Home मुंबई *मुंबईकरांचे आरोग्य बळकटीकरणासाठी अत्याधुनिक उपकरणांसह दर्जेदार वैद्यकीय सुविधांचे लोकार्पण – महापौर श्रीमती...

*मुंबईकरांचे आरोग्य बळकटीकरणासाठी अत्याधुनिक उपकरणांसह दर्जेदार वैद्यकीय सुविधांचे लोकार्पण – महापौर श्रीमती रितू तावडे*

75
0

*• लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि केईएम रुग्णालयातील विविध वैद्यकीय सुविधांचे महापौरांच्या हस्ते लोकार्पण*

मुंबईकर नागरिकांच्या सेवेत अत्याधुनिक उपकरणे आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी विविध सेवांचे लोकार्पण करण्यात आल्याचा अत्यंत आनंद आहे. या सुविधांच्या माध्यमातून नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहेत. मुंबईकरांचे आयुष्यमान उंचावण्यासाठी अत्याधुनिक उपकरणांची उपलब्धतता महत्त्वाची आहे, असे गौरवोद्गार मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी दि.८ मे २०२६ रोजी सेठ गोर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय (परळ) येथे आयोजित कार्यक्रमात काढले. के. ई. एम. रुग्णालयातील नवजात शिशू अतिदक्षता विभाग (NICU) तसेच मॅमोग्राफी मशीन, सर्जिकल पॅथोलॉजी सेमिनार सभागृह, फीजिओलॉजी सेमिनार सभागृह यांचे लोकार्पण महापौर तावडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्याआधी लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय संलग्नित धारावी येथील लोकनेते एकनाथराव गायकवाड नागरी आरोग्य केंद्रात बालरोग, रक्त दोष, कर्करोग व बोनमॅरो ट्रान्सप्लांट केंद्राचे लोकार्पण देखील करण्यात आले.

सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे, स्थानिक नगरसेवक किरण तावडे, स्थानिक नगरसेविका अर्चना शिंदे, उपआयुक्त (सार्वजनिक आरोग्य) शरद उघडे, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. शैलेंद्र मोहिते, अधिष्ठाता डॉ. प्रमोद इंगळे, अधिष्ठाता डॉ. हरिश पाठक, ‘वेहा फाऊंडेशन’च्या रुमाना हमीद आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महापौर रितू तावडे म्हणाल्या की, “बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधांचा मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे. अत्याधुनिक आणि गुणवत्तापूर्ण सेवा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयाच्या माध्यमातून उपलब्ध होत असल्याचा अभिमान आहे. महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मॅमोग्राफी संयंत्र लोकार्पणाचा मान मला मिळाला, याचा आनंद आहे. स्तनाचा कर्करोग महिलांच्या आरोग्यासमोरील गंभीर आव्हान आहे. परंतु वेळेत तपासणी, वेळीच निदान आणि योग्य उपचाराच्या माध्यमातून या आजारावर नियंत्रण मिळवता येते. रुग्णालयात मॅमोग्राफी उपकरण उपलब्ध झाल्याने महिलांना तपासणीसाठी इतरत्र धावपळ करावी लागणार नाही. या उपकरणामुळे महिलांमध्ये नियमित तपासणीची सवय वाढेल. निदानातील विलंब कमी होईल आणि कुटुंबाच्या आरोग्य सुरक्षेला बळ मिळेल, असे महापौर तावडे यांनी नमूद केले.

नवजात शिशू अतिदक्षता विभागाचे सक्षमीकरण करण्याच्या उद्देशाने स्वच्छ, सुरक्षित आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम अतिदक्षता विभागाची सेवा आज उपलब्ध करुन देण्यात आली. अकाली जन्मलेली, कमी वजनाची किंवा जन्मानंतर तातडीच्या वैद्यकीय देखरेखीची गरज असलेल्या नवजात बालकांना या विभागातून उपचार मिळणे शक्य होणार आहे. या सुविधेमुळे नवजात शिशूंची देखरेख अधिक परिणामकारक होईल आणि संसर्ग नियंत्रण शक्य होईल, असेही महापौर रितू तावडे यांनी नमूद केले.

लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय संलग्नित लोकनेते एकनाथराव गायकवाड नागरी आरोग्य केंद्र (धारावी) येथे ‘जागतिक थॅलेसेमिया दिन’ (दि. ८ मे) च्या निमित्ताने बालरोग, रक्तददोष, कर्करोग व बोनमॅरो ट्रान्सप्लांट केंद्राचे लोकार्पण शुक्रवार(दि. ८ मे २०२६) महापौर रितू तावडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. एका गंभीर आजाराच्या गरजू रुग्णांना बृहन्मुंबई महानगरपालिका आणि ‘वेहा फाऊंडेशन’च्या संयुक्त प्रयत्नातून सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या केंद्राच्या माध्यमातून ६ रुग्णशय्या, डे केअर केमोथेरपी कक्ष, आंतररुग्ण सुविधा देण्यात आली आहे. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ही सुविधा उपलब्ध झालेली आहे. बोनमॅरो ट्रान्सप्लांट उपचार पद्धती उपलब्ध करुन देणारे लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय हे पहिले रुग्णालय असल्याचा अभिमान आहे.” असे गौरवोद्गार महापौर रितू तावडे यांनी काढले. थॅलेसेमिया दिनाच्या निमित्ताने लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांकरिता या रुग्णालयाच्या बायोकेमिस्ट्री डिपार्टमेंट मार्फत थॅलेसिमिया स्क्रीनिंग उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सेवा मिळतानाच या सुविधांचा फायदा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनाही होणार आहे. मुंबईकरांचे आरोग्य सुधारण्याच्या अनुषंगाने हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी दिली.
***

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here