*संपादकीय टीप:* कोरोना काळात निलेश मदाने यांनी स्वरस्मरणरंजन शीर्षकाखाली १० लेख लिहिले. त्यातील हा १० वा लेख! आज अभिनेते नाना पाटेकर यांना आदरांजली म्हणून प्रकाशित करत आहोत.
*- संपादक, MAI MEDIA 24*
—
इतनी शक्ती हमे देना दाता
मन का विश्वास कमजोर हो ना…
हिंदी चित्रपटसृष्टीच्या १९८० च्या दशकातील ८६ ते ९० पर्यंतचा काळ गाजविला तो आपला मराठी दिग्दर्शक एन.चंद्रा तथा चंद्रशेखर नार्वेकर यांनी. बॉलिवूडमध्ये निर्माता-दिग्दर्शक म्हणून पुढे यायचं असेल तर मराठी नाव घेऊन पदार्पण करणं जोखमीचं असलेला तो जमाना होता. नाना पाटेकर यांना सोबत घेत अवघ्या १२ लाखात पूर्ण केलेला “अंकुश” बॉक्स ऑफिसवर हिट तर ठरलाच पण त्याबरोबरच त्याने बड्या निर्मात्यांना एन.चंद्रापुढे रांग लावायला बाध्य केलं. नाना तेव्हा स्टार म्हणून प्रस्थापित झालेला नसल्यानं या चित्रपटात स्टार असा कुणीही नव्हता, तरीही पटकथा लेखक-दिग्दर्शक-निर्माता असलेल्या एन.चंद्रा टचमुळे १२ लाखातील “अंकुश” ने ९५ लाखांचा गल्ला खेचला. एक मराठी माणूस गुणवत्तेच्या जोरावर आडमुठ्या परप्रांतीय लॉबीला पुरून उरला होता! “इतनी शक्ती हमे देना दाता” हे आशालता यांच्या भूमिकेतील मनोबल वाढविणारं भजन (किंवा प्रार्थना) तर चित्रपटाही पलीकडं विलक्षण लोकप्रिय झालं होतं.
एन.चंद्रा यांनी “प्रतिघात”(१९८७), “तेजाब”(१९८८), “नरसिंहा” असे ओळीने गाजलेले चित्रपट पुढे दिले. “अंकुश”(१९८६) प्रदर्शित झाला तो काळ प्रेक्षकवर्ग चकचकीत वेशातील गुळगुळीत चेहऱ्यांच्या हिरो – हिरोईनला, त्याच त्या साच्यातील प्रेमकथांना कंटाळलेला असा होता. मुंबई महानगरातील चार शिक्षित बेरोजगारांची कथा, त्यांचा रोजचा जगण्याचा संघर्ष, जीवनातील चढउतार प्रेक्षकांना प्रातिनिधीक वाटले. थोडक्यात, पडद्यावर वास्तववादी चित्रण (हिंसेला प्राधान्य देणारे) साकारत असल्याचे सांगत एन.चंद्रा यांनी बदलत्या समाजमनाची नस अचूक पकडली होती. शाळेचा टप्पा पार करून कॉलेजमध्ये तर आलो, पण पुढे काय….? अशा संक्रमण अवस्थेतील नवतरुण आणि त्यांचे कुटुंबिय असे दोन्ही घटक “अंकुश” मुळे त्यांच्याशी जोडले गेले. भवताल बिघडलेला असला तरी संयम आणि संस्कार जपले पाहिजेत हे अधोरेखीत करणारी ही प्रार्थना त्यामुळेच सर्वतोमुखी झाली असावी. दिग्दर्शक नीट समजण्यासाठी काही चित्रपट मी थिएटरमध्ये जाऊन दोनदा बघितले. “अंकुश” आणि “सत्या” हे दोन त्यापैकी होत. “अंकुश” पडद्यावर झळकला तेव्हा १० वी चं वर्ष सुरू झालेलं होतं. पण, त्याचदरम्यान “माफीचा साक्षीदार” मध्ये भेटलेला नाना म्हणजे काहीतरी वेगळं रसायन आहे याची जाणीव आम्हा शाळकरी मित्रांना तेव्हाच झाली होती. त्यामुळे त्याचं असं हिंदी चित्रपटातील आक्रमक पदार्पण नुकतंच मिसरूड फुटायला लागलेल्या आमच्यासारख्या अनेकांना आकृष्ट आणि प्रभावित करणारं होतं.
