Home मुंबई *विक्रोळीतील 49, स्वस्तिक एमराल्ड जयंतीउत्सव समिती आणि तक्षशील बुद्ध विहारातर्फे अवयवदान जनजागृतीपर...

*विक्रोळीतील 49, स्वस्तिक एमराल्ड जयंतीउत्सव समिती आणि तक्षशील बुद्ध विहारातर्फे अवयवदान जनजागृतीपर उपक्रम उत्साहात साजरा*

17
0

*विक्रोळीतील 49, स्वस्तिक एमराल्ड जयंतीउत्सव समिती आणि तक्षशील बुद्ध विहारातर्फे अवयवदान जनजागृतीपर उपक्रम उत्साहात साजरा*
*उपस्थित तीन श्रोते यांनी भरले अवयवदान संकल्प पत्र*
विक्रोळीतील टागोर नगर परिसरातील तक्षशील बुद्ध विहारात 49, स्वस्तिक एमराल्ड जयंतीउत्सव समितीकडून अवयवदान चळवळीचा जनजागृतीपर उपक्रम शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळेस लाईव्ह बीयॉन्ड लाईफ संस्थेचे मिलिंद कनगुटकर यांनी अवयवदानाचे मानवजीवनातील महत्त्वपूर्ण स्थान आणि अवयवदानाने रुग्णांना नवसंजीवनी, नवजीवन कसे प्राप्त होते यावर आपले मत व्याख्यानातून विशद केले. नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. मस्कती हे चर्नीरोड या ठिकाणी नेत्ररोग रुग्णालय चालवतात. त्यांनी नेत्रदानाचे महत्त्व विशद केले. तसेच डॉ. मस्कती हे आय बँकेचे ट्रस्टी आहेत. एका डोळ्याच्या कॉर्नियाचे दोनशे उपयोग होतात व त्याचा नक्कीच अंध रुग्णांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. अनेक खेळाडू, सेलिब्रिटीज हे नेत्रदान करतात. नेत्रदान कसे आणि कुठे करावे याबाबत त्यांनी सविस्तर मांडणी केली. नेत्रदान केल्यावर ते शासकीय वैद्यकीय कायदेशीर बाबी पूर्ण करून रुग्णांना देण्यात येतात याबाबतही सविस्तर मार्गदर्शन उपस्थित श्रोत्यांना केले. प्रमुख पाहुणे मुंबई पालिकेचे वैद्यकीय संचालक आणि प्रतिष्ठित नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शैलेश मोहिते सर यांनी आपल्या अमोघ व्याख्यानातून उपस्थित श्रोत्यांना अवयवदान चळवळीचे महत्त्व विशद केले. त्यांनी उपस्थित श्रोत्यांशी संवाद साधत आपल्या व्याख्यानातून अवयव प्रत्यारोपणाशी निगडित भारतातील राष्ट्रीय स्तरावर (NOTTO), राज्यस्तरावर (SOTTO) व प्रादेशिक स्तरावर (ROTTO) असणाऱ्या संस्थांबाबत माहिती दिली. तसेच अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवणारे विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र (ZTCC) लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय सायन याबाबत मार्गदर्शन केले. अशी महत्त्वपूर्ण माहिती डॉ. मोहिते यांनी दिली. महापुरुषांची जयंतीउत्सव साजरा करताना त्या वर्गणीतून आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात यावेत. ज्याप्रमाणे जैन समाज व्यापार आणि दान पारमार्थिक आहेत त्याप्रमाणेच आपण वाटचाल करावी. मुंबई पालिकेतील रुग्णालयात त्यांनी डॉ. बाबासाहेब मेडिको असोसिएशनची स्थापना करून बहुजन समाजातील नवतरुण विद्यार्थ्यांसह, डॉक्टर, अधिकारी, कर्मचारीवर्ग यांना फुले, शाहू, आंबेडकरी विचारधारेवर आपण अनेक सामाजिक, आरोग्यविषयक उपक्रम राबवतो असे नमूद केले. तत्पूर्वी डॉ. मोहिते यांनी मुंबई पालिकेतील माजी प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रसेन कदम यांनी अवयवदान जनजागृतीपर उपक्रम घेण्याचे सुचवले म्हणून सरांनी त्यांचे कौतुक केले. याप्रसंगी महात्मा फुले, विक्रोळी रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र जाधव यांनी आपल्या मनोगतात फुले, शाहू, आंबेडकरी चळवळ आणि अवयवदान याचे महत्त्व विशद केले. डॉ. सुरेंद्र तांबे, विक्रोळीतील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ यांनी केईएम रुग्णालयात प्राध्यापक डॉ. देवधर यांनी अवयवदान चळवळीकरता भरीव योगदान दिले असे सूचित केले. डॉ. शैलेश मोहिते आणि डॉ. कुरेश मस्कती यांनी उपस्थित श्रोत्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक, समाधानकारक