Home मुंबई *बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ उत्साहात साजरा*

*बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन २०२६ उत्साहात साजरा*

35
0

१२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे शहरभर विविध ठिकाणी सामुहिक योगसत्रे, जनजागृती रॅली, आरोग्य व्याख्याने आणि विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

यंदाची ‘निरोगी वृद्धत्वासाठी योग’ (Yoga for Healthy Ageing) ही संकल्पना निरोगी, सक्रिय आणि स्वावलंबी जीवनासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करणारी ठरली.
प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेला चालना देण्यासाठी महानगरपालिकेचा ‘शिव योग केंद्र’ उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत असून, सध्या १११ केंद्रांमध्ये १४० नियमित योग बॅचेसद्वारे सुमारे ६ हजार नागरिक लाभ घेत आहेत. उपक्रमाच्या प्रारंभापासून आजपर्यंत ४८ हजारांहून अधिक नागरिकांना योग प्रशिक्षणाचा लाभ मिळाला आहे.

नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक स्वास्थ्य, लवचिकता, संतुलन आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. तसेच ताणतणाव आणि जीवनशैलीजन्य आजारांवर नियंत्रण मिळविण्यास योग उपयुक्त ठरत असल्याने ते प्रभावी आणि किफायतशीर प्रतिबंधात्मक आरोग्य साधन म्हणून सिद्ध झाले आहे.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महानगरपालिकेतर्फे दिनांक २०.०६.२०२६ रोजी शहरभर २१ विशेष योगसत्रे, ४८ योग जनजागृती रॅली आणि ५८ आरोग्य जनजागृती व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले. विशेष योग सत्रांमध्ये १,१०० हून अधिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

शिव योग केंद्रांमधून लाभ घेतलेल्या अनेक नागरिकांनी नियमित योगाभ्यासामुळे त्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यात सकारात्मक बदल झाल्याचे अनुभव व्यक्त केले आहेत. योग हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनल्याचे त्यांनी नमूद केले असून, या प्रेरणादायी अनुभवांमुळे अधिकाधिक नागरिक योगाकडे आकर्षित होत आहेत.

*कोळीवाडा महानगरपालिका शाळेत विशेष योग सत्राचे आयोजन*

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त ‘के उत्तर’ विभागातील कोळीवाडा महानगरपालिका शाळेत ‘न्यू एज योगा इन्स्टिट्यूट’च्या सहकार्याने विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्रातून नागरिकांना उत्तम शारीरिक आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि तणाव व्यवस्थापनासाठी योगाचा दैनंदिन जीवनात अंगीकार करण्याचा संदेश देण्यात आला. या उपक्रमात एकूण ५५ लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन योगाला आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.

*आरोग्य विभागातर्फे विविध ठिकाणी योग सत्रांचे आयोजन*

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून २०२६ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे विविध ठिकाणी योग सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार एच पूर्व विभागातील वाय कॉलनी, शासकीय वसाहत, वांद्रे पूर्व येथे सकाळी ६.३० वाजता, एच पश्चिम विभागातील वांद्रे फोर्ट, वांद्रे पश्चिम येथे सकाळी ६.३० वाजता, के पश्चिम विभागातील जुहू समुद्र किनारा येथे सकाळी ६ वाजता, पी उत्तर विभागातील राठोडी आरोग्य केंद्र मालाड येथे सकाळी १० वाजता तसेच आर उत्तर विभागातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सकाळी ७.०० वाजता योग दिनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here