Home महाराष्ट्र *बीडमध्ये मजूर महिलेचे अत्याचारानंतर अश्लील फोटो व्हायरल; याप्रकरणी कठोर कारवाईसाठी उपसभापती डॉ....

*बीडमध्ये मजूर महिलेचे अत्याचारानंतर अश्लील फोटो व्हायरल; याप्रकरणी कठोर कारवाईसाठी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश*

89
0

*अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींच्या ब्लॅकलिस्टिंगसह संयुक्त कारवाईचा आग्रह*

बीड, दि. ११ एप्रिल २०२५ : माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड गावातील एका गरीब अनुसूचित जातीतील महिला मजुरावर झालेल्या अमानुष अत्याचाराची घटना समोर आली असून, यानंतर संबंधित महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समजते. या गंभीर प्रकरणाची दखल विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली असून, बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना सखोल व तातडीची कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

 

माहितीनुसार, आरोपीने पीडित महिलेवर शारीरिक व मानसिक छळ करून अत्याचार केला. अत्याचारानंतर पीडितेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिला सायबर गुन्ह्याची भीती दाखवली आणि ब्लॅकमेल करत आत्महत्येस प्रवृत्त केले. या संतापजनक घटनेमुळे पीडित महिलेने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सदर प्रकरणात भारतीय दंड संहिता कलम ६४(२), माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६७ तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील कारवाई अधिक प्रभावी व न्यायसंगत होण्यासाठी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विविध स्तरांवरील उपाययोजना सुचवल्या आहेत. पीडितेला न्याय मिळावा यासाठी सक्षम व अनुभवी सरकारी वकील नेमण्याची विनंती करण्यात आली आहे. याशिवाय, तिच्या आर्थिक व मानसिक पुनर्वसनासाठी ‘मनोधैर्य’ योजना अंतर्गत तातडीने मदत पोहोचवण्याची सूचना दिली आहे. पीडित महिला अनुसूचित जातीतील असल्याने ‘ॲट्रोसिटी कायदा’ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी, असा ठोस आग्रहही व्यक्त करण्यात आला आहे.

आरोपी सध्या फरार असल्याने त्याचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याचे निर्देश डॉ. गोऱ्हे यांनी दिले आहेत. आरोपीने जर सावकारी पद्धतीने पीडितेचा छळ केला असेल, तर त्याच्यावर सावकारी कायद्यानुसार स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात यावा आणि इतर लागू असणाऱ्या कायद्यांनुसारही तातडीने कारवाई करावी, असेही नमूद करण्यात आले आहे.

पीडितेचे फोटो व्हायरल करण्यात आले असल्याने, अशा व्यक्तींविरुद्ध सायबर क्राईम कायद्यानुसार गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी. तिला मानसिक स्थैर्य मिळावे म्हणून प्रशिक्षित महिला समुपदेशकाची नेमणूक करण्यात यावी. याबरोबरच, अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्यांना काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकून, त्यांच्यावर साखर आयुक्त, कारखाना आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नांतून सखोल कार्यवाही करण्यात यावी, अशी विशेष सूचना डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.

त्याचबरोबर याप्रकरणी तातडीने अंमलबजावणी करून संबंधित अहवाल आमच्या कार्यालयास सादर करण्यात यावा, असा स्पष्ट निर्देशही देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here