मुंबई – विलेपार्ले येथील निलांजनी सहकारी गृहनिवास संस्थेच्या स्वयंपुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन रविवारी भाजपा गटनेते व महाराष्ट्र राज्य स्वयं/समूह पुनर्विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष (कॅबिनेट मंत्री दर्जा) आमदार प्रवीण दरेकर यांच्या शुभ हस्ते पार पडले. यावेळी दरेकर यांनी विलेपार्लेत स्वयंपुनर्विकासाला मोठा वाव आहे. तुम्ही स्वयंपुनर्विकासासाठी जेवढ्या इमारती आणाल त्यांना फंडिंगची व्यवस्था करू, असे आश्वासित केले.
याप्रसंगी विलेपार्ले मतदारसंघाचे आमदार पराग अळवणी, लोकमतचे मुंबई संपादक अतुल कुलकर्णी, नगरसेवक मिलिंद शिंदे, निलांजनी सोसायटीचे अध्यक्ष सुनिल बांदेकर, तुषार शोत्री, साहिल शोत्री, उमा भालेराव, संदीप परदेशी यांसह मुंबई बँकेचे अधिकारी आणि सोसायटीचे रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आ. दरेकर म्हणाले की, “स्वयंपुनर्विकासाच्या माध्यमातून स्वतःचे घर विकासकाशिवाय बनवा हा विचार तुम्ही पुढे आणून त्याला प्रत्यक्ष कृतीतून पुढे नेण्याचे काम करताहात. माझे आभार मानण्यापेक्षा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचे आभार मानायला हवेत. अनेक संकल्पना आपल्या मनात असतात परंतु त्या संकल्पनेला ताकद देण्याचे कामं करणारे नेतृत्व असेल तर काय होऊ शकते त्याचा चमत्कार म्हणजे स्वयंपुनर्विकास आज मुंबई शहरात दिसतोय.”
दरेकर पुढे म्हणाले की, स्वयंपुनर्विकास योजनेचा विचार माझ्या मनात १५-२० वर्षांपूर्वी आला. सोसायट्यांना पैसे उपलब्ध करून दिले, शासन स्तरावर परवानग्यांचे वन विंडो केले तर हा विषय पुढे जाऊ शकतो. प्रयोग केला. त्यावेळी सवलती नसताना एक-दोन इमारती उभ्या केल्या. मुख्यमंत्र्यांना हा विषय समजावून सांगितला. या योजनेसाठी आरबीआयकडे परवानगी मागितली होती. मात्र ती त्यांनी नाकारली. त्यानंतर विरोधीपक्षनेते असताना देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांची भेट घेतली असता त्यांना स्वयंपुनर्विकासाचे महत्व, या योजनेत कुठेही खरेदी-विक्रीचा व्यवसाय नाही जो लाभ मिळतो तो सभासदांना मिळतो, आदी बाबी समजावून सांगितल्या. आरबीआयचे गव्हर्नर दास यांनी स्वयंपुनर्विकास योजनेला देशभर पैसे देण्याची पॉलिसी आणली. अनेक सोसायट्यांना पैसे दिले. त्यात येणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. गोरेगाव येथील परिषदेत स्वयंपुनर्विकासाच्या २० मागण्या केल्या होत्या. त्यापैकी १८ मागण्यांचे शासन निर्णय तात्काळ निघाले. तिथून स्वयंपुनर्विकासाला गती मिळाल्याचेही दरेकर म्हणाले.
दरेकर पुढे म्हणाले की, “आज स्वयंपुनर्विकास योजनेला जोरात प्रतिसाद मिळतोय. १६०० सोसायट्यांचे प्रस्ताव माझ्याकडे आलेत. शिवधनुष्य उचललेय. मात्र यासाठी पैसे भरपूर लागणार आहेत. माझ्याकडे प्रचंड इच्छाशक्ती आणि प्रामाणिकपणा आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले त्यांनी राज्य सहकारी बँकेला सांगितले. राज्य सहकारी बँक १० हजार कोटी स्वयंपुनर्विकासाला देणार आहे. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी एमसीडीसीच्या माध्यमातून एक हजार कोटी देण्याचे मान्य केलेय. हा पसारा एवढा वाढला आहे की, ५० हजार कोटींचा प्रस्ताव ‘मित्रा‘च्या माध्यमातून आम्ही बनवतोय. सोसायट्यांना पैशाची अडचण भविष्यात येणार नसल्याचेही, दरेकर म्हणाले.
*स्वयंपुनर्विकास ही एक चळवळ*
दरेकर म्हणाले की, “स्वयंपुनर्विकास योजनेसाठी अनेक महत्वाचे निर्णय केलेत. प्रीमियमवर तीन वर्ष सूट दिलीय. कायद्यात स्वयंपुनर्विकास इमारत तीन वर्षात उभी राहिली पाहिजे असे आहे. २० इमारती आपण वेळेआधीच उभ्या केल्या आहेत. ३६० स्क्वे.फुटात राहणारी लोकं १४०० स्क्वे. फुटात राहायला गेली ही ताकद स्वयंपुनर्विकासात आहे. स्वयंपुनर्विकास ही चळवळ म्हणून पुढे येताना दिसत आहे. ”
00000






















