Home Uncategorized *बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण पद्धतीतील उपक्रम टांझानियात राबविणार!*

*बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण पद्धतीतील उपक्रम टांझानियात राबविणार!*

63
0

*टांझानियातील पदाधिकारी आणि जागतिक बँकेच्या सदस्यांनी दिली महानगरपालिका शाळांना भेट*

*शाळांतील शैक्षणिक कार्यपद्धती, उपक्रमांबाबत जाणून घेतली माहिती*

जागतिक बँकेच्या सदस्यांसह टांझानिया देशातील पदाधिकाऱ्यांनी नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाला भेट दिली. शिक्षण विभागाचे राज्य संचालक संजय यादव यांच्या सूचनेनुसार त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गोवंडी स्टेशन, घाटला आणि अजिजबाग (सीबीएसई) येथील शाळांना भेटी दिल्या. या भेटी दरम्यान शिष्टमंडळातील सर्व सदस्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत व विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती पाहून त्यांचे कौतुक केले. तसेच अध्ययन, अध्यापनाबरोबरच महानगरपालिका शाळांमध्ये सुरू असलेल्या विविध उपक्रमांचेही त्यांनी कौतुक केले. टांझानियामधील शिक्षण व्यवस्थेसाठी या उपक्रमांचा उपयोग करण्याचेही मत त्यांनी व्यक्त केले. या भेटीदरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या उप आयुक्त (शिक्षण) डॉ. प्राची जांभेकर यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे (पीपीटी) सर्व सदस्यांना बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची सविस्तर माहिती दिली.

याप्रसंगी ‘एम पश्चिम’ विभागाचे सहायक आयुक्त शंकर भोसले, शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांच्यासह उपशिक्षणाधिकारी, शिक्षक व मोठ्या संख्येने विद्यार्थीदेखील उपस्थित होते.

शिष्टमंडळातील सदस्यांनी गोवंडी स्टेशन शाळा, घाटले माध्यमिक शाळा आणि अजिजबाग या शाळांना भेटी दिल्या. ‘निपुण भारत’ अंतर्गत इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत सुरू असलेली पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (एफएलएन) उपक्रम, तसेच इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत खान अकॅडमीच्या सहकार्याने डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे दिले जाणारे शिक्षण याबाबतची माहिती देण्यात आली. तसेच व्यवसाय शिक्षणांतर्गत बहु-कौशल्य (मल्टी स्किल) आणि ‘रिटेल’ याबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या मूल्यमापन प्रक्रियेची माहिती, सर्व सदस्यांनी शिक्षकांकडून जाणून घेतली. शैक्षणिक उपक्रम व मूल्यमापन प्रणालीबाबतही त्यांनी माहिती घेतली.

टांझानियातील प्रतिनिधींनी बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमधील अध्ययन, अध्यापन पद्धती, स्वच्छता व विविध उपक्रमांचे कौतुक केले. त्यांच्या देशातील शिक्षण व्यवस्थेसाठी हे उपक्रम उपयुक्त ठरतील. असे मत देखील त्यांनी या भेटीदरम्यान आवर्जुन व्यक्त केले.
===

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here