Home मुंबई वनक्षेत्रातील वीज पारेषण मार्गासाठी आवश्यक ‘राईट ऑफ वे’ २० टक्क्यांपर्यंत कमी

वनक्षेत्रातील वीज पारेषण मार्गासाठी आवश्यक ‘राईट ऑफ वे’ २० टक्क्यांपर्यंत कमी

32
0

केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय; अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे वृक्षतोड कमी होणार, पर्यावरण संरक्षणाला चालना
मुंबई, दि. ४ : वनक्षेत्रातून जाणाऱ्या वीज पारेषण मार्गांच्या (Transmission Lines) उभारणीसाठी आवश्यक असलेली ‘राईट ऑफ वे’ (RoW) ची रुंदी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे २० टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे वनक्षेत्रातील वृक्षतोड कमी होण्यास मदत होणार असून पर्यावरण संरक्षणाला मोठी चालना मिळणार आहे.

केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने ३ जुलै २०२६ रोजी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना यासंदर्भातील सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

या सूचनांनुसार, केंद्रीय विद्युत प्राधिकरणाने (CEA) २०२५ मध्ये प्रसिद्ध केलेल्या सुधारित तांत्रिक मानकांनुसार नव्या प्रकारच्या टॉवर डिझाइन आणि आधुनिक कंडक्टर तंत्रज्ञानाचा वापर केल्यास वनक्षेत्रातील ‘राईट ऑफ वे’ ची आवश्यकता लक्षणीयरीत्या कमी होणार आहे. कमी विंग स्पॅन, कमी टॉवर फूटिंग आणि अरुंद मार्गिका यामुळे वनक्षेत्रावर होणारा परिणाम कमी होईल.

पर्यावरण मंत्रालयाच्या सल्लागार समितीच्या १० जून २०२६ रोजी झालेल्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली होती. समितीच्या शिफारशी आणि सक्षम प्राधिकाऱ्याच्या मंजुरीनंतर या सुधारित मार्गदर्शक सूचना लागू करण्यात आल्या आहेत.

नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार, नव्या तंत्रज्ञानावर आधारित पारेषण मार्गांसाठी CEA च्या सुधारित मानकांनुसारच RoW निश्चित करण्यात येईल, तर जुन्या प्रकारच्या टॉवर आणि कंडक्टरचा वापर होत असल्यास विद्यमान RoW नियम कायम राहतील. तसेच, ऊर्जा मंत्रालयाने सर्व राज्ये आणि वीज पारेषण संस्थांना आधुनिक टॉवर व कंडक्टर तंत्रज्ञानाचा अधिकाधिक अवलंब करण्यासाठी आवश्यक सूचना देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे भविष्यातील वीज पारेषण प्रकल्प अधिक पर्यावरणपूरक, शाश्वत आणि कार्यक्षम होण्यास मदत होणार असून, वनसंपत्तीचे संवर्धन करताना ऊर्जा पायाभूत सुविधांच्या विकासालाही गती मिळणार असल्याचे मानले जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here