Home मुंबई *मुंबईतील झोपडपट्टी परिसर स्वच्छतेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून अधिक सक्षम, लोकाभिमुख व तंत्रज्ञानाची जोड...

*मुंबईतील झोपडपट्टी परिसर स्वच्छतेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून अधिक सक्षम, लोकाभिमुख व तंत्रज्ञानाची जोड असणारी ‘बृहन्मुंबई स्वच्छता सेवा योजना’ लागू होणार!*

38
0

*मुंबईतील झोपडपट्टी परिसर स्वच्छतेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून अधिक सक्षम, लोकाभिमुख व तंत्रज्ञानाची जोड असणारी ‘बृहन्मुंबई स्वच्छता सेवा योजना’ लागू होणार!*

*गटनेत्यांच्या बैठकीत तत्वतः मंजुरी प्रदान*

बृहन्मुंबई महानगरातील झोपडपट्टी, दाटीवाटीच्या आणि सघन वस्ती लोकसंख्या असलेल्या क्षेत्रांमध्ये स्वच्छतेचा स्तर उंचावण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण व लोकाभिमुख निर्णय घेतला आहे. सन २०१३ पासून राबविण्यात येत असलेल्या ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान (SMPA)’ या योजनेचे पुनरावलोकन करुन, आता काळानुरूप सुधारित, अत्यंत प्रभावी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड असलेली ‘बृहन्मुंबई स्वच्छता सेवा योजना’ ही नवीन धोरणात्मक योजना राबविण्याचा प्रस्ताव गटनेत्यांच्या बैठकीमध्ये सादर करण्यात आला. त्यास तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे.

मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली, गटनेत्यांची सभा बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील महापौर दालनात आज (दिनांक ११ ऑगस्ट २०२६) सायंकाळी पार पडली. त्यावेळी ‘बृहन्मुंबई स्वच्छता सेवा योजना’ विषयक प्रस्ताव सादर करण्यात आला.

या सभेस सभागृह नेता श्री. गणेश खणकर, विरोधी पक्षनेता श्रीमती किशोरीताई पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे, महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे, शिवसेना गटनेता श्री. अमेय घोले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस गटनेता श्री. अशरफ आजमी, समाजवादी पक्ष गटनेता श्रीमती अमरीन अब्राहनी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना गटनेता श्री. यशवंत किल्लेदार, एआयएमआयएम पक्ष गटनेता श्री. विजय उबाळे, सुधार समिती अध्यक्ष श्रीमती संध्या दोशी, बेस्ट समिती अध्यक्ष श्रीमती तृष्णा विश्वासराव, शिक्षण समिती अध्यक्ष श्रीमती राजेश्री शिरवडकर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) श्री. अभिजीत बांगर, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे, उपआयुक्त (महानगरपालिका आयुक्त कार्यालय) श्री. प्रशांत गायकवाड, उपआयुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. किरण दिघावकर, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेश मोहिते, सहायक आयुक्त (मालमत्ता) श्री. गजानन बेल्लाळे, महानगरपालिका सचिव श्री. मनोज कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

 

सन २०१३ पासून स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान (SMPA) ही योजना झोपडपट्टी क्षेत्रांमध्ये लोकसहभागातून स्वच्छता राखण्यासाठी राबविण्यात येत आहे. या अंतर्गत विविध स्वरूपाची कामे जसे की, वस्तीतील अंतर्गत पायवाटांची स्वच्छता करणे, घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे, सार्वजनिक कचरा संकलन केंद्राची स्वच्छता राखणे, वस्तीतील रस्त्यांची (२० फूट रुंदीपर्यंत) स्वच्छता करणे, शौचालयांची स्वच्छता करणे, अंतर्गत गटारांची स्वच्छता करणे तसेच स्वच्छतेबाबत प्रबोधन व जनजागृती करणे इत्यादी कामे एकत्रितपणे सोपविण्यात आली आहेत. मात्र या योजनेच्या अंमलबजावणीत अडचणी निर्माण होत असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे.

