‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक
प्रशांत आंबी यांना शिवसेनेचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी दिलेल्या धमकीचा तीव्र शब्दात निषेध करून, त्यांच्यावर जास्तीत जास्त कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मराठी प्रकाशक संघाने मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे आणि प्रमुख कार्यवाह पराग लोणकर यांनी पाठविलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, आमदार संजय गायकवाड यांच्याकडून नुकतेच दूरध्वनीवर प्रकाशक प्रशांत आंबी यांना
अतिशय गैर शब्दामध्ये धमकावले गेले आहे. या संवादामध्ये गायकवाड यांनी केलेली शिवीगाळ, त्यांच्याकडून दिल्या गेलेल्या धमक्या या अतिशय निंदनीय आणि आक्षेपार्ह आहेत. दिवंगत ज्येष्ठ लेखक श्री. गोविंद पानसरे आणि प्रकाशक यांना या सर्व दूरध्वनीवरील संभाषणामध्ये अतिशय अर्वाच्य भाषेत जी शिवीगाळ केली आहे ती कुणीही कुणास करू नये अशीच असताना आमदार पदावरील व्यक्तीने करणे हे अतिशय वेदनादायी व चीड आणणारे आहे. प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे जीवाला अपाय करण्याची धमकीही यामध्ये दिली गेल्याचे ऐकिवात आहे.कोणत्याही कारणासाठी निषेध नोंदवण्यासाठी अनेक योग्य मार्ग असतात.पण ते न वापरता अशा प्रकारे भाषा करणे, धमकावणे आणि शिवीगाळ करणे अजिबात योग्य नाही. त्यामुळे या प्रकाराचा संपुर्ण महाराष्ट्रातील प्रकाशक व लेखकांच्यातर्फे अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ जोरदार निषेध नोंदवत आहे.
याबाबत महाराष्ट्र राज्याचे माननीय आणि कृतिशील मुख्यमंत्री म्हणून आपण जास्तीत जास्त कठोर व योग्य ती पावले उचलाल अशी आम्ही अपेक्षा करतो. अशी कारवाई झाली तरच अशा प्रकारांना भविष्यात आळा बसेल असे नमूद करून प्रकाशक संघ अपेक्षित कठोर कृतीच्या प्रतिक्षेत असल्याचे
नमूद करण्यात आले आहे.

















