Home Uncategorized *गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास करून बिल्डरशाही संपवून टाका*

*गृहनिर्माण स्वयंपुनर्विकास करून बिल्डरशाही संपवून टाका*

55
0

*आमदार प्रविण दरेकर यांचे गृहनिर्माण संस्थांना आवाहन*

मुंबई – हौसिंग सेक्टरमध्ये स्वयंपुनर्विकास ही क्रांतिकारी योजना सुरु केली. गृहनिर्माण संस्थांसाठी मुंबई बँक पुढे सरसावली. गोरेगावच्या हौसिंग परिषदेत १८ मागण्या केल्या त्यापैकी १६ शासन निर्णय झाले, सरकारचा राजाश्रय मिळाला. जिल्हा बँकेकडे हौसिंग सोसायट्यांचे १६०० प्रस्ताव आलेत. ४०-४५ संस्थांना कर्ज दिले असून १८ इमारती मुंबईत उभ्या राहिल्या आहेत. लोकं चाव्या घेऊन मोठ्या घरात राहायलाही गेली आहेत. हा अभूतपूर्व चमत्कार स्वयंपुनर्विकासात होतोय. जास्तीत जास्त लोकांनी स्वयंपुनर्विकासात यावे आणि बिल्डरशाही संपवून टाकावी, असे आवाहन भाजपा गटनेते व महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी गृहनिर्माण संस्थांना केले आहे. ते दि मुंबई डिस्ट्रिक्ट को. ऑप. हौसिंग फेडरेशच्या २०२४-२०२५ च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते.

याप्रसंगी मुंबई हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रकाश दरेकर, सेक्रेटरी दत्तात्रय वडेर, खजिनदार ज्ञानेश्वर महाजन, सहकारातील ज्येष्ठ नेते व मुंबई बँकेचे संचालक शिवाजीराव नलावडे, मुंबई हौसिंग फेडरेशनचे संचालक सुहास भोईटे, सविता झेंडे, विजय पवार, आशिष गोयल, भाई सावंत, विशाल कडणे, अजय बागल, हेमंत दळवी, धनंजय बर्डे, दिलीप गोसावी, मुंबई बँकेच्या संचालिका जयश्री पांचाळ यांसह मोठ्या संख्येने हौसिंग फेडरेशनचे प्रतिनिधी आणि सभासद उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. दरेकर म्हणाले कि, हौसिंग फेडरेशनची कामकाजात चांगल्या प्रकारे प्रगती झालीय. कारभारही अत्यंत उत्तम पद्धतीने होतोय. हौसिंग सेक्टर अलिकडच्या काळात फार महत्वाचे झालेय. राज्यात असणाऱ्या सहकारी संस्थांत सर्वात जास्त सहकारी संस्था हौसिंग सेक्टरच्या आहेत. सर्वसामान्य लोकं हौसिंग सेक्टरमध्ये राहतात. हौसिंग सेक्टरमधील प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली होती. त्यांनी कधी नव्हे एवढे पाठबळ हौसिंग सेक्टरला, फेडरेशनला दिलेय.

दरेकर पुढे म्हणाले की, “राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी संघाची स्थापना केली. एकेकाळी राज्याला शिक्षण प्रशिक्षण देण्याचे काम, राज्याच्या सहकार चळवळीला वैभवाचे दिवस आणण्याच्या कामात सिंहाचा वाटा राज्य सहकारी संघाचा होता. या संघाचे नेतृत्व करण्याची संधी मला मिळाली आहे. संघाला पुन्हा गतवैभव आणण्यासाठी आपण खारीचा वाटा उचलावा या भावनेतून मी अध्यक्ष झाल्यावर सर्व सेक्टरचा कृती आराखडा तयार केला आहे. शिक्षण-प्रशिक्षण महत्वाचे आहे. राज्य आणि केंद्र सरकारने शिक्षण-प्रशिक्षणाला महत्व दिलेय. आपणच प्रशिक्षित नसू तर संस्थेचा कारभार नीटपणे करता येणार नाही. राज्य सहकारी संघाचे मूळ काम शिक्षण-प्रशिक्षण देण्याचे आहे. हौसिंग फेडरेशनला शिक्षण-प्रशिक्षण देण्यासाठी सरकारने अधिकृत केले आहे. हौसिंग संस्थांत व्यवस्थापनाच्या मार्गदर्शनाची गरज आहे. चांगल्या पद्धतीने प्राप्त परिस्थितीत दर्जेदार प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कमतरता पडली तर राज्य सहकारी संघ चांगले तज्ज्ञ मार्गदर्शक उपलब्ध करून देऊ.”असा विश्वासही दरेकरांनी यावेळी दिला.