“अंकुश”चं यश साजरं होत असतांनाच पुढच्या “प्रतिघात”चं चित्रीकरण नाशिकनगरीत व्हावं हा तर कलाप्रेमी नाशिककरांसाठी अपूर्व योग होता. “प्रतिघात” थिएटरमध्ये बघतांना त्यातील संवाद ऐकण्याऐवजी “अरे ते बघ…अरे हे बघ ” असा चित्रीकरण झालेल्या ठिकाणांचा पुकारा प्रेक्षकांकडून काही क्षण चालायचा. चित्रीकरणादरम्यान नाना पाटेकर नाशिकमुक्कामी असतांना दै.आपला महाराष्ट्रचे पत्रकार आणि माझे काका श्री विश्वास मदाने यांच्या घरी ते चहापानासाठी येऊन गेले, तेव्हा त्यांची मुलाखतही काकाने घेतली, जी पुढल्या महिन्यात दिवाळीअंकात प्रसिध्द झाली. हा अंक मी खूप दिवस जपून ठेवला होता.
…हे स्वरस्मरणरंजन रेखाटत असतांना मी प्रारंभीच सांगितले होते की काही गाणी,गीतं,कविता विविध प्रसंग आणि आठवणींच्या माध्यमातून मनावर ठसली जातात. कोणत्या न कोणत्या कारणांनी ती आठवणींच्या हिंदोळ्यावर वरखाली होत असतात. अशांचा एक सामान्य श्रोता अथवा दर्शक म्हणून घेतलेला हा धांडोळा आहे, हे त्यांचे समीक्षण नाही आणि रसग्रहणही नाही. नाशिकशी संबंधित प्रसंग आणि आठवणी त्यात असल्या तरी सर्वांनी आपापल्या शहरात, गावात असेच क्षण अनुभवलेले असू शकतात. ते यानिमित्ताने वाचकांना आठवले जाणे हे महत्वाचे… क्रांतिकारकांचे मुकुटमणी, उत्कट राष्ट्रभक्तीचे धगधगते अग्निकुंड, असामान्य प्रतिभेचे महाकवी स्वातंत्र्यवीर सावरकर आणि ज्ञानपीठप्राप्त कविकुलगुरु कुसुमाग्रज या दोनही तात्यांचा नुसता नामोच्चार होताच आपण सर्व नतमस्तक होतो. समस्त नाशिककरांसाठी तर तीळभांडेश्वर गल्लीतील अभिनव भारत मंदिर, भगूर येथील स्मारक आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान ही ठिकाणे म्हणजे तीर्थक्षेत्रांसमान चिरंतन स्फूर्तीचा आणि अखंड ऊर्जेचा स्रोतच. “जयोस्तुते जयोस्तुते श्रीमहंनमंगले शिवास्पदे शुभदे…” रेडिओवर लागले की लहानपणी आणि आताही समग्र सावरकर चरित्र डोळ्यासमोर उभे राहते. “ने मजसी ने परत मातृभूमीला… सागरा प्राण तळमळला …” ऐकतांना एकीकडे डोळे पाणावतात आणि दुसरीकडे वचन न पाळणाऱ्या सागराला “आंग्लभूमीभयभीता’ असे म्हणत, याद राख ! अगस्ती ऋषींनी तुला एका आचमनात पिऊन टाकले होते ते विसरलास काय, असा सज्जड दम भरणाऱ्या स्वा.