मेकॅनिकल इंजिनिअर, कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स, सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार विजेत्यानं व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनरमध्ये गोळीबार करत
आयुष्य धोक्यात का टाकले?
वॉशिंग्टनमधील हिल्टन हॉटेलमध्ये झालेल्या व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनर दरम्यान गोळीबार करणाऱ्या संशयिताची ओळख पटली आहे. संशयिताचे नाव कोल थॉमस ॲलन आहे. ॲलन हा दक्षिण कॅलिफोर्नियाचा रहिवासी आहे. ट्रम्प आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हॉटेलमध्ये गोळीबार केल्यानंतर, ॲलनला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अटक केली.
सीबीएस न्यूजच्या वृत्तानुसार, संशयिताने अधिकाऱ्यांसमोर कबूल केले की तो ट्रम्प प्रशासनातील अधिकाऱ्यांना लक्ष्य करत होता. त्याला सोमवारी (२७ एप्रिल) न्यायालयात हजर केलं जाईल.
ॲलन व्यवसायाने शिक्षक
गोळीबारानंतर, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये एक पत्रकार परिषद घेतली, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की संशयित मानसिकदृष्ट्या आजारी आहे. सुरक्षा यंत्रणांनी संशयिताच्या प्रोफाइलची चौकशी सुरू केली, ज्यात अनेक तपशील समोर आले. या तपासात ॲलनच्या पार्श्वभूमीबद्दल महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. सार्वजनिक नोंदीनुसार, ३१वर्षाचा ॲलन हा लॉस एंजेलिसजवळील टॉरन्स परिसराचा रहिवासी आहे. तो व्यवसायाने शिक्षक आणि व्हिडिओ गेम डेव्हलपर आहे. ॲलनच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, तो ‘C2 एज्युकेशन’ नावाच्या शिकवणी कंपनीत अर्धवेळ शिक्षक म्हणून काम करत होता. कंपनीच्या सोशल मीडिया पोस्टवरून असे दिसून येते की, डिसेंबर २०२४ मध्ये त्याला ‘सर्वोत्तम शिक्षक’ (Teacher of the Month) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
हल्ला करणाऱ्याची शैक्षणिक पार्श्वभूमी
ॲलनने २०१७ मध्ये कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (कॅलटेक) मधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. गेल्या वर्षी, त्याने कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी-डोमिंगेझ हिल्समधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर पदवी (मास्टर डिग्री) देखील मिळवली. यावरून त्याच्या उच्च शिक्षणाची पातळी स्पष्टपणे दिसून येते. प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की, ॲलन राजकारणातही सामील होता. फेडरल इलेक्शन कमिशनच्या (FEC) नोंदीनुसार, ऑक्टोबर २०२४ मध्ये, कोल थॉमस ॲलनने कमला हॅरिस यांच्या अध्यक्षीय प्रचार मोहिमेसाठी २५ डॉलरची देणगी दिली होती.
व्हाईट हाऊस कॉरस्पॉन्डंट्स डिनरमध्ये ट्रम्पच्या डोळ्यादेखत धडाधड गोळीबार; तोंडात घास असतानाच अनेकांची पाचावर धारण, पाहुणे टेबलाखाली पळाले, प्रत्यक्षदर्शी भारतीय पत्रकारानं सांगितला थरार!
मेकॅनिकल इंजिनिअर, कॉम्प्युटर सायन्समध्ये मास्टर्स, सर्वोत्तम शिक्षक पुरस्कार विजेत्यानं व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनरमध्ये गोळीबार करत आयुष्य संकटात का टाकले?

















