*धाराशिव बीड जालना आणि छत्रपती संभाजी नगर येथील पूरग्रस्त गावांची केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली पाहणी*
मुंबई दि.26~ आसमानी संकट कोसळून मराठवाड्यातील शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे.शेतपिकांचे नुकसान झाल्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची गरज आहे. त्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत.तसेच पूरग्रस्तांना शासनाने दिलेल्या मदतीत वाढ करण्याची गरज असून त्यासाठी आपण केंद्र सरकार कडून राज्याला भरीव मदतीचे विशेष पॅकेज मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. पूरग्रस्तांना कॉर्पोरेट कंपन्यांनी मदत करण्याची गरज असून कॉर्पोरेट कंपन्यांनी पूरग्रस्त जिल्ह्यांतील गावांना दत्तक घ्यावे असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी आज केले.
केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करताना सर्वप्रथम धाराशिव जिल्हातील बोरखेडा गावातील पुरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर बीड जिल्ह्यातील आहेर चिंचोली गावात अतिवृष्टीने उध्वस्त झालेल्या शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना भरीव मदत मिळवून देण्याचे आश्वासन देऊन धीर दिला. आहेर चिंचोली गावात जाणाऱ्या रस्त्यावर नाला असून त्यावर पूल बांधण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी ना. रामदास आठवले यांच्या कडे केली. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कूपा या गावातील अक्षय बाबासाहेब जाधव हा तरुण पुरात वाहून गेल्याने त्याचा मृतदेह दुकडेगाव येथे आढळून आला.मृत अक्षय गायकवाड यांच्या कुटुंबीयांचे दूरध्वनीद्वारे संवाद साधून ना. रामदास आठवले यांनी सांत्वन केले.
त्यानंतर जालना जिल्ह्यातील पिठूरी शिरसगाव येथे पुराच्या पाण्यात अनेक घरांचे शेतीचे नुकसान झाले.त्या गावात ना. रामदास आठवले यांनी भेट दिली.या गावातील पूरग्रस्तांना या आधीच शासनाने जमीन दिली असून त्या जमिनीवर अतिक्रमण झाले असल्याची तक्रार ग्रामस्थांनी ना. रामदास आठवले याच्याकडे केली.या गावात ही नदीवर पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.”त्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ना रामदास आठवले यांनी ग्रामस्थांना दिले.त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील पाचड जवळच्या निंबगाव येथील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतपिकांची ना. रामदास आठवले यांनी पाहणी केली.या प्रवासात जागोजागी शेतकऱ्यांनी ग्रामस्थांनी विविध मागण्यांचे निवेदन ना. रामदास आठवले यांना दिले.
धाराशिव, बीड, जालना आणि छत्रपती संभाजी नगर येथील अनेक गावांत
वाहुन गेलेल्या पिकांचे , अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतपिकांची ना. रामदास आठवले यांनी पाहणी केली.यामध्ये मोठ्या प्रमाणत सोयाबीन आणि कापूस या
पिकांचे नुकसान झाले होते.
सोयाबीन,मिरची , कापूस आणि ऊस या पिकांचे धाराशिव , बीड या भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले दिसून आले.यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष बाबुराव कदम, युवक आघाडी महाराष्ट्र अध्यक्ष पप्पू कागदे,मराठवाडा अध्यक्ष मिलिंद शेळके,
ब्रह्मानंद चव्हाण, चंद्रकांत चिकटे, राजाभाऊ ओव्हाळ,
डॉ सुधाकर गुळवे, संजय बनसोडे, धाराशिव जिल्हा अध्यक्ष विद्यानंद बनसोडे आदी नेते उपस्थित होते.
यावेळी “मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.” अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मराठवाड्यात महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतपिकांची नुकसान भरपाई करण्यासाठी केंद्र सरकार द्वारे राज्याला विशेष पॅकेज मिळवून देणार असल्याचे आपण प्रयत्न करणार आहोत.” असे आश्वासन दिले.
“ज्यांनी शेतीसाठी कर्ज काढले आहे. त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज बँकांनी माफ केले पाहिजे. त्याबाबत आपण सर्व केंद्र आणि राज्य सरकारकडून बँकांना कळवणार आहेत. बँकांनी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले पाहिजे.”अशी मागणी ना.रामदास आठवले यांनी केली.
“शेतकऱ्यांना मिळालेली तातडीची मदत कमी असली तरी त्यात वाढीव मदत मिळवून देण्यासाठी आपण राज्य आणि केंद्र सरकारकडे प्रयत्न करणार असल्याचे, आश्वासन ना.रामदास आठवले यांनी शेतकऱ्यांना दिले.
आज ना.रामदास आठवले यांनी धाराशिव,बिड,जालना आणि औरंगाबाद या भागातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पुरग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या आणि नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.



















