खेड – 38 वर्षे शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे सेवा बजावणारे, जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कारासह सात आदर्श शिक्षक पुरस्कारांचे मानकरी असलेले सेवानिवृत्त केंद्रप्रमुख मंगेश मानाजी भोसले यांना निवृत्तीनंतर तब्बल पाच महिने उलटूनही पेन्शन मिळालेली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
31 डिसेंबर 2025 रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेल्या भोसले यांनी आपल्या सेवाकाळात शिक्षक, मार्गदर्शक, योगशिक्षक, जनगणना कर्मचारी तसेच निवडणुकांमध्ये प्रिसायडिंग व झोनल अधिकारी म्हणून जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या. कोरोनाकाळात कोविड सेंटरमध्ये जाऊन नागरिकांना मोफत योग प्रशिक्षण देत त्यांनी समाजसेवेचेही उदाहरण घालून दिले. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना “कोरोनायोद्धा” म्हणून गौरविण्यात आले होते. भोसले यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सेवाकाळात त्यांनी केवळ 21 दिवसांची दीर्घ मुदतीची रजा घेतली होती. उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना दोन वेतनवाढीही मिळाल्या होत्या. मात्र, निवृत्तीनंतर अद्याप पेन्शन सुरू न झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. पर्सनल लोन आणि एलआयसीचे हप्ते थकले असून दैनंदिन खर्च भागविणेही कठीण झाले आहे. पेन्शन हाच उत्पन्नाचा एकमेव स्रोत असल्याने “माझ्यावर उपासमारीची वेळ आली आहे,” अशी व्यथा त्यांनी अर्जातून मांडली आहे.
एका आदर्श शिक्षकाला निवृत्तीनंतर पेन्शनसाठी दारोदार फिरण्याची वेळ येत असेल, तर ही बाब प्रशासनासाठी चिंतेचा विषय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. शिक्षण विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन भोसले यांची पेन्शन सुरू करावी, अशी मागणी शिक्षक व सामाजिक क्षेत्रातून होत आहे.
“38 वर्षे विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणाऱ्या शिक्षकाला आता स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी शासनाकडे याचना करावी लागत आहे,” अशी खंतही अनेकांनी व्यक्त केली आहे.
Home उद्योग / शिक्षण वार्ता खेड – 38 वर्षे शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे सेवा बजावणारे, जिल्हा परिषद आदर्श...





















