भारत नेटवर्क ग्रुप – द बँकर यांच्या वतीने नॅफकबच्या सहकार्याने आयोजित ‘भारत को-ऑपरेटीव्ह बँकिंग समिट – २०२६’ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या दि म्युनिसिपल को-ऑपरेटीव्ह बँकेस तीन पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. यामध्ये, सर्वोत्कृष्ट डेटा सेंटर अंमलबजावणी, सर्वोत्कृष्ट सायबर सुरक्षा उपक्रम, सर्वोत्कृष्ट जोखीम व्यवस्थापन उपक्रम या पुरस्कारांचा समावेश आहे.
दि. ५ ते ७ जून २०२६ दरम्यान लखनौ येथे पार पडलेल्या समारंभात बँकेच्या गुंतवणूक समितीचे अध्यक्ष भानुदास भोईर, ग्राहक सेवा व तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष किरण आव्हाड, कर्ज व्यवहार समितीचे अध्यक्ष श्री. महेश ठाकरे; सर्वसाधारण कामकाज, संगणक, सल्लागार व विधी समितीचे अध्यक्ष अभिजीत बागुल आणि संचालक मुकेश घुमरे व रवींद्र दामोदरे यांनी हे पुरस्कार स्वीकारले.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा दि म्युनिसिपल को-ऑपरेटीव्ह बँकेच्या अध्यक्ष अश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) तथा बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेच्या कामकाजाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला आहे. बँकेचे कार्याध्यक्ष तथा उपआयुक्त (सामान्य प्रशासन) किशोर गांधी, उप कार्याध्यक्ष तथा उपआयुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी व बँकेच्या संचालक मंडळानी उत्तम व्यवस्थापन आणि नियोजन केल्यामुळे बँकेच्या सर्वांगीण आर्थिक प्रगतीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे, बँकेचा विविध पुरस्कारांनी सन्मान करण्यात आला आहे.
दि म्युनिसिपल को-ऑपरेटीव्ह बँक लिमिटेड ही बृहन्मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांची बँक असून बँकेचे ६६ हजार ७६१ सभासद आहेत. बँकेची कोअर बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, ई-कॉम, पॉस, मोबाईल बँकिंग आदी सुविधा उपलब्ध आहेत. मुंबई शहर आणि उपनगरांत बँकेचे ११ एटीएम केंद्र आहेत. तसेच, रुपे कार्डच्या मेंबर बँकांमधील कोणत्याही बँकेच्या एटीएमवरुन बँकेचे कार्डधारक पैसे काढू शकतात. एखाद्या खासगी बँकेप्रमाणेच ही बँकदेखील अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारित सेवा ग्राहकांना देत आहे. उत्कृष्ट नियोजनामुळे बँकेने गत १० वर्षांत चौफेर प्रगती केली असून दरवर्षी बँकेला नफा होत आहे. या नफ्याचा विनियोग सभासदांसाठी विविध योजनांकरीता केला जातो, असे बँकेचे महाव्यवस्थापक विनोद रावदका यांनी सांगितले.
*****



