सावरकरांच्या उत्तुंग काव्यप्रतिभेने आपण स्तिमित होतो… गाण्यासाठी अवघड असणारे हे पद्य मंगेशकरांनी गेय तर केलेच पण त्याचा अर्थही सर्वांपर्यंत पोहोचवता केला. लहानपणी दुर्गा मंगल कार्यालयात मोठ्यांबरोबर काही कार्याला आलो की शेजारी “अभिनव भारत”च्या वाड्यात डोकावताना अंगात स्फुरण संचारायचं. परवा इतिहासाच्या तासात सरांनी सांगितलेलं ते हे ठिकाण प्रत्यक्ष बघतांना छाती अभिमानानं भरून यायची. शुभ्र गणवेश आणि चकचकीत वाद्यांचा पोलीस बँड सार्वजनिक वा कौटुंबिक सोहोळयात तेव्हा सर्वांचे लक्ष वेधून घेत असे. जयोस्तुते हे पद्य त्यावर फार जोशात सादर केलं जायचं. एचपीटी कॉलेज स्नेहसंमेलनात वर्गमित्र अजित अहिरे, प्रदीप देशमुख, राजेश साळी, मिलिंद दंडगव्हाळ आदींनी हे गीत छान बसविले होते. “गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार”, या कुसुमाग्रज यांच्या कवितेबाबतही असंच व्हायचं लहानपणी. पाठयपुस्तकातील ही कविता शिकविणारे शिक्षक आणि ती शिकणारे विद्यार्थी असे दोन्ही देहभान विसरून जायचे. “कशास आई भिजविशी डोळे “पर्यंत येताच विद्यार्थी आणि शिक्षक अशा दोहोंच्या अश्रूंचा बांध केव्हाच फुटलेला असायचा… अशी ही बालवयात काळजावर कोरली गेलेली कविता रेडिओवर वा कोणत्याही कार्यक्रमात ऐकतांना शाळेतला तो वर्ग, ते शिक्षक आणि तो क्रांतिकारक डोळ्यासमोर उभा राहतो. अद्भूत प्रतिभेचे सामर्थ्य तितकेच प्रत्ययकारी असते ते असे.
…स्वरस्मरणरंजनाचे हे दहा भाग आपल्यापुढे सादर करतांना आपल्यासह मला पुनर्प्रत्ययाचा आनंद घेता आला. काही मित्र-मैत्रीणींनी पुढचा भाग अजून कसा आला नाही, असे विचारून ५/७ भागांचे माझे नियोजन दहापर्यंत नेले. काही स्नेहींनी तुमचे स्वरस्मरणरंजन आता फक्त तुमचे राहिलेले नाही, तुमच्या शैलीमुळे ते आम्हा सर्वांचे झाले आहे, अशी जी कौतुकाची थाप दिली ती या लेखनाची ऊर्जा बनली. मुळात अशी मालिका मी लिहावी ही सूचना “लॉकडाऊनमध्ये आता काय करायचं ?” या विषयावरील घरातल्या चर्चेप्रसंगी पत्नी आणि मुलाने मांडली, ती मी अंमलात आणली इतकेच. तेव्हा, त्यांच्यासह आपणा सर्व वाचकस्नेहींचे मनःपूर्वक आभार मानतो. या दहा भागांमुळे लॉकडाऊन मधील आपला थोडाफार वेळ निश्चितच मजेत गेला असेल वा जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि ही संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल झुक्याचेही आभार मानून येथेच थांबतो. कोरोनाच्या विरोधातील लढाई प्रदीर्घ काळासाठी असेल हे आता स्पष्ट झाले आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांचे मनोबल कायम भक्कम राहणे आवश्यक आहे. म्हणून प्रार्थना करू या-
इतनी शक्ती हमे देना दाता
मन का विश्वास कमजोर हो ना…
धन्यवाद.
-निलेश मदाने ,
२७ एप्रिल २०२०
जनसंपर्क अधिकारी, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय
(लॉकडाउन मधील स्वरस्मरणरंजन, १०वा आणि शेवटचा भाग)
