उत्तरे दिली. या कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. चंद्रसेन कदम आणि श्री. हर्षद राठोड यांनी लाईव्ह बीयॉन्ड फाऊंडेशन अवयवदान उपक्रम पालिकेतील सायन, केईएम, नायर, कूपर रुग्णालयांशी संलग्न चळवळ कशी राबविण्यात येते याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच डॉ. कदम यांनी वक्ते मिलिंद कनगुटकर आणि डॉ. कुरेश मस्कती यांचा परिचय दिला. लो. टि. वै. म. सायन रुग्णालयाचे सह-अधिष्ठाता डॉ. अनिल मोरे या कार्यक्रमात मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी डॉ. शैलेश मोहिते यांचा वैद्यकीय क्षेत्रातील कार्याचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार अनिल जाधव यांनी केले. त्यांनी तक्षशील बुद्ध विहाराचे आणि उपस्थित सर्व मान्यवर पाहुणे, श्रोतेगण यांचे कार्यक्रमात उपस्थित राहिल्याबद्दल तक्षशील बुद्ध विहार आणि 49, जयंतीउत्सव समितीकडून आभार व्यक्त केले. त्यांनी तक्षशील बुद्ध विहाराचे संचालक सूनिल निकाळे तसेच या कार्यक्रमाचे तक्षशील युट्यूब वाहिनीवर थेट प्रक्षेपण उपलब्ध करून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान देणारे सचिन गायकवाड यांचाही शब्दसुमनांनी टाळ्यांच्या गजरात सन्मान केला. थेट प्रक्षेपण उपलब्ध झाल्याने अनेक श्रोतेगण यांनी घरूनच या स्तुत्य उपक्रमातील व्याख्यानाचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी 49, स्वस्तिक एमराल्ड जयंतीउत्सव समिती आणि तक्षशील बुद्ध विहार यांच्याकडून डॉ. शैलेश मोहिते यांचा शाल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ‘जनता’ पुस्तक देऊन डॉ. सुरेंद्र तांबे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. डॉ. अनिल मोरे यांच्या हस्ते डॉ. मस्कती यांचा सन्मान करण्यात आला. डॉ. जितेंद्र जाधव यांचा सन्मान डॉ. चंद्रसेन यांनी केला. श्री. मिलिंद कनगुटकर यांचा सन्मान डॉ. लाजवंती जाधव-पवार यांनी केला. या कार्यक्रमात श्रोतृगणात अनेक मान्यवर उपस्थित होते. अखिल भारतीय बौद्ध महासभेचे, विक्रोळी अध्यक्ष अशोक धुमाळे गुरुजी, मनोज तेलुरे, आणि बौद्ध महासभेचे अनेक सभासद मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. बहुजन समाज पार्टी विक्रोळी तालुका अध्यक्ष श्रीम. मंगला सुनील जाधव, (त्यांचे पती दिवंगत श्री. सुनील जाधव यांनी देहदान केले.) 49, जयंतीउत्सव समितीचे विक्रोळीतील आंबेडकर चळवळीतील पँथर जीवन सोनवणे, पँथर महेंद्र अडसुळे, स्वस्तिक एमराल्डचे अध्यक्ष विक्रोळीतील सामाजिक नेते सुशांत बच्छाव, समितीचे स्वप्नील राणे, श्रीकांत सावंत, नर्सेकर, जान्हवी जाधव, रोहित ऍटम, पन्हाळे, तळेकर, विशाल शहा, श्रीमती पन्हाळे, डॉ. भूषण रोकडे, विपश्यना साधक विकास कांबळे, नालंदा बुद्ध विहाराचे अध्यक्ष रवी व्हावूळकर, टागोर नगर बौद्ध विकास संघटनेतील दुधवडे ताई, अंकित दुधवडे, प्रवीण साळवी, तक्षशील बुद्ध विहाराच्या अध्यक्षा मृण्मयी निकाळे, देठे मॅडम,वनिता कांबळे ,खंकाळ, मानिक डोके,प्रमोद कटारनवरे,अशोक सूमारे,सिद्धार्थ सोनवने, आयु.कडलग,विद्या कडलग, मनोज निकाळे, सुभाष गौतम,ललीत पवार तसेच खास उपस्थितीत डॉ. शैलेश मोहिते सर यांचे बालमित्र श्री. सुनील तुपसौंदर्य यांनी आपल्या मनोगतात डॉ. शैलेश मोहिते यांच्या बालपणीच्या आठवणी कथन केल्या तसेच संपूर्ण कुटुंबीय अवयवदान करतील अशी घोषणा केली. शेवटी तीन उपस्थित श्रोत्यांनी अवयवदान करणे कसे महत्त्वपूर्ण आहे, त्याचा आपल्या मृत्यूनंतर गरजू रुग्णांना कसा लाभ मिळेल या जनजागृतीपर उपक्रमातून प्रेरणा घेऊन लाईव्ह बीयॉन्ड लाईफ संस्थेचे अर्ज भरले. अशाष प्रकारे हा जनजागृतीपर उपक्रम यशस्वीरीत्या मोठ्या उत्साहात पार पडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here