कुठे आहे भाजपचा सबका विकास? – विजय वडेट्टीवार
विकासाच्या मोठमोठ्या गप्पा मारणाऱ्या या निष्क्रीय महायुतीच्या राज्यात, गडचिरोलीत आदिवासी बांधवांना हक्काच्या रस्त्यासाठी पायी मोर्चा काढावा लागणे, हे अतिशय दुर्दैवी आहे.
आलापल्ली-खांदला रस्ता ३० वर्षे रखडवून ठेवणाऱ्या स्थानिक आमदाराला आणि प्रशासनाला जनतेच्या मरणाचे काहीच सोयरसुतक नाही का? रुग्णवाहिका पोहोचू शकत नसल्याने निष्पाप लोक मरत आहेत, तरीही हे बेशरम सरकार आणि आदिवासी विकास मंत्री गप्प का आहेत?
हा आदिवासी बांधवांच्या अस्तित्वाचा लढा आहे! भ्रष्ट आणि संवेदनाहीन सरकारने तातडीने कार्यवाही करून त्यांच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा. यापुढे जर एकही निष्पाप जीव गेला, तर त्याचा हिशोब सरकारला द्यावा लागेल!
विजयादशमीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा होत असताना गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील इरपनपायली येथे सकाळी शेतात धान कापण्यासाठी गेलेल्या ७० वर्षीय बिलाशी आनंद बा. यांच्यावर वाघाने हल्ला केला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. मुख्यमंत्री हे स्वतः गडचिरोलीचे पालकमंत्री असतानाही जिल्ह्यात नागरिकांचा जीव सुरक्षित नसेल, तर या जबाबदारीचे उत्तर कोण देणार?
यापूर्वी दोलंदा येथे वाघाच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांना वाघाचा बंदोबस्त करण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले होते. मात्र, दोन महिने उलटूनही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप ग्रामस्थ करीत आहेत. मुख्यमंत्री स्वतः पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातच आश्वासनांनंतरही परिस्थिती बदलत नसेल, तर प्रशासनावर नियंत्रण कोणाचे आहे?
आणखी किती निष्पाप जीवांचे बळी गेल्यानंतर सरकार जागे होणार? सरकारने या घटनेची गंभीर दखल घेऊन वन विभागाची जबाबदारी निश्चित करावी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात. गडचिरोलीच्या जनतेला आश्वासने नकोत, सुरक्षिततेची ठोस हमी हवी!
























