Home मुंबई *भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई मनपाकडून तयारी*

*भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई मनपाकडून तयारी*

66
0

*चैत्यभूमी, राजगृह आणि अन्य ठिकाणी अनुयायांसाठी विविध प्रकारच्या नागरी सेवा- सुविधा*

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक चैत्यभूमी येथे माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महापौर रितू तावडे, उप महापौर संजय घाडी आदी मान्यवर सकाळी ९.३० वाजता पुष्प अर्पण करून अभिवादन करतील*

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई मनपाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या वतीने दादर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारक, ‘राजगृह’ निवासस्थान आणि संबंधित परिसरांमध्ये विविध प्रकारच्या नागरी सेवा–सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी स्मारक येथे माननीय राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, महापौर रितू तावडे, उप महापौर संजय घाडी अन्य मान्यवर हे मंगळवार, दि. १४ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता पुष्प अर्पण करून अभिवादन करतील.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दादरस्थित चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास अभिवादन करण्यासाठी अनुयायी येतात. या पार्श्वभूमीवर, विविध प्रकारच्या नागरी सोयी–सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले आहे. उपआयुक्त (परिमंडळ २) प्रशांत सपकाळे, जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते यांच्या देखरेखीखाली विविध स्तरीय कार्यवाही करण्यात आली आहे.

चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक तसेच परिसरामध्ये नियंत्रण कक्ष, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, शौचालये आदी सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यासोबतच सीसीटीव्ही, चैत्यभूमीजवळ समुद्रात जीवरक्षक बोटी, अग्निशमन दलाचे पथक तैनात करण्यासह अग्निशमन सुविधा सुसज्ज ठेवण्यात आल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत नागरिकांना वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत. त्याकरिता मुंबई मनपातील डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी पुरेशा संख्येने नेमण्यात आलेले आहेत. आणीबाणीच्या प्रसंगी तात्काळ मदतीसाठी रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आली आहे.

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचेही आयोजन*

दि. १४ एप्रिल २०२६ रोजी चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जनसंपर्क विभागाद्वारे करण्यात आले आहे. या प्रदर्शन दालनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासातील दुर्मिळ छायाचित्रे असणार आहेत. त्याचबरोबर या प्रदर्शन दालनात, संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरक जीवनचरित्रावर आधारित कॉफी टेबल बुक देखील विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

*जयंती कार्यक्रमाचे समाजमाध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण*

दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती कार्यक्रमाचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्युब या समाज माध्यम खात्यावरुन थेट प्रक्षेपण केले जाईल. तसेच, फेसबुक, एक्स (पुर्वीचे ट्विटर) या माध्यमांवरुन देखील सहक्षेपण करण्यात येईल.
===

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here