*ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा आणि हरित ऊर्जेला बळ देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प : मंत्री जयकुमार गोरे*
सातारा: ३० मे, २०२६ : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील अहिरे येथे राज क्लिन एनर्जीच्या अत्याधुनिक CBG (Compressed Bio Gas) प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमास राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी CBG क्षेत्रातील संधींवर प्रकाश टाकत, “सीबीजी हे केवळ पर्यायी इंधन नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारे प्रभावी माध्यम आहे. शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देण्यासोबतच कृषी अवशेष आणि सेंद्रिय कचऱ्याचे मूल्यवर्धन करून शाश्वत विकास साधण्याची क्षमता या क्षेत्रात आहे,” असे मत व्यक्त केले.
अहिरे येथे उभारण्यात आलेला हा प्रकल्प नेपियर गवत, कृषी अवशेष आणि प्रेसमड यांसारख्या कच्च्या मालाचा वापर करून पर्यायी इंधन निर्मिती करणार आहे. पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण आणि हरित ऊर्जानिर्मितीच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती व आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे.
यावेळी मंत्री जयकुमार गोरे यांनी राज क्लिन एनर्जीचे अनिल पिसे आणि संपूर्ण राज समूहाचे अभिनंदन करताना सांगितले की, “स्वच्छ आणि हरित भारताच्या दिशेने उचललेले हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे आहे. कृषी अवशेषांपासून ऊर्जानिर्मिती करणारे असे प्रकल्प ग्रामीण भागातील शाश्वत विकासाला गती देतील. तसेच पर्यावरणपूरक उद्योगांच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर रोजगार आणि आर्थिक संधी निर्माण होतील.”
या उद्घाटन सोहळ्यास राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीजचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघाचे युवा नेते विराज शिंदे, सातारा जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती ऋषिकेश धायगुडे-पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
000 00























