Home मुंबई *‘पादचारी प्रथम’ अभियान अंतर्गत मुलुंड परिसरातील पदपथांवरील अनधिकृत दुकाने, फेरीवाल्यांचे निष्कासन*

*‘पादचारी प्रथम’ अभियान अंतर्गत मुलुंड परिसरातील पदपथांवरील अनधिकृत दुकाने, फेरीवाल्यांचे निष्कासन*

35
0

*‘पादचारी प्रथम’ अभियान अंतर्गत मुलुंड परिसरातील पदपथांवरील अनधिकृत दुकाने, फेरीवाल्यांचे निष्कासन*

*• ४० पावसाळी छत, ०८ अनधिकृत दुकाने, ३० फेरीवाले, ०६ वाहनमार्ग निष्कासित*

*• बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘टी’, ‘एस’ आणि ‘एन’ विभाग यांची संयुक्त कारवाई*

बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बृहन्मुंबई क्षेत्रात (मुंबई शहर आणि उपनगरे) ‘पादचारी प्रथम’ (Pedestrian First) अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत, मुलुंड परिसरातील पदपथांवर अडथळा निर्माण करणारे ४० पावसाळी छत, ०८ अनधिकृत दुकाने आणि ३० फेरीवाल्यांचे आज (दिनांक ११ ऑगस्ट २०२६) निष्कासन करण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘टी’, ‘एस’ आणि ‘एन’ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही कारवाई करण्यात आली.

माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनात, पदपथांवरील अनधिकृत फेरीवाले व अतिक्रमणे तत्काळ हटवून पदपथ अडथळामुक्त करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून ‘पेडेस्ट्रियन फर्स्ट’ (Pedestrian First) अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.

या अनुषंगाने, उपायुक्त (परिमंडळ-६) श्री. संतोषकुमार धोंडे यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त (टी विभाग) श्रीमती योगिता कोल्हे, सहायक आयुक्त (एस विभाग) श्रीमती समरीन सय्यद, सहायक आयुक्त (एन विभाग) श्री. जयदीप मोरे यांच्या नेतृत्वात संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘टी’ विभागातील मुलुंड (पश्चिम) येथील राम रतन त्रिवेदी मार्ग, जवाहरलाल नेहरू मार्ग, सेवाराम लालवाणी मार्ग, रतनजी हिरजी भोगराज मार्ग, झवेर मार्ग आणि गणेश गावडे मार्ग या ठिकाणी तसेच मुलुंड (पूर्व) येथील लोकमान्य टिळक मार्ग आणि नवघर मार्ग परिसरात ही कारवाई करण्यात आली. यामध्ये, पदपथांवर उभारण्यात आलेले ४० पावसाळी छत, ०८ अनधिकृत दुकाने, ३० फेरीवाले तसेच पदपथांत अडथळा निर्माण करणाऱ्या ०६ वाहनमार्गांवर (Carriageway) निष्कासनाची कारवाई करण्यात आली. तसेच, पदपथांवर अडथळा निर्माण करणारे साहित्य जप्त करण्यात आले.

परिमंडळ ६ मध्ये कार्यरत १३ दुय्यम अभियंता, ०७ अनुज्ञापन निरीक्षक, ६६ कामगार आदी मनुष्यबळांसह १० वाहने, ०५ डंपर, ०५ जेसीबी आणि अन्य संयंत्राच्या सहाय्याने ही कारवाई करण्यात आली. यावेळी, पुरेसा पोलिस बंदोबस्त तैनात होता.

दरम्यान, पादचाऱ्यांसाठी अडथळामुक्त आणि सुलभ पदपथ उपलब्ध करुन देण्यासाठी महानगरपालिका प्रशासन कटीबद्ध आहे. तथापि, कुणीही पदपथांवर अडथळा निर्माण करू नये अथवा अनधिकृत बांधकाम करू नये. असे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.
***
(जसंवि/३५६)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here