*महाराष्ट्रात पुन्हा एकदा शरद पवार साहेबांच्या पुरोगामी विचारांचा विजय! – प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे*
काल झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पदवीधर मतदारसंघांतून महाविकास आघाडीचे तीन उमेदवार विजयी झाले. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या पुणे पदवीधर आणि मराठवाडा पदवीधर मतदारसंघांतून उच्चशिक्षित हर्षदा देशमुख जाधव आणि डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील हे विजयी झाले. यातून ‘हा पक्ष संपला, संपला,’ अशी वल्गना करणाऱ्यांना शरद पवार साहेबांच्या कर्तृत्वाचे वलय आणि त्यांच्या नावाची जादू काय आहे, याची पुन्हा एकदा प्रचिती आली.
पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी आणि हिंगोली या सर्व जिल्ह्यांमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या विचारांना मानणारा, त्यांचे कर्तृत्व जाणणारा आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारा मोठा समुदाय आहे. पवार साहेबांच्या सुरुवातीच्या राजकीय प्रवासापासून आजपर्यंत हे दोन्ही विभाग त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, हे कालच्या निकालातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
या निवडणुकीच्या संपूर्ण प्रवासात पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे, ज्येष्ठ नेते आमदार जयंत पाटील, माजी मंत्री फौजिया खान, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री बाळासाहेब पाटील, आमदार रोहित पवार यांच्यासह खासदार अमोल कोल्हे, खासदार बजरंग सोनवणे, खासदार अमर काळे, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, खासदार निलेश लंके, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार अभिजीत पाटील, आमदार राजू खरे, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर आणि माजी आमदार ॲड.विजय गव्हाणे तसेच पक्षातील इतर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, स्थानिक नेते व कार्यकर्त्यांचे मोलाचे मार्गदर्शन, भक्कम पाठबळ आणि अमूल्य सहकार्य लाभले. या सर्वांच्या अनुभवपूर्ण मार्गदर्शनातून, सक्रिय सहभागातून आणि प्रत्येक टप्प्यावर मिळालेल्या साथीमुळे नवी ऊर्जा, आत्मविश्वास आणि एकजुटीने कार्य करण्याची प्रेरणा मिळाली.
‘शरद पवार संपले, पक्ष संपला,’ अशा वल्गना अनेकांनी केल्या पण हा पक्ष संपणारा नाही. तो आजही इथल्या जनसामान्यांमध्ये आणि तरुणाईमध्ये टिकून आहे, हे कालच्या विजयाने दाखवून दिले. मागील महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद समितीच्या निवडणुकांमध्ये स्वर्गीय अजितदादा पवार असताना एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पक्षाची ताकद किंवा पक्षाचे पाठबळ यांचा कोणालाच नेमका अंदाज बांधता आला नाही.
विधान परिषद निवडणुकीतही दबावामुळे अनेक पक्षांच्या उमेदवारांनी माघार घेतली. परंतु पक्षाचे अभयसिंह जगताप यांच्या माध्यमातून आमचा उमेदवार ताकदीने उभा राहिला आणि लढला. हार-जीत हा राजकारणाचा अविभाज्य भाग आहे परंतु हार-जीतीच्या पलीकडे जाऊन, नवीन संधींचा स्वीकार करत आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या जोरावर खंबीरपणे लढा दिला जातो, तेव्हाच इतिहास घडतो.
सध्या संपूर्ण देशाची आणि राज्याची परिस्थिती पाहता, महागाई, बेरोजगारी, दुष्काळी परिस्थिती, शेतकऱ्यांची नाराजी, युवकांमधील असंतोष आणि पेपरफुटी यांसारख्या गंभीर प्रश्नांमुळे महाराष्ट्रातील जनता नाराज आहे. याचाच प्रत्यय काल पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीत पाहायला मिळाला. विशेषतः पदवीधर मतदारसंघातील युवकांनी आणि उच्चशिक्षित मतदारांनी दिलेला कौल अत्यंत महत्त्वाचा आहे. मतांची विभागणी झाली नसती, तर शिक्षक मतदारसंघांतही दोन्ही उमेदवार निवडून आले असते.
विरोधी पक्षांच्या मतांची एकत्रित बेरीज पाहता, निवडून आलेल्या उमेदवारांना मिळालेल्या मतांपेक्षा विरोधकांची एकत्रित मते अधिक आहेत, हे वास्तव आपल्यासमोर आले होते. असो. शिक्षक मतदारसंघातील मतदानाच्या वेळी सरकारमधील काही मंत्र्यांनी ‘आम्ही SIT नेमू,’ अशा प्रकारच्या धमक्या दिल्या. तसेच, यंत्रणेचा वापर करून शिक्षकांवर दबाव टाकण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
तरीसुद्धा, कालच्या मतदानातून एक गोष्ट स्पष्टपणे दिसून आली. सर्वसामान्य महाराष्ट्राचा कल हा सामाजिक आणि राजकीय द्वेषाच्या राजकारणापेक्षा विकास आणि प्रगतीच्या बाजूने आहे. मी महाराष्ट्रातील तमाम पदवीधर मतदारांचे आणि शिक्षकांचे मनापासून आभार मानतो.
महाविकास आघाडीने एकत्रितपणे, योग्य नियोजन करून आणि समन्वयाने काम केले, तर सत्ताधाऱ्यांचाही पराभव होऊ शकतो, हा महत्त्वपूर्ण संदेश या निवडणुकीने दिला आहे. हा विजय केवळ उमेदवारांचा नाही, तर पुरोगामी विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाचा आहे!

























