल्ट फरशीचा वापर करण्यात आला आहे. संपूर्ण परिसरात सौंदर्यपूर्ण, वळणदार आणि पादचाऱ्यांसाठी सुलभ पायवाटा तयार करण्यात आल्या आहेत. यामुळे पर्यटकांना निवांत फेरफटका, खरेदी आणि खाद्यसंस्कृतीचा आनंद एकाच ठिकाणी घेता येणार आहे. काळाघोडा परिसरातील साईबाबा मार्ग, रोप वॉक लेन, डॉ. व्ही. बी. गांधी मार्ग (फोर्ब्स स्ट्रीट), रुदरफोर्ड स्ट्रीट आणि बी. भरुचा मार्ग हे पाच रस्ते प्रत्येक शनिवार आणि रविवारी सायंकाळी ६ ते रात्री १२ या कालावधीत वाहनांसाठी बंद ठेवून केवळ पादचाऱ्यांसाठी खुले ठेवण्यात येणार आहेत.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here