Home Uncategorized *नवी मुंबईत ‘नाईक विरुद्ध शिंदे’ संघर्ष टीपेला!*

*नवी मुंबईत ‘नाईक विरुद्ध शिंदे’ संघर्ष टीपेला!*

59
0

*भाजपा माजी नगरसेवकांचे मंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिंदेंची तक्रार करणार!*

नवी मुंबई : नवी मुंबईच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात भाजपमध्ये नाराजीचा सूर चांगलाच वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री गणेश नाईक यांनी नुकतीच भाजपच्या माजी नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीत शिंदेंच्याविरोधात ठाम भूमिका घेण्यात आली असून आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढावी ,असा ठराव माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी मांडला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे माजी नगरसेवक संजय नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिंदेंविरोधात मोर्चा काढण्याचीही तयारी सुरू आहे. इतकेेच नाही, तर या माजी नगरसेवकांचे प्रतिनिधीमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिंदेंची तक्रार करणार असून, ही तक्रार वर्षा बंगल्यावर दाखल होणार आहे. शिंदे हे नगरविकास खात्याचे मंत्री असल्याने माजी नगरसेवकांच्या विकासकामांना जाणूनबुजून अडथळा आणत असल्याचा गंभीर आरोप या तक्रारीत करण्यात येणार आहे.
दरम्यान, नुकत्याच झालेल्या ठाणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शिंदे उपस्थित असताना गणेश नाईक गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आले होते. त्यातच काही दिवसांपूर्वी नाईक यांनी ठाण्यात आयोजित बैठकीत ‘रावणाचा अहंकार दहन केला पाहिजे’ असे विधान करून शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला होता.
सध्या गणेश नाईकांचे ठाण्यात जनता दरबाराचे आयोजन सुरू आहे. या सर्व घडामोडींमुळे नवी मुंबईचे राजकारण चांगलेच तापले असून ‘नाईक विरुद्ध शिंदे’ असा संघर्ष अधिक प्रकर्षाने पुढे येताना दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here