*बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागाकडून कारवाई*
अंधेरी परिसरात पदपथांवर दुकाने, शेड उभारुन पादचाऱ्यांच्या मार्गक्रमणात अडथळा निर्माण करणाऱ्या ९ अनधिकृत दुकानांचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘के पश्चिम’ विभागाकडून गुरुवार (दि १८ जून २०२६) निष्कासन करण्यात आले.
उपायुक्त (परिमंडळ ४) डॉ. भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनात, सहायक आयुक्त (के पश्चिम विभाग) चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
या अंतर्गत, अंधेरी येथील फन रिपब्लिक मार्गावरील एका दुकानाचे निष्कासन करण्यात आले. तर, एका अनधिकृत दुकानावर जप्तीची कारवाई करण्यात आली.
वीरा देसाई मार्गावर करण्यात आलेल्या कारवाईत ८ अनधिकृत दुकानांचे निष्कासन करण्यात आले. तसेच, अनधिकृतपणे उभारलेले शेड आणि पायऱ्या तोडण्यात आल्या. या कारवाईमुळे, परिसरातील पदपथ मोकळा झाला असून पादचाऱ्यांना मार्गक्रमण करणे सोयीचे झाले आहे.
‘के पश्चिम’ प्रशासकीय विभाग अंतर्गत कार्यरत परिरक्षण, इमारत व कारखाना, अनुज्ञापन आणि सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी विविध संयंत्रांच्या सहाय्याने ही कारवाई केली. आंबोली पोलीस ठाण्याकडून यावेळी पुरेसा बंदोबस्त तैनात होता.
***



















