Home Uncategorized *हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांच्या नागरी सत्कार सोहळ्यास जयकुमार गोरे यांची उपस्थिती*

*हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांच्या नागरी सत्कार सोहळ्यास जयकुमार गोरे यांची उपस्थिती*

8
0

*महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा; हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांच्या यशाचे जयकुमार गोरे यांच्याकडून कौतुक*

मंगळवेढा, दि. ३० मे २०२६ : सातारा येथे पार पडलेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मंगळवेढा तालुक्यातील शिरसी गावचे सुपुत्र पैलवान महेंद्र गायकवाड यांनी मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावत महाराष्ट्राची मान उंचावली आहे. त्यांच्या या ऐतिहासिक यशाबद्दल आयोजित करण्यात आलेल्या भव्य नागरी सत्कार व गौरवनिधी पुरस्कार सोहळ्यास ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे उपस्थित राहिले.

यावेळी बोलताना जयकुमार गोरे यांनी पैलवान महेंद्र गायकवाड यांच्या जिद्द, कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण सराव आणि चिकाटीचे कौतुक केले. ग्रामीण भागातील युवकाने राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी गौरवाची बाब असून, अशा यशामुळे राज्यातील युवा पिढीला प्रेरणा मिळते, असे त्यांनी नमूद केले.

महेंद्र गायकवाड यांनी कुस्ती क्षेत्रात केलेली उल्लेखनीय कामगिरी ही केवळ वैयक्तिक यश नसून मंगळवेढा तालुका आणि सोलापूर जिल्ह्याचा गौरव असल्याचे सांगत जयकुमार गोरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी त्यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

या सत्कार सोहळ्यास आमदार समाधान आवताडे, ज्येष्ठ नेते बबनराव आवताडे, भाजप सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, दामाजी शुगरचे चेअरमन शिवानंद पाटील, आवताडे शुगर फॅक्टरीचे चेअरमन संजय आवताडे, उद्योजक वैभव नागणे, उमेश परिचारक, नगराध्यक्षा सौ. सुनंदा आवताडे, पंचायत समिती सभापती सौ. दिपाली ताड, नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष प्रा. शिवाजीराव काळुंगे, उपनगराध्यक्ष येताळा भगत, उपसभापती अर्जुन मल्लाळे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात उपस्थितांनी हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांच्या यशाचा गौरव करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रातील कुस्ती परंपरेला नवी उंची देणाऱ्या या यशाचा सर्व स्तरांतून गौरव करण्यात आला.

000 00

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here