*मनुष्य गौरव दिन ; व्यक्ती उन्नतीतून समाज समृद्धीकडे…*
-सचिन देव: अध्यात्मिक साहित्यिक पत्रकार
जर व्यक्तीचं जीवन विचारांनी, कर्माने आणि आचरणाने उन्नत झालं, तर आपोआपच कुटुंबं संस्कारी होतील. त्या संस्कारी कुटुंबांमुळे समाज सांस्कृतिक दृष्ट्या उन्नत होईल; आणि असा समाज विकसित झाला की राष्ट्र आणि अखेरीस विश्वही समृद्ध होईल.
पण जर व्यक्ती निराशेने, उद्विग्नतेने आणि चिंतेने ग्रासलेली असेल, तिच्या जीवनातच गोडी नसेल, समाधान नसेल, तर मग कुटुंब, समाज, राष्ट्र आणि विश्व संस्कारी व समृद्ध कसे होणार?
आजच्या घडीला व्यक्तीच्या जीवनावर पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव जरी दिसत असला, ती चिंतामुक्त, उत्साही, प्रात्यक्षिक, जिज्ञासू, ज्ञानी आणि विचारशील भासत असली, तरी हा प्रभाव बहुधा काही क्षणांसाठीच असतो. आयुष्यभर त्या मूल्यांना आचरणात आणणं हे वेगळं आणि कठीण असतं, आणि ते सर्वांनाच जमेल असं नाही. ही गोष्ट परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले (दादाजी) यांनी फार लवकर ओळखली होती.
व्यक्तीच्या प्रत्येक कृतीत आणि विचारात भगवंत जोडलेला आहे ही भावना त्यांनी महत्प्रयत्नाने, जागरूकतेने आणि सातत्याने समाजात रुजवली.
“माझं जीवन भगवंत चालवतो… दिवसभर त्याच्याइतकं माझ्या जवळ कुणीच नाही,” अशी भावना जर व्यक्तीच्या जीवनात दृढ झाली, तर तिचं जीवन प्रेमाने आणि संयमानं नियंत्रीत होतं. भगवंताशी जोडलेली व्यक्ती खऱ्या अर्थाने विनयशील होते. कारण नैतिकतेच्या मुळाशी भगवंताचं अधिष्ठान असतं. म्हणूनच तिचं मन आणि आचरण एकरूप होतं, ती आत वेगळी आणि बाहेर वेगळी राहत नाही.
अशी व्यक्ती दुसऱ्यालाही “तो माझ्याप्रमाणेच आहे” असं मानते, त्यामुळे परस्पर सन्मानाची भावना जीवनात दृढ राहते. त्यातून कुटुंब, समाज, राष्ट्र आणि महापुरुषांविषयी त्यागाची व समर्पणाची भावना विकसित होते. कुटुंबं एकत्र राहतात, समाज जुळलेला राहतो, ही एक अखंड प्रक्रिया ठरते.
अशा प्रकारे वर्षानुवर्षे जर माणसं या भावनेनं जगली, तर त्यांच्या जीवनात काही भगवद्प्रेरित स्थायी गुण निर्माण होतात. यासाठीच पूजनीय दादाजींनी लाखो लोकांना एका आचार, विचार उच्चाराने ध्येयासाठी एकत्र आणलं, केवळ प्रवचन करून नव्हे, तर वर्षानुवर्षे गावोगाव फिरून, थकलेल्या-भटकलेल्या जीवांच्या हाताला प्रेमाने हात देऊन, भगवंताला अपेक्षित कर्मयोग साधून.
आज दिनांक १९ ऑक्टोबर परमपूज्य पांडुरंगशास्त्री आठवले (दादाजी) यांचा जन्मदिन, “मनुष्य गौरव दिन”. सर्व स्वाध्यायी त्यांना प्रेमाने “दादाजी” म्हणून संबोधतात.
या दिवशी विश्वातील अखिल स्वाध्याय परिवार दादाजींचा जन्मदिन अत्यंत श्रद्धा, प्रेम आणि प्रेरणेने साजरा करतो. लाखो स्वाध्यायी स्वतःची टाइम-टिकिट आणि टिफिन घेऊन गावोगाव लोकांना भेटायला जातात. आदिवासी, आगरी, वागरी, शहरी, नागरी अशा सर्व स्तरांतील लोकांशी ते प्रेमाने संवाद साधतात.
ते केवळ भेटत नाहीत, तर भगवंताचा आत्मीय संबंध समजून घेतात आणि इतरांनाही तो अनुभवून देतात. भगवंताशी असलेलं नातं निस्वार्थ कृतींमधून समजून घेणं आणि जगणं ,हाच त्यांचा मार्ग असतो. अशा या भेटी-प्रवासी भावनेतून व्यक्तिजीवन आणि समाजजीवन यांचा अतूट संगम घडतो.
जेव्हा आत्मजागरूकता निर्माण होते, तेव्हा अगदी “अशक्य” वाटणारी कामंदेखील सहज शक्य होतात. कदाचित ह्यालाच प्राचीन काळी “कामधेनू” असं म्हटलं जात असावं, कारण ती इच्छित सर्व कार्य सिद्ध करणारी शक्तीच आहे.
२५ ऑक्टोबर २००३ रोजी दादाजींचं देहावसान झालं असलं, तरी आजही प्रत्येक स्वाध्यायीच्या हृदयात त्यांची जिवंत उपस्थिती जाणवते. म्हणूनच आज स्वाध्याय परिवार ४० पेक्षा अधिक देशांत पोहोचला आहे आणि अजूनही वाढत आहे.
आजही दादाजींचा आशीर्वाद देणारा हात प्रत्येक स्वाध्यायीकडे आहे, आणि त्यांच्या प्रेरक वाणीचे शब्द मनात घुमतात,
“माणसा जवळ पैसा, प्रतिष्ठा काहीही नसली तरी भगवंत तुझ्या जवळ आहे. म्हणून तू हीन, दिन किंवा लाचार बनू नकोस. प्रयत्न कर,कारण मनापासून केलेले प्रयत्न कधीही व्यर्थ जात नाहीत. आणि लक्षात ठेव, दुसरा हा ‘दुसरा’ नाही; तोही तुझाच भाऊ आहे, ज्याने आपल्याला सर्वांना घडवलं त्या भगवंताच्या नात्याने.”
भक्ती ही सामाजिक शक्ती आहे. खऱ्या अर्थाने हीच शक्ती दादाजींनी व्यक्ती तसेच समाजात रुजवली. केवळ नारळ, फळं, फुलं अर्पण केली की भक्ती पूर्ण होते असं नाही, तो तर भक्तीचा प्रारंभ आहे. पण त्यानंतरसुद्धा माझ्या आणि समाजजीवनातील प्रत्येक टप्प्यावर “भगवंत माझ्यासोबत आहे, तोच माझ्या आचरणात आहे” ही जाणीव ठेवून जीवनव्यवहार साधणं,हीच खरी भक्ती आहे.
अशी भक्ती म्हणजे केवळ उपासना नाही; ती आत्मशुद्धी आणि समाजनिर्मितीची साधना आहे. राम आणि कृष्ण अवतारांनी हेच करून दाखवलं, भक्ती आणि कर्म यांचा संगम घडवला. त्यांनी अध्यात्म आचरणात आणून कुटुंबांचे संस्कार घडवले, आणि त्या संस्कारांमुळे राष्ट्र विकसित झालं.























