*वीणा गावडे : माया, ममता आणि वात्सल्याची खाण ! -योगेश वसंत त्रिवेदी (yogeshtrivedi55@gmail.com/ 9892935321) “अरे योगेश, बाळा तुझ्या ‘सामना’त अशी अशी बातमी आमच्या साहेबांबद्दल आलीय. बातमी काय द्यायची हा सर्वस्वी तुमचा अधिकार आहे. पण आमच्या साहेबांचा हा खुलासा जरा दे नं. बरं वाटेल. “अरे योगेश बाळा, जरा आमच्या साहेबांचा एक कार्यक्रम आहे, त्याचं भाषण मला तयार करायचंय. तुझ्या कडे काही संदर्भ असला तर सांगशील का रे बाळा. तेवढंच जरा भाषण चांगले व्हायला मदत होईल”, अशा एक ना अनेक आश्वासक, प्रेमळ पण करारी, निर्धार पूर्वक संवादांची माहिती खात्यात आम्हाला एक सवयच झालेली आणि मग तुमची काय बिशाद या आमच्या आक्का उर्फ वीणा गावडे यांना नकार देण्याची. आपल्या कर्तव्याची निष्ठापूर्वक जोपासना करुन वीणा गावडे यांनी वसंत चौधरी, आप्पासाहेब कायदे यांच्या पासून दिनकरराव कचरे, मधू काळे, श्रद्धा बेलसरे, प्रल्हाद जाधव, शिवाजीराव मानकर, देवेंद्र भुजबळ, अजय अंबेकर, सुरेश वांदिले आदींपर्यंतची संचालकांची उपसंचालकांची कारकीर्द जवळून पाहिली. महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क खात्यात काम करणारे अधिकारी कर्मचारी म्हणजे घोड्याला झापडं लावल्यासारखी नाकासमोर पाहून आखून दिलेल्या चौकटीत काम करणारे असा एक सर्वसाधारण समज राज्य सरकारच्या, मंत्रालय आणि विधिमंडळात वावरणाऱ्या सरकारी व्यतिरिक्त लोकांचा झालेला आहे. अर्थात याला अपवाद असणारी मंडळी सुद्धा आपल्याला पहायला मिळतात. हां, आपण ज्या ‘द्रुष्टी’ने पाहू त्या ‘नजरे’त आपल्याला तसे दिसते. आपण चांगले वाचणारे असू तर आपल्याला समोरच्या व्यक्ती चांगल्याच दिसतील. पण रखरखीत वाळवंटात गोड पाण्याचा झरा सुद्धा आपल्याला पहायला मिळतो. मी मंत्रालयात सुमारे पस्तीस ते चाळीस वर्षांपासून वार्तांकन करण्यासाठी फिरतोय. मंत्रालय आणि विधिमंडळ हे कार्यक्षेत्र असल्याने मंत्रालयात रोज फिरणे हे आलेच. पण म्हणून केवळ पत्रकार कक्षात ‘फेव्हिकोल’ लावल्याप्रमाणे बसून राहिलो तर हाती काहीही लागणार नाही, याची खूणगाठ मनाशी बांधून. पायाला भिंगरी लावल्यागत मंत्रालयाचे सर्व मजले पायाखाली घातले. याच काळात माहिती व जनसंपर्क विभागात डीएलओ नावाचा म्हणजे विभागीय संपर्क अधिकारी यांचा एक विभाग कार्यरत आहे. या ठिकाणी न चुकता चक्कर मारणे हा एक रोजचा परिपाठ झालेला. याच विभागीय संपर्क अधिकारी विभागात जो अधिकारी वर्ग आहे तो कुणा ना कुणा मंत्री, सचिव यांच्या किंवा विविध खात्यांची माहिती देण्यासाठी नियुक्त करण्यात आलेला असतो. अशाच या विभागात वयस्कर पुरुष आणि महिला अधिकारी आपापली कर्तव्ये पार पाडित असतात. नियमितपणे तिथे ये जा करण्यामुळे आणि माहिती मिळविण्यासाठी फिरत असल्यामुळे तेथील अधिकाऱ्यांबरोबर घनिष्ठ संबंध प्रस्थापित होतात. अनेक अधिकारी आणि माझ्या वयामध्ये फारसे अंतर नसल्यामुळे हे अधिकारी कधी आपलेसे होतात हे कळतच नाही. अशीच एक आमची