*• सुरक्षा व्यवस्थेसह उपाहारगृह, घनकचरा व्यवस्थापन आदी सुविधांची पुर्वतयारी सुरू*
*• दिनांक १७ ते ३० मे २०२६ दरम्यान प्राण्यांचा बाजार भरणार*
बकरी ईद सणानिमित्त देवनार पशुवधगृह येथे विविध प्रकारच्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज आहे. यामध्ये प्रामुख्याने सीसीटीव्हीद्वारे नियंत्रण, सुरक्षारक्षकांची नेमणूक, वाहनतळ, उपाहारगृह आदींची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच, घनकचरा व्यवस्थापन, सुरक्षा, आरोग्य, कीटकनाशक, तक्रार निवारण कक्ष आदींबाबत देखील कार्यवाही सुरू आहे. दि. १७ ते ३० मे २०२६ या कालावधीत देवनार पशुवधगृह येथे म्हैसवर्गीय प्राणी आणि बकऱ्यांच्या बाजाराचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनात देवनार पशुवधगृह येथे बकरी ईद सणाच्या निमित्ताने विविध सोयीसुविधा पुरविण्यात येतात. यंदा दि. २८ मे २०२६ रोजी बकरी ईद सण साजरा होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे विविध विभाग आणि अन्य यंत्रणांकडून देवनार पशुवधगृह येथे करण्यात आलेल्या पुर्वतयारीबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात नुकतीच आढावा बैठक पार पडली.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी या अनुषंगाने सांगितले की, बकरी ईद सणाच्या निमित्ताने, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बाजार विभागामार्फत दिनांक २८ ते ३० मे २०२६ दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण १०९ ठिकाणी धार्मिक पशुवधासाठी परवानगी देण्यात आली आहे. या निर्देशित ठिकाणी किंवा इतर ठिकाणी धार्मिक पशुवध करावयाचा असल्यास त्याच्या परवानगीकरिता अर्ज करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने यंदा MyBMC मोबाइल अॅप्लिकेशनमध्ये सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यासाठी नागरिकांना अॅपवर नोंदणी करावी लागेल. तसेच, धार्मिक पशुवधासाठी म्हैसवर्गीय प्राणी व बकरे आयात परवाना तसेच ‘स्लॉट बुकिंग’साठी https://www.mcgm.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन व्यवस्था करण्यात आली आहे. ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वानुसार संगणकीय वाडे वाटप प्रणाली कार्यान्वित असेल. तथापि, धार्मिक पशुवध धोरणानुसार, म्हैसवर्गीय प्राण्यांचा धार्मिक वध हा केवळ देवनार पशुवधगृहातच करणे बंधनकारक आहे.”असेही जोशी यांनी सांगितले.
नागरिकांच्या तक्रारींचे निवारण तसेच आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी २४ X ७ कार्यरत नियंत्रण कक्ष कार्यरत करण्यात येणार आहे. नागरिकांना त्वरित सहाय्य मिळावे, यासाठी ९०७६०००४८१, ९०७६०००४८२, ९०७६०००४८३, ९०७६०००४८४ हे समर्पित मदतसेवा क्रमांक उपलब्ध केले जातील.
*देवनार पशुवधगृह येथे पुरविण्यात येणाऱ्या विविध सोयीसुविधा*
१. देवनार येथे प्राण्यांसाठी स्थायी स्वरुपात ३२ हजार २५६ चौरस मीटर तसेच तात्पुरत्या स्वरुपात ७७ हजार ८५० चौरस मीटर अशा एकूण १ लाख १० हजार १०६ चौरस मीटर क्षेत्रावर निवाऱ्याची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच, म्हैसवर्गीय पशुंच्या धार्मिक पशुवधासाठी १० हजार चौरस मीटर जागेची सोय केली जात आहे.
