*मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विशेष उपक्रम*
*केंद्र, राज्य शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध*
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मुंबई शहर जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियान अंतर्गत विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियान अंतर्गत बुधवार, दिनांक २२ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शीव (सायन)-कोळीवाडा, माहीम आणि मलबार हिल या तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरांच्या माध्यमातून मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांना महसूल विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसह केंद्र शासन, राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क (सेवा हमी) अधिनियमांतर्गत उपलब्ध सेवांचा लाभ एकाच ठिकाणी मिळणार आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या जन्म प्रमाणपत्र, मृत्यू प्रमाणपत्र, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, विविध दाखले, क्रीडा विभागाच्या योजना तसेच नवमतदार नोंदणी, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना, शिधापत्रिकेसंदर्भातील सेवा, मत्स्यव्यवसाय विभागामार्फत उपलब्ध विविध सेवा आदी सुविधांचा लाभ नागरिकांना शिबिरामध्ये घेता येणार आहे.
मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांनी या शिबिरास उपस्थित राहून शासनाच्या विविध लोकाभिमुख योजना व सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
*शिबिरांची ठिकाणे पुढीलप्रमाणे :*
*शीव (सायन) – कोळीवाडा विधानसभा मतदारसंघ* : सरदार नगर, शीव (पूर्व) येथील महानगरपालिका शाळेसमोरील समाज मंदीर सभागृह क्रमांक १.
*माहीम विधानसभा मतदारसंघ :* प्रभादेवी येथील सयानी मार्गावरील श्री सिद्धिविनायक मंदिराजवळील रवींद्र नाट्यमंदीर.
*मलबार हिल विधानसभा मतदारसंघ :* गावदेवी येथील गोरेगावकर मार्गावरील शारदा मंदीर हायस्कूल तळमजला
***


