आक्का. अर्थात, वीणा गावडे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर जबरदस्त पकड असलेली आमची आक्का म्हणजे माहिती खात्यामधले आमचे हक्काचे ठिकाण. मी अंबरनाथ हून मंत्रालयात येत असल्याने लवकर यायचे आणि मंत्रालयातून प्रभादेवी सामना मार्गे पुन्हा अंबरनाथ असा रोजचा दिनक्रम. मग तिथे आक्का बरोबरच सुभाष खंडेलवाल, प्रभाकर शांडिल्य, बापू मायदेव, म. ना. राणे, सुधाकर तोरणे, निरंजन राऊत, अरुणकुमार नवाडे, निलीमा पिटके, वर्षा शेडगे, महाजन बाई, शोभा पौडवाल, जयंत करंजवकर, वसंत पिटके, दत्ता कुळकर्णी, सुभाष सूर्यवंशी, श्रीपाद नांदेडकर, सतीश पंडित, मुक्ताबाई पवार, ज्योतीबेन लायजावाला, चंद्रिकाबेन नाणावटी, जेठालाल शाह, मुरलीधर बंदसोडे, भीमराव इंगळे, रंगनाथ चोरमुले, होराभूषण पुरुषोत्तम शुक्ल, सतीश लळीत, अनिरुद्ध अष्टपुत्रे, सदाशिव कांबळे, हेमंत खैरे अशी असंख्य अधिकारी मंडळी आमच्या वर्तुळात पत्रकारांबरोबर वावरत होती. वर्षे उलटत गेली, अधिकारी वर्ग नवनवीन येत गेला. काही छायाचित्रकार, चतुर्थश्रेणी अधिकारी कर्मचारी यांचे संबंध सुद्धा चांगले प्रस्थापित झाले. ही अधिकारी मंडळी कधी डीएलओ तर कधी मंत्र्यांचे पीआरओ. त्यामुळे मंत्रालयातल्या तळ मजल्यापासून सहाव्या मजल्यापर्यंत सारखा वावर. पण आक्काची धावपळ काही विचारु नका. मायेच्या ममतेने वावरतांना आक्काचा कधी कठोर तर कधी वात्सल्याचा झरा, करुणेचा सागर अनुभवायला मिळत असे. आपल्या कामावरची निष्ठा, काम करण्याची पद्धत, मेहनत आणि ज्यांच्यासाठी काम करायचे त्यांच्यासाठी झोकून देऊन काम करण्याची जिद्द ही आक्का च्या ठायी पहायला मिळाली. असंख्य मंत्री, अगदी उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री, मुख्यसचिव यांच्या भूमिका वर्तमानपत्रात छापून येण्यासाठी आक्काने घेतलेले परिश्रम आणि त्यासाठी जिद्दीने काम करुन एखाद्या घोरपडीसारखी चिकाटी मी स्वतः अनुभवली आहे. आक्काच्या दालनात एकदा गेलो की आपल्या वर्तमानपत्राची भूक भागलीच म्हणून समजा. त्याचबरोबर मायेच्या ममतेने आपल्या खाण्यापिण्याची विचारपूस अशी करणार की विचारता सोय नाही. तिथे जे कोणी शिपाई असतील त्यांना आक्काच्या कामाची पद्धत अंगवळणी पडलेली असायची त्यामुळे आक्काची हाक कानावर पडली रे पडली की त्या शिपायाकडून काम पूर्ण होणारच. बहुतेक वेळा महेंद्र माने हाच आक्काचा आज्ञाधारक शिपाई असायचा. कधी कधी शफी शेख, परवडी, बालाजी पण धावत यायचे. वर्तमानपत्रात आलेल्या बातम्यांची कात्रणे चिकटवून आक्काकडे आणून देण्यापासून चहा नाश्ता जेवणाची बडदास्त ठेवणे ही कामे महेंद्र माने चोखपणे करीत असे. आक्काने आपल्या मनमिळावू, मितभाषी स्वभावाने सर्वांना रेशमी धाग्यात बांधून ठेवले आहे त्यामुळे एक तर जुन्या नव्या सर्वच पत्रकारांचे एक हक्काचे ठिकाण म्हणजे आक्का चे दालन बनलेले असायचे. आक्का सेवानिवृत्त झाल्यावरही आपलेपणाने संबंध टिकवून ठेवले आहेत. आक्का, जयंता, ज्योतीबेन, चंद्रिकाबेन असा आमचा कंपू तयार झाला. