Home दिल्ली एमआयडीसी–कॉस्मे कराराने कोरियन गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला नवे बळ;

एमआयडीसी–कॉस्मे कराराने कोरियन गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला नवे बळ;

7
0

गुंतवणूक, कौशल्यविकास आणि तंत्रज्ञान सहकार्यास चालना!

नवी दिल्ली : कोरियन कंपन्यांचा महाराष्ट्रातील गुंतवणुकीकडे वाढता कल लक्षात घेऊन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) आणि कोरिया एसएमई अँड स्टार्टअप्स एजन्सी (कॉस्मे) यांच्यात दि. २० एप्रिल २०२६ रोजी नवी दिल्ली येथे गुंतवणूक प्रोत्साहन, कौशल्यविकास आणि औद्योगिक सहकार्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला.

महाराष्ट्रातील कोरियन गुंतवणूकीच्या संधी, औद्योगिक सुलभीकरण, कौशल्यविकास आणि तंत्रज्ञान सहकार्याबाबत पुणे येथे नुकत्‍याच झालेल्‍या परिषदेत एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासू आणि कॉस्मेच्‍या उच्चस्तरीय अधिका-यां समवेत सविस्तर चर्चा झाली आहे. सदर चर्चेचा  पुढील भाग म्‍हणून हा करार आकाराला आला असून, यावेळी एमआयडीसीच्‍या सहमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, महाव्यवस्थापक (पणन) डॉ. विकास सूर्यवंशी तर कॉस्मेचे उपाध्यक्ष जॅंग ह्युंग पार्क यांच्‍या समवेत इतर अधिकारी उपस्थित होते.

कराराचा मुख्य उद्देश कोरियातून महाराष्ट्रात गुंतवणूक सुलभ करणे आणि राज्यातील विद्यमान कोरियन उद्योगांच्या विस्तार योजनांना पाठबळ देणे हा आहे. सहकार्याची रचना तीन प्रमुख टप्‍प्‍यात करण्यात आली असून, पहिल्या टप्‍प्‍यात कोरियन एमएसएमई आणि स्टार्टअप्ससाठी महाराष्ट्रातील गुंतवणूक संधींचे प्रोत्साहन आणि सुलभीकरण केले जाणार आहे. दुसऱ्या टप्‍प्‍यात प्रशिक्षण, क्षमता-विकास आणि उद्योगाभिमुख कौशल्यवृद्धीच्या माध्यमातून भविष्यातील कुशल मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जाणार आहे. तिसऱ्या टप्‍प्‍यात प्रगत आणि उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात माहितीची देवाणघेवाण, औद्योगिक आधुनिकीकरण, डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन आणि शाश्वत उत्पादनासाठी सहकार्याचा शोध घेतला जाणार आहे.

गुंतवणूक सुलभीकरणाअंतर्गत कोरियन एमएसएमई आणि स्टार्टअप्समध्ये महाराष्ट्रातील संधींबाबत जनजागृती करणार आहे. दोन्ही संस्था भारत आणि कोरिया येथे गुंतवणूक शिष्टमंडळे, व्यवसाय मिशन्स आणि रोडशो आयोजित करण्यास सहकार्य करतील. तसेच क्षेत्रनिहाय गुंतवणूक संधी आणि औद्योगिक प्रकल्पांबाबत माहितीची देवाणघेवाण केली जाणार आहे. कोरियन कंपन्यांसाठी सिंगल-विंडो सुलभीकरण यंत्रणा मजबूत करण्यासाठी एमआयडीसी नोडल संस्‍था म्‍हणून समन्वयाची भूमिका बजावेल.

महाराष्ट्रातील विद्यमान आणि नव्याने येणाऱ्या कोरियन उद्योगांकरीता व्‍यवसाय सुलभतेसाठी औद्योगिक निर्देशिका तयार करण्याचाही विचार या करारात आहे. तसेच उत्पादन, असेंब्ली आणि लॉजिस्टिक्ससाठी योग्य औद्योगिक क्षेत्रे, जमीन पर्याय आणि मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास दोघांकडून सहकार्य केले जाणार आहे.

कॉस्मेमार्फत कौशल्य विकासासाठी कोरिया बिझनेस कल्‍चर प्रशिक्षण कार्यक्रम महाराष्ट्रात सुरू करण्याचे नियोजन आहे. यासाठी कॉस्मे अभ्यासक्रम, प्रशिक्षक आणि प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणार असून, एमआयडीसी प्रचलित धोरणांनुसार पायाभूत सुविधा आणि आर्थिक सहाय्याचा विचार करणार आहे.

तंत्रज्ञान सहकार्याच्या अंतर्गत ऊर्जा-कार्यक्षम स्मार्ट औद्योगिक वसाहती, स्मार्ट ग्रिड्स, नवीकरणीय ऊर्जा, एकात्मता आणि ऊर्जा-ऑप्टिमायझेशन प्रणाली यावर माहितीची देवाणघेवाण आणि संभाव्य सहकार्याचा शोध घेतला जाणार आहे. औद्योगिक आधुनिकीकरण, डिजिटल परिवर्तन आणि शाश्वत उत्पादनाला चालना देणे हा या करारातील महत्त्वाचा उद्देश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here