विद्यमान योजनेच्या अंमलबजावणीवेळी असे आढळून आले आहे की, कामे सोपविण्यात आलेल्या आलेल्या संस्थांना अनेक स्वरुपाची कामे देण्यात आलेली असल्याने कार्यरत संस्थेतील एका एककावर वैविध्यपूर्ण कामाचा भार येतो, त्यातून कामाची गुणवत्ता बाधित होते. सन २०१३ पासून या योजनेतील कामे करणा-या संस्थांना देण्यात येणा-या आर्थिक सहाय्याद्वारे आजपर्यंत कोणतीही वाढ न केल्याने, संस्थांना देण्यात येणारे आर्थिक सहाय्य कमी असल्यामुळे संस्थांमध्ये नाराजी आहे. तसेच खुल्या व बंदिस्त नाल्यांची तसेच अंतर्गत गटारांची स्वच्छता करण्यासाठी कुशल मनुष्यबळाची व विशेष अवजारांची आवश्यकता असते. मात्र अशी तांत्रिक स्वरूपाची कामे स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान (SMPA) योजनेतून करणे व्यवहार्य नाही.

या सर्व अडचणींवर दीर्घ, सखोल विचार करून आणि स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रभाग समित्यांच्या सूचनांचा विचार करून महानगरपालिकेने ‘बृहन्मुंबई स्वच्छता सेवा योजना’ ही नवीन सुधारित योजना आखली आहे. ही नवीन योजना नाविन्यपूर्ण व अभिनव आहे. तसेच स्थानिक पातळीवरील स्वच्छतेचा संपूर्ण चेहरामोहरा बदलून टाकणारी ठरेल, असा विश्वास आहे.

‘बृहन्मुंबई स्वच्छता सेवा योजने’ची रचना अत्यंत नियोजनबद्ध करण्यात आली आहे. या योजनेत संस्थांचे मुख्य लक्ष इतर कामांत न भरकटता केवळ दैनंदिन घरगुती कचरा संकलन आणि अंतर्गत गल्ल्यांच्या झाडलोट व स्वच्छतेवरच केंद्रित राहील. (नाले व गटार स्वच्छतेसाठी विभाग स्तरावर स्वतंत्र तांत्रिक मनुष्यबळ उपलब्ध केले जाईल. तर सार्वजनिक शौचालयांचे व्यवस्थापन समुदाय आधारित संस्था (CBO) मार्फत स्वतंत्रपणे केले जाईल.) यासोबतच संस्थांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांचे मासिक आर्थिक सहाय्य प्रति युनिट रुपये सहा हजारांवरुन थेट रुपये अकरा हजारांवर करण्यात येणार आहे. एकूणच, यातून तळागाळातील स्वच्छता व्यवस्थेला योग्य आर्थिक पाठबळ देणार आहे.

ही नवीन योजना पूर्णपणे पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकाभिमुख बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. कामांच्या अद्ययावत (रिअल-टाईम) निरीक्षणासाठी जीपीएस (GPS) आधारित मोबाईल अ‍ॅपचा वापर केला जाईल. नागरिकांना थेट तक्रार नोंदवण्यासाठी क्यू आर कोडची डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, ज्यामुळे सामान्य नागरिकांचा सहभाग वाढेल.

एवढेच नाही तर निष्काळजीपणा आढळल्यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सलग तीन वेळा दंडनीय बाबींची पुनरावृत्ती झाल्यास संबंधित संस्थेस काळ्या यादीत (Blacklist) टाकण्यात येणार आहे. याउलट, उत्कृष्ट कामकाज करणाऱया संस्थांना दरमहा रुपये २१ हजारांचे अतिरिक्त प्रोत्साहन अनुदान देऊन गौरविण्यात येणार आहे.

ही नवीन ‘बृहन्मुंबई स्वच्छता सेवा योजना’ ही प्रशासकीय व आर्थिक पातळीवर परिणामकारक तसेच सक्षम असून खऱया अर्थाने नागरिकांच्या हिताला प्राधान्य देणारी लोकाभिमुख योजना आहे. ही योजना मुंबईतील दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये स्वच्छतेचा नवा अध्याय सुरू करेल, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला. तसेच गटनेत्यांच्या सभेत झालेल्या चर्चेतील मुद्दे या मसुदा धोरणामध्ये समाविष्ट करावेत, असे महापौरांनी निर्देश देवून या धोरण मसुद्यास तत्वतः मंजुरी दिली. हा मसुदा प्रस्ताव स्थायी समिती सभेमध्ये तसेच महानगरपालिकेच्या सभेमध्ये सादर होत असताना त्यामध्ये सर्व नगरसेवकांच्या सूचनांचा यथायोग्य समावेश करण्याची सूचनाही महापौर श्रीमती रितू तावडे यांनी यावेळी केली.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here