Home पालघर-ठाणे / नवी मुंबई / रायगड / रत्नागिरी / सिंधुदुर्ग *पालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरण; विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची...

*पालघर अनधिकृत फटाका कारखाना स्फोट प्रकरण; विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची घटनास्थळी पाहणी, जखमींची भेट घेत दिला आधार*

6
0

*कामगारांच्या सुरक्षिततेसाठी ‘सुरक्षिततेचा औद्योगिक आराखडा’ तयार करण्याची गरज*

पालघर
पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातल्या कोनसाई गावात अनधिकृत फटाका कारखान्यात मंगळवारी (दि. २१ एप्रिल)रोजी भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कोनसाई येथील घटनास्थळाला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी स्फोटग्रस्त भागाचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली.

यानंतर त्यांनी वाडा येथील शासकीय रुग्णालयात जाऊन जखमी कामगारांची विचारपूस केली. रुग्णांच्या नातेवाईकांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. तसेच त्यांना मदत देखील त्यांनी दिली. या दुर्घटनेतील पीडितांना मदत शासनस्तरावरून मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना यासंदर्भात निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले.

यादरम्यान, उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलीस, महसूल, कामगार अधिकारी यांच्यासोबत बैठक घेत सविस्तरपणे चर्चा केली, त्याबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली.

यावेळी त्यांनी सांगितले की, “औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभागाने अधिकृत कारखान्यांची यादी जाहीर करावी आणि तिची पडताळणी पोलीस पाटील व ग्रामसेवकांनी नियमितपणे करावी. ग्रामसेवक अनुपस्थित असल्यास ही जबाबदारी पोलीस पाटलांनी पार पाडावी. तसेच जिथे पोलीस पाटील नसतील, तिथे पोलिस निरीक्षकांनी जबाबदारी पार पाडावी.
दहापेक्षा अधिक कामगार असलेल्या ठिकाणी कामगार कायदे काटेकोरपणे लागू करणे आवश्यक असून महसूल, ग्रामविकास, कामगार आणि औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभागांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रत्येक कारखान्यात सुरक्षा उपाययोजना अनिवार्य करून ‘फायर रक्षक’ नेमण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

कामगारांच्या सुरक्षिततेसाठी ‘सुरक्षिततेचा औद्योगिक आराखडा’ तयार करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. तसेच कामगारांच्या शोषणाच्या तक्रारी ग्रामविकास विभागाने नोंदवाव्यात, अशी सूचनाही संबंधित विभागाला देण्यात येणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

या सर्व बाबींचा अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात येणार असून शासन पातळीवर याबाबत पाठपुरावा केला जाणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार मृत कामगार भावेश वावरे यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यात आली आहे. तसेच या प्रकरणातील आरोपीला जामीन मिळू नये आणि त्याला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सक्षम सरकारी वकिलांची नेमणूक करण्याचे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी पोलीस उपअधीक्षकांना दिल्या आहेत.

यावेळी पालघरचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख पांडुरंग पाटील, भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर मेहेर, पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे, वाडा-विक्रमगड प्रांतअधिकारी डॉ. संदीप चव्हाण, वाडा तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, पंचायत समिती गट विकास अधिकारी सुनील गवारी, कामगार विभागाचे अजित मोहिते, ग्रामसेविका वैभवी भोईर, सरपंच कैलास टोके, उपसरपंच निलेश मोकाशी, शिवसेना जिल्हा महिला संघटक वैदेही वाढान, शिवसेना तालुका संघटक रेश्मा पाटील, शिवसेना युवती सेना मनाली पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, शिवसेना तालुका प्रमुख निलेश पाटील, शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुनील पाटील, वाडा नगरसेवक अजिंक्य पाटील व उमेश लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
——

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here