*पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे आ. प्रवीण दरेकरांची संसदीय कार्यमंत्र्यांना विनंती*
मुंबई – विधिमंडळाने आमदारांना एक स्वीय सहाय्यक आणि वाहन चालक ही सेवा दिली आहे. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून स्वीय सहाय्यक आणि वाहन चालकांच्या मानधनात वाढ करण्यात आलेली नाही. ती मानधन वाढ लवकरात लवकर करावी, अशी मागणी भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर यांनी सभागृहात पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनवर बोलताना संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.
विधानपरिषदेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनवर बोलताना आ. प्रवीण दरेकर म्हणाले कि, विधिमंडळाने आमदारांना एक स्वीय सहाय्यक आणि वाहन चालकाची सेवा दिली आहे. त्यांचे वेतन सध्या अनुक्रमे ३० हजार व २० हजार आहे. मागील अनेक वर्षात त्यात वाढ झालेली नाही. मानधनात वाढ करण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. मानधन वाढीचा प्रस्ताव गेल्या मार्चपासून प्रलंबित आहे. विधिमंडळाने संसदीय कार्य विभागाला प्रस्ताव पाठवला होता. पण काहीनाकाही त्रुटी काढून हा प्रस्ताव परत पाठवला जातो. पुन्हा हा प्रस्ताव सर्व त्रुटी दूर करून संसदीय कार्य विभागाकडे पाठवला जाणार आहे. स्वीय सहाय्यक आणि वाहन चालक यांच्या मानधन वाढीमुळे सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडणार नाही. संसदीय कार्यमंत्र्यांनी त्यांच्या विभागाला सकारात्मक निर्णय घेण्याबाबत सूचना द्याव्यात आणि स्वीय सहाय्यक यांचे मानधन ३० हजाराहून ४० हजार व वाहन चालकांचे मानधन २० हजाराहून ३० हजार करण्याबाबतचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, त्याचबरोबर आमदारांकडे दुसरा स्वीय सहाय्यक असतो त्यांना किमान विधिमंडळाचे ओळखपत्र द्यावे, अशी मागणीही दरेकरांनी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.
00000


















