Home राजकीय *युद्धग्रस्त जगात शांततेसाठी मानवी नात्यांचे परिवर्तन गरजेचे:स्वाध्याय परिवाराच्या जयश्री तळवलकर यांचे असीसी...

*युद्धग्रस्त जगात शांततेसाठी मानवी नात्यांचे परिवर्तन गरजेचे:स्वाध्याय परिवाराच्या जयश्री तळवलकर यांचे असीसी परिषदेत विचार*

9
0

*युद्धग्रस्त जगात शांततेसाठी मानवी नात्यांचे परिवर्तन गरजेचे:स्वाध्याय परिवाराच्या जयश्री तळवलकर यांचे असीसी परिषदेत विचार*

*असीसी (इटली)*:जगातील खरी शांतता ही केवळ कायदे, भौतिक समृद्धी अथवा नियमांच्या अंमलबजावणीने लादता येत नाही, तर ती मानवाच्या वैयक्तिक परिवर्तनातून आणि ईश्वरी तत्त्वावर आधारित परस्पर नात्यांतूनच शक्य आहे,” असे विचार स्वाध्याय परिवाराशी संबंधित जयश्री तळवलकर यांनी मांडले. सेंट फ्रान्सिस यांच्या ८०० व्या स्मृतीदिनानिमित्त आणि ‘स्पिरिट ऑफ असीसी’च्या ४० व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित जागतिक धर्म परिषदेत त्या बोलत होत्या.

या परिषदेत बोलताना त्यांनी सध्याच्या जागतिक स्थितीवर भाष्य केले. “जेव्हा आपण ‘युद्धग्रस्त जग’ असा उल्लेख करतो, तेव्हा त्याचा खरा अर्थ असा असतो की जगातील माणसे एकमेकांशी लढत आहेत; म्हणजेच मानवता स्वतःशीच युद्ध करत आहे. संपूर्ण जगाच्या समस्यांवर एकदम उपाय शोधणे कठीण वाटत असले, तरी त्याची सुरुवात प्रत्येक वैयक्तिक माणसापासून होऊ शकते.

व्यक्तीमधील बदलच पुढे समाज, राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रस्थापित करू शकतो,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “केवळ अन्न, दारिद्र्य निर्मूलन, संपत्ती, शिक्षण किंवा राजकीय सत्ता मानवाला पूर्ण समाधान अथवा चिरस्थायी शांतता देऊ शकत नाही. संचारबंदीमुळे रस्त्यावरील गर्दी शांत करता येईल, परंतु माणसाच्या मनातील राग, द्वेष आणि सूडाची भावना नष्ट करता येत नाही.

धर्म हा केवळ बाह्य कर्मकांडात न अडकता, माणसाला अंतर्मुख करणारा आणि अधिक चांगला माणूस बनवणारा असला पाहिजे.”
भक्तीच्या व्यापक संकल्पनेवर प्रकाश टाकताना त्या म्हणाल्या की, “भक्ती म्हणजे ठरावीक पूजाविधी नसून प्रत्येकात ईश्वराचे अस्तित्व पाहणे आणि कृतज्ञता व्यक्त करणे होय.

जात, धर्म, भाषा, देश आणि आर्थिक भेदांच्या पलीकडे जाऊन एकमेकांमधील ईश्वरी अंश ओळखल्यासच समाजात बंधुभाव निर्माण होईल.”
यावेळी त्यांनी पूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या प्रेरणेने १९४२ पासून सुरू झालेल्या ‘स्वाध्याय’ उपक्रमाचा उल्लेख केला. “सुमारे ८५ लाख लोक जोडलेल्या या चळवळीने तळागाळातील माणसाला ईश्वरी नात्याच्या भावनेतून एकत्र आणले आहे. जरी ही प्रक्रिया संथ असली, तरी मानवी संबंधांमधील हे आत्मिक परिवर्तनच जगात कायमस्वरूपी शांततेचा पाया रचू शकते,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here