२. दैनंदिन १.३ दशलक्ष लीटर (एमएलडी) पाण्याव्यतिरिक्त १ दशलक्ष लीटर पाण्याची अतिरिक्त सुविधा असेल. नागरिकांसाठी १० ठिकाणी पाणपोई उभारण्यात येतील. तसेच ठिकठिकाणी सुमारे १५० पाण्याच्या टाक्यांची व्यवस्था राहील.
३. नागरिकांसाठी २ आरोग्य केंद्र, २ रुग्णवाहिका, पशुंसाठी २ प्राथमिक पशुवैद्यकीय आरोग्य केंद्र तसेच आरोग्य तपासणीसाठी पशुवैद्यकांची नेमणूक करण्यात येईल.
४. बकरी ईद सणाच्या १५ दिवसांच्या कालावधीदरम्यान देवनार पशुवधगृह आणि आसपासच्या परिसरातील अंदाजे ७ हजार ५०० मेट्रिक टन कचऱ्याचे निर्मूलन आणि विल्हेवाटीसाठी आवश्यकतेनुसार तीन पाळ्यांमध्ये दररोज २१५ स्वच्छता कर्मचारी, ६ पिकअप व्हॅन, ३ जेसीबी, ३ डंपर यांच्यासह मृत जनावरे वाहून नेण्यासाठी २ विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात येत आहे. तसेच, पशुवधाच्या तीन दिवसांच्या कालावधीत परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी ६०० स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल.
५. पशुवधांच्या कालावधीत मांस वाहतूक करणाऱ्या नागरिकांच्या वाहनांना देवनार पशुवधगृह परिसरात प्रवेश देताना कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.
६. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने देवनार पशुवधगृह येथे २१ पोलिस चौकी, २ निरीक्षण मनोऱ्यांसह सुमारे ५०० पोलिस अधिकारी/कर्मचारी यांची तसेच महानगरपालिकेच्या २०० सुरक्षारक्षकांची नेमणूक राहील. तसेच, संपूर्ण परिसरात निगराणीसाठी २१० स्थायी कॅमेऱ्यांसह १७० बुलेट कॅमेरे, ३४ डोम कॅमेरे, ०६ पीटीझेड कॅमेरे, व्हिडिओ वॉलसह सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत असेल. वाड्यांच्या आतील भागांत तात्पुरते ८० आणि बाह्य परिसर व वाहनतळाच्या ठिकाणी ५२ अतिरिक्त कॅमेरे लावण्यात येतील.
७. परिसरातील प्रत्येक प्रवेश व निर्गम बिंदूंवर क्यूआर कोड आधारित तपासणी व पडताळणी व्यवस्था स्थापित केली जाणार आहे. त्यामुळे, पशूंची आवक-जावक व नोंदणी प्रक्रिया अधिक अचूक, जलद व नियंत्रित पद्धतीने पार पाडता येईल.
८. देवनार पशुवधगृहाच्या संरक्षक भिंतीलगत असलेल्या २५० आसन क्षमतेच्या सार्वजनिक शौचालयांसह आतील परिसरात १५ कायमस्वरुपी आणि १०० फिरत्या शौचालयांची सोय करण्यात येत आहे. तसेच, महिलांसाठी स्वतंत्र स्नानगृहांची व्यवस्था केली जात आहे.
९. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा निचरा करण्यासाठी पाणी उपसा संचांची सोय केली जात आहे.
१०. अग्निशमन दलाचे २ फायर इंजिन व अधिकाऱ्यांसह ७ प्रशिक्षित फायर मार्शल तैनात राहतील. तसेच, २ हजार ७५९ अग्निशामक यंत्रे, २ हजार ७५० रेतीच्या बादल्या आणि २०० पाण्याच्या टाक्याही उपलब्ध राहतील.
११. नागरिकांसाठी कायमस्वरुपी ५ उपाहारगृहांव्यतिरिक्त ८ तात्पुरत्या स्वरुपातील उपाहारगृहांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
****



