दरेकर पुढे म्हणाले कि, मुंबई जिल्हा आपले नेतृत्व करतेय. हौसिंग सोसायट्यांना आपण रिपेरिंगसाठी पैसे देतो. मुंबई बँकेने मोबाईल बँकिंग सेवा आणली. क्यूआर कोड सुविधा आणली आहे. क्यूआर कोडची सुविधा आणणारी मुंबई बँक ही पहिली जिल्हा बँक आहे. जिल्हा बँक आपली बँक आहे. खासगी बँका आपल्या आवाजाला ओ देत मदतीला येत नाही. परंतु आपल्या हक्काची जिल्हा बँक मदतीला येते. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. सहकारी संस्थांचे जाळे मुंबईवर आहे. त्यामुळे मुंबईच्या अर्थव्यवस्थेवरही वर्चस्व सहकाराचे असले पाहिजे. या जाणीवेतून एकमेकांना मदत करण्याची गरज असल्याचेही दरेकरांनी म्हटले.

*महाराष्ट्राच्या विकासात सहकाराचे पुन्हा गतवैभव आणू*

दरेकर म्हणाले कि, कधीकाळी महाराष्ट्रातील सहकार भक्कम होता. इतर राज्यांना दिशा देणारा होता. ग्रामीण अर्थव्यवस्था सहकारावर अवलंबून होती. ग्रामीण भागाचा विकास सहकारावर झाला. पण आज सहकाराला उर्जितावस्था देण्याची गरज आहे. आज सहकार दिवसेंदिवस खाली जातोय. अर्बन बँका बंद होताहेत. त्यांना उर्जितावस्था देण्याची गरज आहे. पतसंस्थांसह इतर विषय आहेत. येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या विकासात सहकाराचे पुन्हा गतवैभव आणू, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.

*ईस्टर्न आणि वेस्टर्न सबबला हौसिंगची दोन उपकेंद्रे*

हौसिंग सोसायट्यांसाठी विक्रोळी येथे जागा घेतली असून आपले उपकेंद्र बांधून तयार आहे. येणाऱ्या ८-१५ दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन करणार आहे. उपनगरातील १२ हजार सोसायट्यांना जोडणार आहोत. जेणेकरून तेथील तज्ज्ञ वकील सोसायट्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करतील. तशाच प्रकारे आरेच्या गेटवर जागा घेतलीय. त्याचेही काम अंतिम टप्प्यात असून ईस्टर्न आणि वेस्टर्न सबबला हौसिंगची उपकेंद्र संस्थांच्या सेवेसाठी करत असल्याचेही दरेकरांनी सांगितले.

*सहकारातील व्यवहार सहकारात करा*

दरेकर म्हणाले कि, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी ‘सहकार से समृद्धी’ असे घोषवाक्य केले. सहकारातील व्यवहार सहकारात करा. जिल्हा बँक सर्वसामान्यांना पैसे देते. तुमची जिल्हा बँक असताना आपण दुसऱ्या बँकेत व्यवहार का करतो? हौसिंग सोसायट्यांचे पाच हजार इतर बँकांत डिपॉजिट आहेत. ते पैसे जिल्हा बँकेत आले तर आपल्याला इतर बँकांकडे पैसे मागावे लागणार नाहीत. सहकारातील पैसा सहकारातच आला पाहिजे, असे आवाहन करत दरेकर म्हणाले कि, सहकारी संस्था, जिल्हा बोर्ड सशक्त झाले पाहिजेत या भावनेतून काम करणार आहोत. महाराष्ट्राच्या विकासात सहकाराचे पुन्हा गतवैभव आणू, असा विश्वास दरेकरांनी व्यक्त केला.

00000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here