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होत आनंद द्विगुणीत करायचा आणि दुःख वाटून घेत मनं हलकी करायची हे ठरलेलेच. १० एप्रिल १९९६ रोजी माझ्या वडिलांचे देहावसान झाल्यावर ही सारी मंडळी माझ्या सांत्वनासाठी अंबरनाथ ला धावून आली. सेवानिवृत्त झाल्यावर आक्का वांद्रे येथून नव्या मुंबई येथे मुलाकडे रहायला गेली तरी बँकेच्या कामासाठी नरीमन पॉईंट येथे येतांना आम्हाला हक्काने हाक मारते त्यामुळे आम्ही एकत्र येऊन गप्पा टप्पा, स्नेहभोजन असा कार्यक्रम व्हायचा. कधी मंत्रालय उपहारगृह तर कधी नरीमन पॉइंट च्या स्टेटस पर्यंत फेरफटका मारायला जायचे. पती निधनानंतर खचून न जाता समीर आणि अभि या मुलांना स्वतःच्या पायावर उभे करतांना एकाला डॉक्टर आणि दुसऱ्याला इंजिनिअर बनविण्यात कोणतीही कसूर ठेवली नाही. मुख्यमंत्री, मंत्री यांच्या कडे डीएलओ म्हणून काम करुनही त्यांचा फायदा घेतला नाही. समाजात काय काय चालते यावर यथायोग्य टिप्पणी करतांना कुणाचेही मन दुखावणार नाही याची पुरेपूर दक्षता आक्का घेतल्याशिवाय रहात नाही. समाज माध्यमे आणि आधुनिक तंत्रज्ञान प्रचंड प्रमाणात वाढले असतांना त्याचा योग्य प्रकारे उपयोग करुन आक्का त्यावर आपली परखड, योग्य प्रतिक्रिया दिल्या शिवाय रहात नाही. माझ्या ‘पत्रकार व हितचिंतक’ समूहात अत्यंत योग्य प्रकारे प्रतिक्रिया देताना त्याचा दर्जा टिकविण्यासाठी आक्का अतीशय डोळ्यात तेल घालून कार्यरत असते आणि एखाद्या योग्य प्रतिक्रियेच्या वाखाणणी साठी शब्दभांडार रिता करते. ६ ऑगस्ट २०२० रोजी आमच्या जयंताला कोरोनाने आपल्यातून हिरावून नेले तेंव्हा आक्काचा बांध फुटला आणि आम्ही दोघेही इतके रडलो की आमच्या आसवांची नदी वाहिली म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. वर्ष होत आले तरी आमच्या नयनांमधले अश्रू सुकायचे नांव घेत नाहीत. एक जयंता कमी पडला की काय नियतीने आर आर आबांच्या जयंता आणि वसंता (पिटके) या राम लक्ष्मणातला राम ६ ऑगस्ट ला जाताच वसंता ने कच खाल्ली आणि पहाडासारखा वसंता अक्षरशः शरीराने तुटला आणि ३ नोव्हेंबर रोजी वसंता ही जयंता ला भेटण्यासाठी परमेश्वराच्या दरबारात निघून गेला. पुन्हा आक्का आणि आम्ही आसवांच्या सागरात हेलकावे खाऊ लागलो. दिवसातून क्षणाक्षणाला जयंता आणि वसंता ची आठवण निघाल्याशिवाय रहात नाही. मनाच्या भिंती भक्कम करुन येणाऱ्या संकटांना मजबूतीने सामोरे जाण्याचा निर्धार आम्ही केला आहे. आक्काने आपल्या परिवाराबरोबरच मित्रपरिवाराची काळजी वाहण्याचा विडा उचलला आहे. माया, ममता, वात्सल्याचा निर्मळ झरा म्हणजे वीणा गावडे उर्फ आमची आक्का. या आक्काला एका लेखात बंदिस्त करता येणे शक्य नाही. पण तिच्या कामगिरी कर्तबगारी ला मानाचा मुजरा करतांना तिला उदंड आयुष्य आणि ठणठणीत आरोग्य प्राप्त होवो, या आक्काच्या कुलदैवताकडे विनम्र प्रार्थना -योगेश वसंत त्रिवेदी, ९८९२९३५३२१.*




















