*ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना डॉ. नीलम गोऱ्हे यांची भावपुर्ण श्रद्धांजली*
मुंबई
शास्त्रीय संगीत असो किंवा उडत्या चालीची गाणी, प्रत्येक सुराला स्वतःच्या अनोख्या शैलीने जिवंत करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाने भारतीय संगीतातील एक सुवर्णयुग मावळले आहे, अशा शब्दांत विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
डॉ. गोऱ्हे यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले की, आशा भोसले यांनी आपल्या अष्टपैलू आवाजाने तब्बल सात दशके रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्यांच्या गायकीत भावनांची समृद्धता, सुरांची अचूकता आणि विविधतेचा अप्रतिम आविष्कार दिसून येत होता. त्यामुळेच त्या प्रत्येक पिढीच्या हृदयात स्थान निर्माण करू शकल्या.
त्यांनी सादर केलेल्या असंख्य गीतांनी भारतीय संगीतसृष्टीला नवी उंची दिली. पारंपरिकतेचा ठसा जपत आधुनिकतेशी साधलेला सुरेल मेळ हे त्यांच्या कलेचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या या अद्वितीय योगदानामुळे त्यांना देश-विदेशात विशेष मान्यता मिळाली, असेही त्यांनी नमूद केले.
आशा भोसले यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशी भावना व्यक्त करत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांच्या कुटुंबियांना व चाहत्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना केली.





















